Tuesday, 3 February 2026

** कल्याण वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या 'आशीर्वादाने’ जंगलात निकृष्ट दर्जाचे पिलर काम?

** कल्याण वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या 'आशीर्वादाने’ जंगलात निकृष्ट दर्जाचे पिलर काम?

वनविभाग–ठेकेदार संगनमताचा गंभीर आरोप; नागरिक संतप्त**

कल्याण | प्रतिनिधी

कल्याण तालुक्यातील मौजे नवगाव येथील जंगल परिसरात वनविभागाच्या हद्दीत सुरू असलेल्या निकृष्ट व खालच्या दर्जाच्या पिलर बांधकामामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे काम थेट कल्याण वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून, वनविभागातील अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे.

वन व्यवस्थापन समितीने हा गैरप्रकार २२ जानेवारी २०२६ रोजी उघडकीस आणत ठेकेदारांकडून शासनाचा निधी हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. हा विषय “बातमीदार माझा” या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यात आला होता. मात्र, इतके गंभीर आरोप समोर येऊनही आजतागायत वनविभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, ही बाब अधिकच संशय निर्माण करणारी आहे.

जंगल परिसराचे थेट नुकसान होत असताना, शासनाच्या पैशाचा अपव्यय होत असताना तसेच निकृष्ट साहित्य वापरून काम सुरू असतानाही वनविभागातील अधिकाऱ्यांचे मौन नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे वनविभाग व संबंधित ठेकेदार यांच्यात संगनमत असल्याचा संशय अधिक बळावत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण प्रकरणावर आवाज उठविणारी वन व्यवस्थापन समिती सुद्धा अलीकडे मौन बाळगत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, पर्यावरण व पर्यटन संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोविंद प्रजापती यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. “मी कल्याण वनविभागातील भोंगळ कारभार आणि गैरप्रकारांविरोधात आधीपासूनच लढा देत आहे. मौजे नवगाव येथील निकृष्ट दर्जाचे बांधकाम थांबवण्यासाठी मी लवकरच आमच्या शिष्टमंडळासह वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची व जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन लेखी तक्रार देणार आहे. या प्रकरणातील ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावे तसेच जबाबदार वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी आम्ही करणार आहोत,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

आता प्रश्न हा आहे की,
👉 वनविभाग कारवाई कधी करणार?
👉 जंगलातील गैरप्रकारांना अभय देणारे अधिकारी कोण?
👉 शासनाचा पैसा व जंगल वाचवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची?

नागरिकांच्या रोषाचा उद्रेक होण्याआधी प्रशासन जागे होणार का, याकडे संपूर्ण कल्याण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

तळघर ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री लक्ष्मी नारायण मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन !!

तळघर ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री लक्ष्मी नारायण मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन !! ...