वालधुनी नदी प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा !!
कल्याण, प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, उल्हासनगर व कल्याण या प्रमुख शहरांमधून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या पाण्याचा रंग अलीकडे रंगीबेरंगी होत असून त्या परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कल्याण येथील अधिकाऱ्यांसोबत वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष नदीचा पाहणी दौरा (निरीक्षण) करण्यास सहमती दर्शवली. त्यानुसार मागील दोन दिवसांपासून नदीच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेसाठी आवश्यक यंत्रणा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आली होती.
या पाहणी दौऱ्याचे प्रमुख मार्गदर्शन शशिकांत दायमा, सौ.रेखा अत्तरदे मॅडम, दिपाली आमडोस्कर व सुरेखा दिविलकर यांनी केले.
या तपासणी व निरीक्षण मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष सुनील सिताराम उतेकर, तसेच भारती अय्यर, गणेश कांबळे, अनिल सरदार, सुरेश अहिरे व विशांत (बबली) कांबळे हे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवला.
दौऱ्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून पंचनामे करण्यात आले असून संपूर्ण अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना व महाराष्ट्र शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लवकरच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी संबंधितांना निमंत्रित केले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
वालधुनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांनी दिली.
No comments:
Post a Comment