ग्राम स्वराज्य', चला खेडी वाचवू या... सामाजिक कार्यकर्ते विलास गावंड यांचे जनतेला आवाहन !!
** शाश्वत विकास आणि प्रशासकीय संवेदनांचा कस याबाबत केली भावना व्यक्त.
उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) :
मानवी संस्कृतीचा पाया 'अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य' या पंचसूत्रीवर उभा आहे. निसर्ग आणि मानवी जीवन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र, आजच्या आधुनिकतेच्या आंधळ्या शर्यतीत आपण निसर्गापासून दूर गेलो आहोत. महात्मा गांधीजींनी दिलेला ‘खेड्यांकडे चला’ हा मंत्र केवळ एक घोषणा नव्हती, तर ती एक परिपूर्ण, समाधानी आणि निसर्गपूरक जीवनशैलीची दिशा होती. आज वाढती उष्णता, प्रदूषण आणि कचऱ्याचे डोंगर पाहता, गांधीजींचा विचार आणि विनोबांची कर्मनिष्ठा पुन्हा एकदा अंगीकारण्याची वेळ आली आहे.असे मत उरण मधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विलास गावंड यांनी व्यक्त केले असून विविध सोशल मीडिया व जनतेला प्रत्यक्ष भेटून ते या बाबत जनजागृती करीत आहेत.
आपले प्रशासक आणि लोकप्रतिनिधी शिक्षित आहेत परंतु साक्षर आणि सार्थक यातील धुसर संभ्रमात आहेत. त्यामुळे प्रशासकीय अनास्था आणि विकास म्हणजेच बांधकाम या चुकीच्या धोरणामुळे जनतेच्या घामाच्या पैशातून, कराच्या माध्यमातून सरकारी निधीतून सुशासन होणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात चित्र वेगळे दिसते. शहरांमध्ये टोलेजंग इमारती आणि सिमेंटचे रस्ते होत आहेत, पण श्वास घ्यायला शुद्ध हवा आणि प्यायला शुद्ध पाणी मिळवणे कठीण झाले आहे. विकासाचे आराखडे आखताना पादचारी, सायकलस्वार किंवा सामान्य माणसापेक्षा मूठभर धनदांडग्यांच्या सोयीचा विचार प्राधान्याने केला जात आहे. ही विकासाची चुकीची धोरणे भविष्यात पर्यावरणाचा समतोल बिघडवण्यास कारणीभूत ठरत आहेत.
आचार्य विनोबा भावे यांनी आयुष्यभर विचार आणि व्यवहाराची सांगड घातली. त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली. आजच्या 'वापरा आणि फेकून द्या' या संस्कृतीमुळे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. भविष्यातील संकटांवर मात करण्यासाठी आपल्याला एक अशी 'इकोसिस्टिम' हवी आहे, जिथे कचरा ही समस्या न राहता ती 'संपत्ती' बनायला हवी. विकेंद्रित पद्धतीने कचऱ्याचे खतात रूपांतर होऊन ती मातीला परत मिळायला हवी.
पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवणारी यंत्रणा हवी, जेणेकरून टँकरमुक्त गावे निर्माण होतील. केवळ काँक्रीटचे हायवे नकोत, तर झाडांच्या सावलीत असणारे सायकल ट्रॅक आणि चालण्यासाठी सुरक्षित पदपथ हवेत. जोपर्यंत आपली गावे स्वयंपूर्ण होत नाहीत, तोपर्यंत शहरांवरील ताण कमी होणार नाही. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील ‘ग्रामस्वराज्यात अन्नापासून ऊर्जेपर्यंत सर्व गोष्टी स्थानिक पातळीवर निर्माण होणे अपेक्षित होते. सौर ऊर्जा, सेंद्रिय शेती आणि स्थानिक रोजगाराला प्राधान्य दिल्यास 'स्वदेशी'चे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होईल. प्रशासकांनी केवळ फाईलवरचे आकडे न बघता, जमिनीवरचा निसर्ग वाचवण्यासाठी दूरगामी धोरणे आखण्याची गरज आहे.
वाढते तापमान आणि निसर्गाचा कोप ही धोक्याची घंटा आहे. विकास म्हणजे केवळ सिमेंटचे बांधकाम नव्हे, तर माणसाचा आनंद आणि निसर्गाचा समतोल होय. जेव्हा आपले लोकप्रतिनिधी स्वतःला 'मालक' न समजता 'सेवक' समजून निसर्गपूरक जीवनशैलीला प्रतिष्ठा देतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने सुराज्य येईल. साधी राहणी आणि निसर्गाशी नाते जोडूनच आपण समृद्ध आणि शाश्वत भविष्याकडे वाटचाल करू शकतो.असे मत उरण मधील सामाजिक कार्यकर्ते विलास गावंड यांनी व्यक्त केले आहे.
No comments:
Post a Comment