Saturday, 25 April 2026

महेंद्रशेठ घरत यांची दिनदुबळ्यांना मदत करण्याची भूमिका लाजवाब : भावना घाणेकर


मावनता हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत.

** महेंद्रशेठ घरत यांची दिनदुबळ्यांना मदत करण्याची भूमिका लाजवाब : भावना घाणेकर  

उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) : "जगाच्या कानाकोपऱ्यात मी कामगार नेता म्हणून जात असतो. जागतिक पातळीवर कामगारांचे कायदे बनवले जातात, अशा व्यासपीठावर माझी ऊठबस असते. त्यामुळे परदेशात जाणे-येणे सर्रास झाले आहे. अशावेळी मी प्रवासात आवर्जून त्या त्या देशांतील चर्चमध्ये जातो. चर्चची भव्यता, शांतता, येशूला बघूला मनाला शांती लाभते. विशेष म्हणजे बहुतांश चर्च किमान ५०० वर्षांपूर्वीच्या आहेत. तिथे गेल्यावर वेगळीच प्रसन्नता मनाला लाभते. विरोध आमच्या संतांनाही त्या त्या काळी पत्करावा लागला आहे. विरोध नवीन नाही, पण आपण लढले पाहिजे, चालत राहिले पाहिजे, हीच माझी भूमिका आहे. भारत हा बहुभाषिक आणि सर्व धर्मांना सामावून घेणारा देश आहे. सर्व धर्म ग्रंथांत मानवतेचाच संदेश आहे. ज्ञानेश्वर महाराज यांनीही ज्ञानेश्वरीत 'पसायदाना'द्वारे जगाच्या कल्याणाचा विचार केला आहे. साने गुरुजींनी सांगितले आहे, 'जगाला प्रेम अर्पावे'. त्यामुळे त्याच वाटेवर मी चालत आहे. ख्रिस्ती समाजाने आपल्या हक्काचे ठिकाण म्हणून उलवा नोडमध्ये चर्च निर्माण करावे, मी खंबीरपणे उभा आहेच," असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत ख्रिस्ती समाजाला संबोधन करताना म्हणाले. उलवे नोडमधील भूमिपुत्र भवन येथे ख्रिस्ती समाजाचा दोन दिवसीय शांती मेळावा पार पडला. शुक्रवारी (ता. २४) अखेरच्या सत्रात महेंद्रशेठ घरत यांनी ख्रिस्ती समाजाला आश्वासित केले. ते पुढे म्हणाले, "काँग्रेस हा सर्वधर्म समभाव मानणारा पक्ष आहे आणि त्या पक्षाचा मी रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय. मी कुठेही गेलो तरी माणसातच देव पाहतो. म्हणूनच 'सुखकर्ता' बंगल्यावरून कुणीही रिकाम्या हाताने परत जाणार नाही, याची काळजी घेतो." 

"महेंद्रशेठ घरत यांच्याविषयी मी ऐकून होते. मला फार काही त्यांच्याविषयी माहिती नव्हते; परंतु उरणमध्ये मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी, म्हणून ते नुसते बोलले नाहीत, तर खंबीरपणे मागे उभे राहिले. एक लिडर कसा असावा, याचे उदाहरण म्हणजेच महेंद्रशेठ घरत होय, असे मी अभिमानाने सांगेन. आजघडीला देशात प्रत्येकाच्या मनात अस्वस्थता आहे. सध्या जे टोकाचे राजकारण सुरू आहे. ते निंदनीय आहे. आई-वडिलांच्या सेवेत मुले कमी पडत आहेत; परंतु दिनदुबळ्यांची, पीडितांची सेवा ख्रिस्ती समाज करतोय, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यामुळे ख्रिस्ती समाजाच्या माणुसकीच्या लढ्यात मी खंबीरपणे साथ देण्यास तयार आहे. महेंद्रशेठ घरत यांची दिनदुबळ्यांना मदत करण्याची भूमिका लाजवाब आहे. असा नेता आपल्याला लाभणे, हे सुद्धा भाग्यच आहे. त्यांच्याविषयी माझ्या मनात नितांत आदर कायम राहील," असे उरणच्या नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर ख्रिस्ती समाजाला संबोधित करताना उलवे नोड येथील 'भूमिपुत्र भवन' येथे म्हणाल्या.

यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील, माजी नगरसेविका अफशा मुकरी आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ख्रिस्ती समाजाच्या शांती मेळाव्यासाठी महेंद्रशेठ घरत यांनी दोन दिवसांसाठी 'भूमिपुत्र भवन' प्रायोजित केल्याबद्दल ख्रिस्ती समाजाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.२३ आणि २४ एप्रिल रोजी समस्त उलवे ख्रिस्ती समाजाच्या वतीने एकता सभा झाली. यावेळी प्रेरित राम बाबू यांनी मार्गदर्शन केले. आयोजक बबन कांबळे, धनंजय नाईक, विकी कुलकर्णी, आनंद  मतमारी, प्रल्हाद लकडा आणि त्यांची टीम, तसेच समस्त उलवे ख्रिस्ती समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, कल्याण यांच्या कार्यालयावर शिवसेनेची धडक : नागरिकांच्या वाहतूक समस्यांवर जाब !!

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, कल्याण यांच्या  कार्यालयावर शिवसेनेची धडक : नागरिकांच्या वाहतूक समस्यांवर जाब !!       *कल...