Thursday, 4 June 2026

"बातमीदार माझा"च्या बातमीचा दणका ; केवणी व काल्हेर येथील अवैध रेती साठ्यांवर महसूल विभागाची धडक कारवाई : 23 कुंड्या जमीनदोस्त !!

"बातमीदार माझा"च्या बातमीचा दणका ; केवणी व काल्हेर येथील अवैध रेती साठ्यांवर महसूल विभागाची धडक कारवाई : 23 कुंड्या जमीनदोस्त !!

** मात्र मुख्य रेती चोरांना अभय, कारवाई नाही 

केवणी रेती बंदर येथे कारवाई करताना महसूल अधिकारी व ग्रामीण पोलीस प्रशासन

*भिवंडी, दि. 4 जून 2026, (अरुण पाटील) :

हा"सरळ बातमीदार"च्या "बातमीदार माझा" या अधिकृत पोर्टलवर 1 जून 2026 रोजी केवणी रेती बंदर येथे सुरू असलेल्या अवैध रेती चोरी व वाहतुकीबाबत बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर महसूल विभागाने आज केवणी व काल्हेर रेती बंदर येथील अवैध रेती साठ्यांवर मोठी कारवाई केली. मात्र मुख्य रेती चोर व वाहतूकदारांवर अद्याप कारवाई झालेली नाही.

*23 अवैध कुंड्या नष्ट*  
जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील व उपविभागीय अधिकारी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तहसीलदार अभिजित खोले यांच्या आदेशाने महसूल विभाग भिवंडी व भिवंडी तालुका पोलीस ठाण्याने संयुक्त कारवाई केली. मौजे केवणी रेती बंदर व काल्हेर रेती बंदर येथील राखीव वन व गुरूचरण क्षेत्रात खाडीमधून अनधिकृतपणे उपसा करून साठवलेल्या रेतीच्या कुंड्यांवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली.

या कारवाईत मौजे केवणी रेती बंदर येथील सर्वे क्रमांक 181/अ, क्षेत्र 22.33.39 हेक्टर आर चौ.मी व सर्वे क्रमांक 181/ब, क्षेत्र 08.03.61 हेक्टर आर चौ.मी तसेच मौजे काल्हेर येथील सर्वे क्रमांक 114, क्षेत्र 03.32.85 हेक्टर आर चौ.मी या ठिकाणी उभारलेल्या एकूण 23 अवैध रेती साठवणूक कुंड्या पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आल्या. केवणी येथील 15 व काल्हेर येथील 8 कुंड्यांचा समावेश आहे. या कुंड्यांचा वापर खाडीमधून चोरी करून आणलेली रेती साठवण्यासाठी केला जात असल्याचे महसूल विभागाच्या पाहणीत आढळले. 

*रात्रीच खेळ चाले*
तसेच स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार केवणी रेती बंदर येथे रोज रात्री ८ वा.ते १० वाजे दरम्यान बार्ज व सक्शन पंपाद्वारे बेकायदेशीर उत्खनन केलेली रेती या किनाऱ्यावर खाली केली जाते व त्याच दरम्यान ती त्या ठिकाणावरून जेसीबी यंत्राने विविध डंपर मध्ये भरून पहाटे पर्यंत चोरट्या मार्गाने वाहतूक केली जाते.

*रातोरात रेती गायब*  
3 जून 2026 च्या रात्री केवणी रेती बंदर येथे जवळपास 800 ते 1000 ब्रास रेती साठवून ठेवली होती. मात्र 4 जून रोजी महसूल प्रशासन छापा टाकणार असल्याची गुप्त माहिती रेती चोर व वाहतूकदारांना मिळाल्याने त्यांनी ती साठवलेली रेती रातोरात उचलून नेली. त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबत "बातमी गळती" करणाऱ्या व्यक्तीला शोधून त्याच्यावर पहिली कारवाई करावी, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

*माफियांच्या साखळीला धक्का*  
या कारवाईमुळे अवैध रेती चोर व बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या साखळीला मोठा धक्का बसला असून रेती माफियांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने यापूर्वीही भिवंडी तालुक्यात अवैध रेती उत्खन, वाहतूक व साठवणुकीविरोधात वारंवार कारवाया करून गुन्हे दाखल केले आहेत. मात्र गुन्हे मुख्य आरोपींविरोधात न करता बार्ज व सक्शन पंपावर काम करणाऱ्या गरीब मजुरांवरच दाखल केले जात असल्याचा आरोप होत आहे.

*कारवाईत सहभागी यंत्रणा*  
या कारवाईत मंडळ अधिकारी खारबाव, मंडळ अधिकारी भिवंडी, मंडळ अधिकारी आनगाव, मंडळ अधिकारी राहूर यांच्यासह त्यांच्या अधीनस्थ सर्व ग्राम महसूल अधिकारी, कांदळवन संधारण घटक ठाणे, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, भिवंडी ग्रामीण पोलीस व नारपोली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, पंचायत समिती भिवंडीचे अधिकारी तसेच संबंधित ग्रामपंचायतींचे ग्राम विकास अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

महसूल विभागाच्या या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत. अवैध रेती उत्खन, वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांना प्रशासनाने कठोर इशारा दिला असून शासनाच्या आदेशानुसार अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात भविष्यातही अधिक तीव्र व सातत्यपूर्ण कारवाया सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

"बातमीदार माझा"च्या बातमीचा दणका ; केवणी व काल्हेर येथील अवैध रेती साठ्यांवर महसूल विभागाची धडक कारवाई : 23 कुंड्या जमीनदोस्त !!

"बातमीदार माझा"च्या बातमीचा दणका ; केवणी व काल्हेर येथील अवैध रेती साठ्यांवर महसूल विभागाची  धडक कारवाई : 23 कुंड्या जमीनदोस्त !! ...