चार दशकांच्या सेवेला सलाम; झुंजार कामगार नेते मंगल डोंगरे यांचा गौरवपूर्ण सेवापूर्ती सोहळा..
मुरबाड (प्रतिनिधी) : कामगार चळवळ, पत्रकारिता आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ पत्रकार तथा कामगार नेते मंगल दादा डोंगरे यांनी तब्बल ३९ वर्षे ९ महिने आणि १७ दिवसांच्या सेवेनंतर ३१ मे रोजी सेवेतून निवृत्ती स्वीकारली. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त मुरबाड मध्ये आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभाला भावनिक स्वरूप प्राप्त झाले.
मुरबाड तालुक्यातील गोरख मचिंद्र गडाच्या पायथ्याशी वसलेल्या "खोपीवली"या गावी,, ग्रामीण भागातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रवास सुरू करणाऱ्या मंगल डोंगरे यांनी १३ ऑगस्ट १९८७ रोजी मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील ब्लास्ट कार्बो ब्लॉक्स प्रा. लि. कंपनीत नोकरीला सुरुवात केली. नोकरी सांभाळत असतानाच त्यांनी पत्रकारिता, कामगार चळवळ आणि समाजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
कामगारांच्या न्यायहक्कांसाठी लढा, बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, गोरगरिबांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे, शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत नेणे, तसेच सामाजिक अडचणींमध्ये मदतीचा हात देणे ही त्यांची कार्यशैली राहिली. कोरोना काळातही त्यांनी जीवाची पर्वा न करता अनेक गरजूंना मदत केली.
पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी व्हॉईस ऑफ मीडिया, पत्रकार सुरक्षा समिती, ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ यांसारख्या संघटनांमध्ये विविध पदांवर काम करत शेकडो पत्रकारांना संघटित केले. तर कामगार क्षेत्रात महाराष्ट्र मजदूर संघासह विविध संघटनांमध्ये नेतृत्वाची धुरा सांभाळली.
त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना आदर्श पत्रकार, समाजभूषण, समाजरत्न यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तर शिर्डी येथे तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आदर्श पत्रकार पुरस्कार, तसेच पंढरपूर येथे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून निवडलेल्या सहा जिल्हाध्यक्ष मध्ये कोकण मुंबई विभागातून उत्कृष्ट जिल्हा अध्यक्ष म्हणून राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या कार्याला राज्यस्तरीय गौरव प्राप्त झाला.
सेवापूर्ती निमित्त कंपनीत आयोजित सत्कारानंतर मित्रपरिवार, नातेवाईक,सहकारी, पत्रकार, आणि सामाजिक कार्यकर्ते व कुटुंबीयांनी ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून त्यांना भावपूर्ण निरोप दिला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत, समाजसेवेची त्यांची वाटचाल अशीच अविरत सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
"नोकरीतून निवृत्ती झाली असली तरी समाजसेवेच्या प्रवासातून नाही," अशा शब्दांत उपस्थितांनी मंगल डोंगरे यांच्या कार्याचा गौरव केला.
No comments:
Post a Comment