पावसाळ्यात सर्वाधिक पुराचा धोका असलेल्या म्हारळ, वरप कांबा या गावांसाठी एनडीआरफ टिम तैनात करण्याची मागणी!
कल्याण (संजय कांबळे) 26 जुलै 2005 पासून प्रत्येक वेळी पुराचा सर्वाधिक धोका असलेल्या म्हारळ वरप कांबा पावशेपाडा या गावासाठी एनडीआरफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बल तैनात करण्यात यावे अशी मागणी म्हारळ गावातील कल्याण पंचायत समितीच्या सदस्यां श्रीमती अस्मिता अजय जाधव यांनी आज झालेल्या पंचायत समितीच्या बैठकीत केली असून याला सभापती रंजना देशमुख यांच्यासह सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला.
26/27 जुलै ला महाराष्ट्रात महापूर आला होता. यावेळी कल्याण तालुक्यातील म्हारळ वरप कांबा पावशेपाडा रायते मानिवली, सांगोडा, आपटी, मोहना आंबिवली मोहिली आदी अनेक गावांना पुराचा जबरदस्त फटका बसला होता. यावेळी जिवीत हानी सह वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली होती. म्हारळ वरप कांबा पावशेपाडा या गावातील काही सखल भागात पाणी भरत होते. पण आता म्हारळ ग्रामपंचायतीचे हद्दीतील उल्हास नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून थारवानी, पोद्दार आदी बिल्डरांनी टोलेजंग इमारती उभ्या केल्या आहेत. त्यामुळे आता दरवर्षी या तीन गावातील नागरिकांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसतो. अगदीच मागील वर्षी आलेल्या पुरामुळे म्हारळ गावातील बोडके चाळ, राधाकृष्ण नगरी, आण्णासाहेब पाटील नगर, अनुसया नगर, गोकुळ काॅलनी, सुर्या नगर, दशरथ नगर, नारायण नगर, बेस्ट काॅलनी, तर वरप मधील गावभाग, साईबाबा नगर, शिवशक्ती नगर, दुर्गानगर तर कांबा ग्रामपंचायत हद्दीतील मोरया नगर, गावाचा पुर्व पश्चिम भाग पावशेपाडा आदी भागात पुराचे पाणी घुसल्याने अतोनात नुकसान झाले तर काही व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला होता. यावर्षी कोरोनोच्या महामारीने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे, अशातच निसर्ग चक्रीवादळाने अनेकांच्या मनात धडकी भरवली. यावेळी पाऊस जोरदार असल्याचे हवामान विभागाने सांगितले होते.
म्हारळ वरप कांबा पावशेपाडा ही गावे उल्हास नदीच्या काठावर वसलेले आहेत. नदीपात्रात झालेल्या अनाधिकृत बांधकामांमुळे नदी पात्र दिवसेंदिवस अरुंद होत आहे याचाच परिणाम म्हणून पाणी नदीपात्राबाहेर येवून या गावात घुसते. त्यामुळे ही गावे पावसाळ्यात संवेदनशील असतात यावेळी देखील पुराच्या पाण्याचा धोका लक्षात घेऊन या गावासाठी "एनडीआरफ" ची टिम तयार ठेवावी अशी आग्रही मागणी म्हारळ च्या पंचायत समितीच्या सदस्यां श्रीमती अस्मिता अजय जाधव यांनी केली. आणि ती अगदी रास्त आहे. त्यामुळे कल्याण पंचायत समितीच्या "गतीमान" प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन शासनास कळवून त्याचा पाठपुरावा करावा अन्यथा" बैल गेला अन झोका केला अशी अवस्था होईल.

No comments:
Post a Comment