'केबीसी'मधील लकी ड्रॉच्या मेसेजने हूरळून जाऊ नका,फसवणूक होऊ शकते ; महाराष्ट्र सायबर चे आवाहन.
मुंबई, - कौन बनेगा करोडपती (केबीसी) या स्पर्धेत तुम्हाला पारितोषिक मिळालेले आहे. तुम्हाला लकी ड्रॉ लागला आहे. तुम्हाला कार गिफ्ट मिळणार आहे. अशा प्रकारचे मेसेज आले अथवा +92 या क्रमांकाने सुरु होणा-या नंबरवरून फोन आल्यास हुरळून जाऊ नका. तो तुमचे बँक खाते रिकामे करण्यासाठी लावलेला सापळा असू शकतो. त्यामुळे खातरजमा करूनच प्रत्येक वेळी ऑनलाईन आर्थिक व्यवहार करा. तसेच आपल्या बँक खात्याची माहिती कुणालाही शेअर करू नका, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात आले आहे.
सायबर भामट्यांद्वारे ऑनलाईन आर्थिक फसवणूकीचे गुन्हे केले जात आहेत. या गुन्ह्यांमध्ये सध्याच्या काळात वाढ झाली आहे. त्यात या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न आपले शेजारील देश देखील करीत आहेत.
बऱ्याच लोकांना +92 या अंकांनी सुरु होणाऱ्या मोबाईल क्रमांकावरून कॉल येतो किंवा व्हाट्सअँप मेसेज अथवा एसएमएस येतो.
त्या कॉलवरील व्यक्ती तुम्हाला सांगते कि ‘तुम्हाला कौन बनेगा कोरोडपती’ या सुप्रसिद्ध खेळामध्ये काही रकमेचे पारितोषिक मिळाले आहे. त्या पारितोषिकाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करायची आहे.
त्यासाठी तुमच्या बँक खात्याची सर्व माहिती पाहिजे, असे म्हणून नागरिकांच्या क्रेडिट व डेबिट कार्डांचे पिन क्रमांक देखील घेतले जातात. त्याद्वारे बँक खात्यातून परस्पर पैसे ट्रान्सफर करून फसवणूक केली जाते.
अशाच आशयाचा संदेश तुम्हाला व्हाट्सअँप किंवा ,एसएमएस,वर येतो. त्यात लिंक दिलेली असते. त्या लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला एक फॉर्म भरायला सांगितला जातो. त्यामध्ये तुमचे सर्व बँक खात्याचे डिटेल्स मागितले जातात.
ते सर्व भरले कि confirmation करता +92 या अंकांनी सुरु होणाऱ्या मोबाईल क्रमांकावरून एक कॉल येतो. कॉलवरील व्यक्ती बोलता बोलता त्याच वेळेस नागरिकांच्या फोनवर आलेला ओटीपी (वन टाइम पासवर्ड) विचारतो.
आपण जर ओटीपी दिला तर कॉल disconnect होतो. त्यानंतर काही वेळेतच आपल्याला लक्षात येते कि, आपल्याच खात्यातून काही रक्कम दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर झाली आहे.
याच गुन्ह्याचा दुसरा प्रकार म्हणजे अश्याच +92 या अंकांनी सुरु होणाऱ्या मोबाईल क्रमांकावरून कॉल येतो. सदर कॉलवरील व्यक्ती तुम्हाला सांगते कि, ‘तुम्हाला लकी ड्रॉमध्ये एक कार मिळाली आहे.
तुम्ही त्याकरिता एका विशिष्ट खात्यामध्ये त्या गाडीच्या transportation चा खर्च व टोलचा खर्च म्हणून एक ठराविक रक्कम जमा करा. नंतर तुम्हाला गाडीची डिलिव्हरी दिली जाईल’.
तुम्ही रक्कम भरल्यावर त्या मोबाईल क्रमांकावर परत कॉल करायचा प्रयत्न केल्यास तो नंबर अस्तित्वात नसतो.
अशा प्रकारच्या फसवणुकीवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभाग लक्ष ठेऊन आहे. +92 या अंकांनी सुरु होणाऱ्या मोबाईल क्रमांकावरून येणारे कोणतेही फोन कॉल्स उचलू नका.
अशा नंबरवरून येणाऱ्या मेसेज मधील लिंकवर क्लिक करू नका. तसेच कोणत्याही लिंकवर किंवा कोणत्याही अनोळखी व्यक्तीस आपल्या बँक खात्याची सर्व माहिती, डेबिट/क्रेडिट कार्ड डिटेल्स शेअर करू नका, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाने केले आहे.
जर कोणत्याही व्यक्तीस वरील नमूद मजकूर असणाऱ्या आशयाचे मेसेजेस आले तर घाबरून जाण्याचे कारण नाही.
आपण आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची तक्रार नोंदवा व www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर देखील याची माहिती द्या, असे आवाहनही महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे
No comments:
Post a Comment