माणगांव नगरपंचायतीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांचे नाक कायम मुठीत !
माणगांव नगराध्यक्षा, नगरसेवक याकडे लक्ष देतील का ? नागरिकांचा संतप्त सवाल...
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : रायगड जिल्ह्यातील माणगांव नगरपंचायतीच्या हद्दीत माणगांव निजामपूर रोडवर रेल्वे ब्रीज खालील रहदारीच्या रस्त्यावरून गटाराचे दुषित पाणी कायम वाहत असल्यामुळे या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. सदर गटाराच्या दुषित पाण्यामुळे माणगांव शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवू शकते. त्यामुळे माणगांव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आणि नगरसेवक या गंभीर बाबीकडे लक्ष देवून या समस्येचे कायमचे निराकरण कधी करणार याकडे माणगांव शहराच्या निजामपूर परिसरातील सर्व निवासी नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
सद्या कोरोना व्हायरस तथा कोवीड १९ या संसर्गजन्य रोगाच्या सर्वव्यापी संसर्गामुळे संपूर्ण जगात व आपल्या भारत देशासह महाराष्ट्र राज्यात आणि रायगड जिल्ह्यात तसेच माणगांव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत चालली असताना माणगांव नगरपंचायतीने अशा प्रकारे माणगांव शहरातील निजामपूर रोडवरील या सतत वाहणाऱ्या दुषित गटार गंगेकडे आणि नागरी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून चालढकल करणे योग्य नाही. माणगांव नगरपंचायतीच्या अशा बेजबाबदार वर्तनामुळे माणगांव शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात यायला वेळ लागणार नाही. या मधून साथीचे आजवर उद्भवून नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास या अनपेक्षित गोष्टीला सर्वस्वी माणगांव नगरपंचायत जबाबदार ठरू शकते. एखादी दुर्दैवी घटना घडून गेल्यावर पश्चात्ताप करण्यात काही अर्थ नसतो. त्यामुळे त्या संबंधीच्या सर्व उपाययोजना वेळीच करणे गरजेचे असते.
माणगांव निजामपूर रोड वरील रेल्वे ब्रीज खालील सदर ठिकाणा लगत माणगांव नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कचरा संकलन कुंडीची व्यवस्था केली असल्याने या परिसरातील सर्व नागरिकांच्या घरातील दैनंदिन सुका ओला कचरा या ठिकाणी नेहमी टाकला जातो. सदर कचरा माणगांव शहरातील भटकी जनावरे आणि कुत्री आपले पोट भरण्याच्या उद्देशाने कुंडी बाहेर काढून अस्ताव्यस्त करून विस्कटून टाकतात. हा अस्ताव्यस्त झालेला कचरा या रस्त्याच्या बाजूने वाहणाऱ्या गटाराच्या दुषित पाण्यात मिसळून कचरा आणि हे दुर्गंधीयुक्त दुषित पाणी नेहमी रहदारीच्या रस्त्यावर येते आणि या रहदारीच्या रस्त्यावर असलेल्या मोठ मोठ्या खड्यात साचते त्यामुळे या रस्त्यावरून दररोज येजा करणार्या नागरीकांना आणि वाहन चालकांना या ठिकाणी नाक मुठीत घेऊन पुढे मार्गक्रमण करावे लागते. तर कधी कधी रस्त्यावरील दुषित पाणी बाजूने जाणाऱ्या वाहनांच्या रहदारीमुळे नागरिकांच्या अंगावर उडते. या सर्व समस्यांना माणगांव शहरातील निजामपूर विभागात राहणार्या नागरिकांना व या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे माणगांव नगरपंचायतीच्या संबंधित विभागाने या गंभीर समस्येवर योग्य त्या उपाययोजना करून सदर समस्येचे तात्काळ निराकरण करावे अशी माणगांव शहरातील तमाम नागरिकांची रास्त मागणी आहे.

No comments:
Post a Comment