१२ ऑगस्टला 'वंचित'कडून डफली बजाव आंदोलन;
लॉकडाउनच्या विरोधात राज्यभर डफली वाजवणार !
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) विश्वास गायकवाड केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभर डफली वाजवण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर दिवसभर डफली वाजविण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्यातील बाजार समिती, व्यापारी, रिक्षा, दुकानदार, फेरीवाले, लोहार, न्हावी, चांभार इ. संघटनांना भेटून या आंदोलनात सामील होण्याची विनंती करावी, असेही आवाहन त्यांनी केलंय. या आंदोलनानंतर सर्वसामान्य नागरिकांना भेटून त्यांना या आंदोलनाचे महत्व सांगावे शिवाय लॉकडाऊनला विरोध का आहे?, हेही समजावून सांगावे असे ही प्रकाश आंबेडकर यांनी शेवटी सांगितले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.
सदर राज्य स्तरीय डफली बजाव आंदोलनाचा पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातल्या वंचित बहुजन आघाडी सर्व पदाधिकारी, सदस्य, विद्यार्थ्यांनी,हितचिंतक, यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्या आणि जिल्ह्यातल्या स्थानिक आघाड्यां सोबत संपर्कात राहून, हे आंदोलन यशस्वी करण्यात यावे या अॅड. बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाचे रायगड जिल्ह्यात देखील पालन करावे अशी सूचना वंचित बहुजन आघाडी चे रायगड जिल्हा अध्यक्ष मा,विश्वतेज साळवी आणि रायगड जिल्हा महासचिव सागर भालेराव यांच्या मार्फत देण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment