जागतिक अदिवासी दिना निमित्त माणगांव, तळा, रोहा आणि पाली मध्ये रानभाज्या महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा !
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) ०९ ऑगस्ट अर्थात जागतिक अदिवासी दिन या दिनाचे औचित्य साधून उप विभागीय कृषी अधिकारी माननीय मिलिंद जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली माणगांव, तळा, रोहा आणि पाली या तालुक्यात रानभाज्या महोत्सव साजरा करण्यात आला. सदर रानभाज्या महोत्सवात उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद जाधव साहेब यांनी रानभाज्या आणि त्यांचे मानवी आहारातील महत्त्व या संदर्भात उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. पावसाळी हंगामात रानावनात, डोंगर दर्यात नैसर्गिक पद्धतीने उगवणार्या औषधी गुणधर्म असलेल्या सर्व प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन रानभाज्या महोत्सवात कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर माणगांव तालुक्यात उप विभागीय कृषी अधिकारी माननीय श्री मिलिंद जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली माणगांव तालुका कृषी अधिकारी माननीय श्री. नवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले होते.
सदर रानभाज्या महोत्सवात माणगांव तालुक्यातील गांगवली आदिवासी वाडी येथील जिजाऊ शेतकरी महिला गटातील पार्वती हिलम, सुरेखा वाघमारे आणि त्यांच्या सहकारी महिलांनी पावसाळी हंगामात रानावनात, डोंगर माथ्यावर नैसर्गिक पद्धतीने उगवणार्या टाकळा, कुर्डु, अळू, कुड्याच्या शेंगा, भारंगा, आकुड, सेऊल, दिंडा, करटोली, बांबूचे कवळे कोंब, अळंबी, रानमाठ, पात्री,मसाल्याची पाने इत्यादी वनौषधी रानभाज्या या महोत्सवात प्रदर्शित केल्या होत्या.
पावसाळ्यात नैसर्गिक पद्धतीने उगवणार्या रानभाज्या अत्यंत पौष्टिक असून त्यांच्या मध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात आणि आहारात आपण या रान भाज्यांचा संतुलित आहार म्हणून वापर केला पाहिजे. रान भाज्यांच्या माध्यमातून आपल्या आदिवासी समाजाला रोजगार उपलब्ध होत असतो. आपला आदिवासी समाज पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर रानावनात, डोंगर दर्यात फिरून संपूर्ण जंगल पायाखाली तुडवून या औषधी गुणधर्म असलेल्या दुर्मिळ वनौषधी रानभाज्या आपल्या साठी आपल्या दारावर किंवा जवळच्या बाजारात घेऊन येतात. म्हणून या औषधी गुणधर्म असलेल्या रान भाज्यांचा समावेश आपण आपल्या दैनंदिन आहारात केला पाहिजे. असे उपविभागीय कृषी अधिकारी श्री मिलिंद जाधव साहेब आणि माणगांव तालुका कृषी अधिकारी श्री. पी. बी. नवले साहेब यांनी सदर कार्यक्रमात उपस्थितांना आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.
सदर रानभाज्या महोत्सव कार्यक्रमात माणगांव तालुक्यातील गणेश शिगवण, सुरेश पवार, तुकाराम तेटगुरे, बाळाराम उभारे,सुरेश मुंढे, नामदेव कासारे, मधुकर शिवदे इत्यादी शेतकरी आणि कृषी विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment