फक्त दोन दिवसाच्या पावसाने रस्त्यांची दुर्दशा, सर्व विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपयश !!
"वाहतूक कोंडी, अपघातांची भिती, अधिकारी निर्धास्त"
ठाणे, संदिप कदम : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्य़ातील सर्वच शहर परिसर तसेच ग्रामीण भागात रस्त्यांची चाळण झाली आहे. पावसाच्या माऱ्यामुळे डांबर, खडी वाहून गेल्याने रस्त्यांमध्ये पाण्याची डबकी तयार झाली आहेत. अशा रस्त्यांवरून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलेल्या खड्डय़ांच्या खोलीचा अंदाज न आल्याने दुचाकी किंवा छोटी वाहने अडकून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.
ठाणे शहरात घोडबंदर, वागळे इस्टेट तसेच अंतर्गत मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. तीन हात नाका चौकात खड्डे पडले असून यामुळे या चौकातून वाहतूक करणाऱ्या चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे. माजीवाडा चौक, मीनाताई ठाकरे चौक या ठिकाणीही खड्डे पडले असून यामुळे या चौकांमध्ये काही प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. घोडबंदरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाण पुलाच्या मार्गिकेवरही खड्डे पडले आहेत. कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर या शहरात सुध्दा अंतर्गत रस्त्यांची परिस्थिती वाईट आहे. भिवंडी येथील काल्हेर तसेच मानकोली परिसरातही ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. भिवंडी चिंचोटी रस्ता, कल्याण पडघा रस्ता, बापगाव सोनाळे रस्ता, बदलापूर मुरबाड रस्ता, शहापूर मुरबाड रस्ता, शहापूर सरळगाव रस्ता मुंब्रा येथील शिळफाटा मार्गावरील वाय जंक्शन, खान कंपाऊंड परिसरात खड्डे असुन, डोंबिवलीतील मानपाडा, सुभाष रोड, कल्याण-मुरबाड मार्ग, बदलापूर आणि अंबरनाथमधील बारवी धरण रस्ता, शिरगाव रस्ता या ठिकाणी खड्डे पडले आहेत. भिवंडीतील मानकोली तसेच अन्य भागात असलेले खड्डे.
दरवर्षी उद्भवणारी ही समस्या या सर्वांसाठी असलेले सार्वजनिक बांधकाम विभाग (जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, महाराष्ट्र शासन व इतर) फक्त स्वत:च्या कर्तृत्वाला दोष न देता सगळी जबाबदारी पावसावर ढकलून मोकळे होतात. यांना गेल्या वर्षी न्यायालयाने खडसावले असुनही वरिष्ठ अधिकाऱ्यांची साथ असल्याने हे निर्धास्त झाले आहेत.
अशा खड्ड्यांमुळे होत असलेली वाहतूक कोंडी, अपघात याला निमंत्रण मिळते. यावर व अशा अधिकाऱ्यांवर आता राज्य सरकारने नियंत्रण आणणे गरजेचे आहे.

No comments:
Post a Comment