उशीद ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी प्रवीण भोईर बिनविरोध, निवड होताच कामांना सुरुवात !
कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील उशीद ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी प्रवीण भोईर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. निवड होताच त्यांनी विविध प्रकारच्या विकास कामांना प्राधान्य दिले असून मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचे उद्घाटन करण्यात आले.
कल्याण आणि शहापूर तालुक्याच्या बाॅर्डरवर उशीद हे गाव वसले आहे. शेतीप्रधान म्हणून ओळखले जाणारे हे गावाच्या शेजारुन मुंबई नागपूर समृद्धी महामार्गामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. 7सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीचा एक ते सव्वा वर्षाचा कालावधी राहिला असताना सरपंच पदाची निवडणूक जाहीर झाली होती. सर्व सदस्यांनी एकत्र येऊन सरपंच पद बिनविरोध द्यायचे निश्चित केले. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे सरपंच पदी तरुणतडफदार सदस्य प्रवीण भोईर यांची बिनविरोध निवड केली. सकाळी अकरा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ देण्यात आली होती. विहित मुदतीत सरपंच पदासाठी कोणाचाही इतरांचा अर्ज सादर न झाल्याने दुपारी दोन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी श्रीसंत यांनी प्रवीण भोईर यांची उशीद ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी ग्रामसेवक विलास मिरकुटे नवनियुक्त सरपंचांचे स्वागत केले.
यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ जाधव यांनी मार्गदर्शन केले तर या प्रसंगी कल्याण पंचायत समितीचे उपसभापती रमेश बांगर, पत्रकार संजय कांबळे, दिपक भोईर, काकडपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण चौधरी, ग्रामपंचायत सदस्या सुरेखा भोईर, अश्विनी भोईर, कमळाबाई विशे, रंजना भोईर, दिनेश भोईर, महिला बचत गट, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी गावातील रस्ता व स्मशानभूमी सुशोभीकरण या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. आपण गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच प्रवीण भोईर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment