आंगवली स्मशानभूमीला अधिकृत रस्ताच नाही; स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी !
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
देश स्वतंत्र होऊन आज अनेक वर्षे झाली तरीही रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील मु.पो.आंगवली गावामधील स्मशानभूमीला आजपर्यंत अधिकृत असा पक्का कायम स्वरुपी रस्ता नसल्याने प्रेत घेऊन जाताना ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. स्मशानभूमीकडील मार्गावर अनेक ठिकाणी पक्की काटेरी तारांची कुंपणे आहेत. पावसाळ्यात प्रेत घेऊन जाताना वाट शोधावी लागते. कारण रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असते. पावसाळ्यात हे खड्डे दलदलयुक्त असल्याने प्रेत घेऊन जाताना ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागते. आपल्याकडे पैसे, जमीन, गाड्या, बंगले कितीही असोत पण आयुष्याचा अंतिम प्रवास जर व्यवस्थित करता येत नसेल तर या बेगडी श्रीमंतीचा काय उपयोग आहे? जग सोडून जाताना जमीन, पैसा, गाड्या, बंगले बरोबर घेऊन कोणालाही जाता येत नाही.आयुष्याचा प्रवास स्मशानभूमीत संपणार आहे. मात्र तरीही स्मशानभूमीला अधिकृत कायम स्वरुपी पक्का रस्ता नाहीही मोठीच शोकांतिका आहे. मृतात्म्यांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली किंवा आदरांजली वाहण्यापेक्षा स्मशानभूमीच्या कायम स्वरुपी रस्त्यांसाठी जमीन उपलब्ध करून पक्का रस्ता करून खरीखुरी मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात यावी एवढीच माफक अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
आंगवली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात वेगवेगळ्या प्रकारची विकास कामे करणा-या ग्रामपंचायतीला व इतर राजकीय पुढारी लोकांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. म्हणून आंगवली गावातील जागृत नागरिक प्रकाश सखाराम खांडेकर व अन्य ग्रामस्थांनी संगमेश्वर (देवरूख) तहसीलदारांना (सन्मा.सुहास थोरात) निवेदन देऊन आंगवली स्मशानभूमीला अधिकृत कायम स्वरुपी पक्का रस्ताची मागणी केली आहे. याशिवाय त्याची प्रत आंगवली गावचे सरपंच यांनाही देण्यात आली आहे. तरी आंगवली गावच्या स्मशानभूमीला आता तरी कायमस्वरुपी पक्का रस्ता व्हावा अशी आंगवली गावातील ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
No comments:
Post a Comment