आरक्षणाने हक्क मिळणारच, प्रसंगी गुणवत्तेच्या जोरावर मिळवू - 'शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष अविनाश सावंत'.
बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : आज केवळ महाराष्ट्राचेच नव्हें तर साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दिल्लीस्थित सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची आज सुनावणी होऊन एक धक्कादायक निर्णय देउन SEBC आरक्षण रद्द झालें किंबहुना ते रद्दच व्हावें अशीही एक राजकीय व्यवस्था करण्यांत आली होती.
खरें म्हणजे ह्या प्रकरणाचे संपूर्णतः सुरुवातीपासूनच ह्या संदर्भातील अवलोकन केले असता अनेक कंगोरे समोर येत आहेत. मराठा आरक्षणाचा जोर का वाढू लागलाय, तत्कालीन आणि विद्यमान राजकीय दुरावस्था का ह्या समाजाला नडली, अनेक पुढाऱ्यांनी केलेले सोयीचे बेरजेचे राजकारण, भावी पिढीला नोकरी व्यवसायातील भेडसावणाऱ्या अमर्याद समस्या, गुणवत्ता असूनही इतरांच्या आरक्षणामुळे व मर्यादित जागांमुळे होणारी गळचेपी आणि त्यातूनच तरुण पिढीला ग्रासणारी नैराश्यासुदृष परिस्थिती, वरचढ शिक्षण घेऊनही अधांतरीच असलेले भवितव्य ह्या व ईतर अनेक बाबींचा सखोलपणे अभ्यास केला तर आणि तरच ह्यांतील खरी मेख मराठ्यांना समजेल. पण आत्ता वेळ गेलेली आहे, आजच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे सर्वच काहीं संपलेले आहे, आत्ता परत एकदा मुहतोड एल्गार करावा लागेल अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह होऊन परत नवी विटी नवी दांडू असा खेळ सुरू होईल. ह्या वरील सर्व बाबीं मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक आहेतच किंबहुना हे सर्व झालेच पाहिजे अशी धारणा अंतःकरणापासून आहेच. कालही होत्या, आजही आहेत आणि उद्यापण असणारच.
परंतु आजच्या पिढीने ही संपुर्ण वास्तववादी परिस्थिती विचारात घेता, अवलोकन करता आणि जरा थोडेसे भविष्याबाबत सकारात्मक पाहिले असता तर अनेक गोष्टींचा मार्ग सापडेल, भविष्याच्या दिशेने एकमेकांच्या साथीने असे नवनवीन शासकीय, खाजगी, सामुहिक, उपक्रम राबवित आलेल्या नैराश्याच्या गर्तेतून तावून सुलाखून बाहेर पडून एक नवीन पहाट पाहू शकतो आणि जिवनाची सुखकारक प्रगती करू शकतो हेही आजच्या घडीला तितकेच खरे आहे.
मराठा समाज हा उर्जावान समाज आहे. मराठा समाजातील तरुणांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. कौशल्य आहे. लाथ मारेन तिथं पाणी काढण्याची क्षमता आहे. संकटात संधी शोधून तिचं सोनं करणारा समाज ही त्याची ओळख आहे. एकदा का मनात आणलं तर मराठा जिद्दीच्या जोरावर हवं ते मिळवतोच हा त्याचा इतिहास आहे. शेकडो संकटे आली तरी मराठा खचून जात नाही. तो पुन्हा उठतो, आत्मपरीक्षण करतो आणि भविष्याची दिशा ठरवून ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करतो. परिस्थिती कितीही विरोधात असो, त्या परिस्थितीला वाकवून यशाचे शिखर सर करण्याचा संदेश शिवछत्रपतींनी मराठ्यांच्या मनावर कोरला आहे.
ज्या गोष्टी आरक्षणाने मिळणार होत्या त्याच आता आपण गुणवत्तेच्या जोरावर मिळवू. पण खचून जाणार नाही की आजूबाजूच्या नैराश्य वाढवणाऱ्या वक्तव्यांकडे लक्ष देणार नाही. कुणाच्या चिथावणीला बळी पडून भडकून जाणार नाही. कायदा हातात घेणार नाही. कुणाच्या स्वार्थी राजकारणाचा भाग बनणार नाही. आता एकदिलाने आणि नेकीने शून्यातून स्वर्ग निर्माण करायचा आहे.
आजच्या घडीला सर्वोच्च न्यायालयानेच जर आरक्षणाची वाट आमच्यासाठी (तात्पुरती बोलूया) बंद केली असेल तर मग आता स्वतःच्या वाटा स्वतः निर्माण कराव्या लागणार आहेत. अनेक क्षेत्रातील संधी खुणावत आहेत. लॉकडाऊन काळातही अनेक उद्यमशील तरुण तरुणींनी स्वतःचे उद्योगधंदे सुरू केले आहेत. आत्ता येईल त्या परिस्थितीला सामोरे जाऊन अनेक सकारात्मक विचारसरणीने त्या सर्वांवर मात करून एक नवी उद्योजकीय समाजव्यवस्था आपणांस निर्माण करावी लागेल आणि तर आणि तरच आपण खऱ्या अर्थाने ह्या सर्व आरक्षणच्या अनुषंगाने होणाऱ्या चढउतारांच्या बाबतींत आपण आत्मसन्मानाने तग धरू शकु ह्याबाबतीत कोणतेही दुमत नाही.
आपण प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा राग, चीड, खदखद सकारात्मक मार्गाने बाहेर आणू. त्यासाठी एक यंत्रणा काम करतेच आहे पण आता जरा अधिक वास्तववादी सकारात्मक बनून अजून कष्ट करू, अजून खस्ता खाऊ, एकमेकांशी व्यवसायिक साखळी बनवू पण कोणत्याही परिस्थितीत हार न मानता यश मिळवूच आणि आपल्या मूलभूत गुणवत्तेच्या आधारावर ह्या आरक्षणावर मात करू एवढेच येथे आज ह्या निकालावर सांगता येते.
No comments:
Post a Comment