सामाजिक समतेचे पुरस्कर्ते आरक्षणाचे जनक वंदनीय लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज !
आपल्या महाराष्ट्र राज्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखी अनेक नररत्ने लाभली आहेत. या नररत्नांच्या मालिकेतील अत्यंत मौल्यवान रत्न व ज्यांचे नाव अभिमानाने घ्यावे असे आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे नाव घेताच सर्व बहुजन समाजाची छाती अभिमानाने फुगते ते आम्हा बहुजनांचे राजे छत्रपती शाहू महाराज, समाजात सामाजिक समता प्रस्थापित करून सर्व बहुजन समाजाला बरोबरीचे स्थान आणि मान सन्मान मिळाला पाहिजे या साठी आपल्या कोल्हापूर करवीर संस्थानात बहुजन समाजाला सर्व प्रथम पन्नास टक्के आरक्षण बहाल करून प्रतिनिधित्व देणारे लोकराजे राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देणारे रत्नपारखी राजे छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी विदेशातून बॅरिस्टर ही प्राप्त केल्यानंतर आपल्या कोल्हापूर करवीर संस्थानात हत्ती वरून साखर वाटणारा महान दूरदृष्टी असलेला पुरोगामी विचारसरणीचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. समाजातील स्पृश्य अस्पृश्यतेला मूठमाती देण्यासाठी आणि सवर्ण समाजाचा अस्पृश्य समाजाकडे बघण्याचा हिणकस दृष्टीकोन बदलण्यासाठी गंगाराम नावाच्या महार जातीतील एका गरीब व्यक्तीला आपल्या कोल्हापूर करवीर साम्राज्यात स्वतः च्या खर्चाने त्या काळी हॉटेल तथा उपहारगृह टाकून देणारे आणि त्या हॉटेल मध्ये दररोज न चुकता चहा आणि अल्पोपहार करण्यासाठी आवर्जून जाणारे उच्च कोटीच्या विचारसरणीचे राजे म्हणजे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या महान क्रांतिकारी विचारांना कोटी कोटी प्रणाम !
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर करवीर संस्थानातील सर्व परिस्थिती स्वतः जातीने समजून त्यावर उपाययोजना केल्या. शाहू महाराजांनी सुरुवातीला सर्व जातीच्या मुलांना प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून प्रत्येक जातीच्या मुलांसाठी मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली सोबतच वसतिगृह काढले. शाहू महाराजांच्या मनात सामान्य जनतेबद्दल अतिशय कळवळा होता. विशेष करून बहुजन समाजाची तत्कालीन स्थिती सुधारणे हे त्यांचे प्राथमिक ध्येय होते. त्यादृष्टीने पाउले टाकीत त्यांनी सर्वप्रथम त्या समाजातील घटकांना साक्षर करण्याचे पाऊल उचलले. समाजात शिक्षणाचा मोठ्या स्तरावर प्रसार केला.
संपूर्ण कोल्हापूर करवीर संस्थानात मागासलेल्या वर्गांना विकासाच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे, अशी कल्पना महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडली होती, ही कल्पना शाहू महाराजांनी प्रत्यक्षात उतरवली आणि २६ जुलै १९०२ रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानातील मागासवर्गीय जातींना ५० % जागा राखीव करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला.
जातीव्यवस्था ब्राह्मणांची सर्वात मोठी ताकद आणि बहुजनांची सर्वात मोठी कमजोरी बनलेली होती. त्यामुळे संस्थानातील जातिव्यवस्था मोडण्यासाठी शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे नावाच्या एका बहुजन समाजातील व्यक्तीला हॉस्टेलचा शेड उभारून व्यवसाय निर्माण करून दिला. फक्त व्यवसाय उभारून दिला नाही तर दररोज त्यांच्या हॉस्टेल मध्ये स्वतः जाऊन चहा प्यायचे. एवढयातच न थांबता आपल्या संस्थानातील प्रत्येक अधिकारी,कर्मचारी आणि प्रत्येक नागरिकांस त्या हॉटेलमध्ये चहा प्यायला लावायचे. यावरून हे स्पष्ट होते की, शाहू महाराज वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या खालच्या दर्जाच्या लोकांच्या उन्नतीसाठी किती प्रयत्नशील होते.
राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजातील लोकांना पैलवानी कलेत उतरविण्यासाठी "जाठ पैलवान" हि उपाधी देऊन त्यांना प्रोत्साहित केले. चांभारांना 'सरदार' आणि भंग्याना 'पंडित हि उपाधी दिली. सोबत महार जातीच्या लोकांना कमरेला तलवारी लटकावून "शिलेदारी" करण्याची परवानगी दिली. मागासवर्गीस कधीच पुढे येणार नाहीत हे जाणून अस्पृश्यपैकी लक्ष्मण मास्टर आणि गणपत पवार यांना शिवणयंत्र खरेदी करून दिलीत. त्यांच्याकडे कपडे शिवायला कोण टाकणार म्हणून स्वतःच आपले राजवस्त्रे त्यांच्याकडे शिवायला टाकली.
प्राथमिक शिक्षणाची गरज ओळखून शाहू महाराजांनी १९१७ मध्ये मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करून सर्वांसाठी शिक्षणाची दारे सुरु करून दिली. विशेषतः शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणावर जास्त भर दिला. शाहू महाराज एका भाषणात म्हणतात की, शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची प्रगती झालेली नाही, तसेच अज्ञानाच्या प्रवाहात बुडालेल्या देशात लढवय्ये आणि मुत्सद्दी कधीच तयार होणारच नाही म्हणूनच भारताला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची गरज आहे. शिक्षणातून फक्त सुशिक्षित समाज तयार करणे, इतकेच माफक उद्दिष्ट न ठेवता शिक्षण ही परिवर्तनाची गंगोत्री आहे, हे ध्येय बाळगून राजर्षी शाहू महाराजांनी मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मुहुर्तमेढ कोल्हापुरात रोवली.
कोल्हापूर संस्थानात प्लेग आणि दुष्काळात गरीब जनता बेघर होऊन रस्त्यावर आली. तेव्हा त्याच्यासमोर प्रश्न पडला निवाऱ्याचा आणि खाण्यापिण्याचा. त्यामुळे शाहू महाराजांनी अश्या गरीब लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला. कटकोल, पन्हाळा, बाजारभोगाव, गारगोठी, तिरवडा, बांबवडा आणि कोल्हापूर या ठिकाणी गरीब लोकांना राहण्यासाठी आश्रम काढून दिले. औषधे,गोळ्या पुरवून गरीब लोकांच्या आरोग्याचा प्रश्न महाराजांनी मिटवला. त्यांना मायेची ऊब देऊन कपडे लावायला दिले. तसेच अश्या लोकांना खायला धान्य सुद्धा दिले.
भारत हा धर्मनिरपेक्ष असलेला देश. भारतात अनेक धर्म आणि जाती आहेत. वर्षानुवर्षे जातिव्यवस्थेची बंधने इथल्या बहुजन समाजातील लोकांवर लादल्या गेली.. त्यामुळे सर्वप्रथम देशातील जाती नष्ट करण्यात आल्या पाहिजे. जेणेकरून सर्व समाज "भारतीय" म्हणून स्वतःची ओळख देतील. आणि जर भारतीय हि जात सर्वांच्या समोर लागली तर कुणी श्रेष्ठ वा कुणी कनिष्ठ होणार नाही, कुणी स्पृश्य वा अस्पृश्य होणार नाही. जातीव्यवस्थेत कोणताही वर्ण शिल्लक राहणार नाही. त्यामुळे हिंदुस्थानातील जातीभेद नष्ट करून जातींना मातीत गाडले पाहिजे असे शाहू महाराजांचे मत होते.
भारतीय संस्कृती हि पुरुषप्रधान संस्कृती म्हणून ओळखली जाते. यामुळे हजारो वर्षापासून महिलांना दुय्यम स्थान दिले गेले होते. चूल आणि मुलं यामध्येच महिलांचे विश्व सामावले गेले. स्त्री भ्रूणहत्या,विधवा विवाह बंदी, सतीप्रथा, बालविवाह अशी कित्येक तरी वाईट प्रथा महिलांवर अमानुषपणे लादल्या गेल्या होत्या. विधवा विवाह बंदी घातल्यामुळे होणारे सामाजिक दुष्परिणाम तसेच विधवा विवाह कसा आवश्यक आहे याबद्दल शाहू महाराज आपल्या संस्थानात सांगायचे..पुनर्विवाह झाला तर महिलांचे आयुष्य आनंदात जाईलच आणि समाजाकडून होणारे अन्याय,अत्याचार यापुढे होणार नाही असे शाहू महाराजांना वाटत होते.
राजर्षी शाहू महाराजांनी अतिशय बारीकपणे कुटुंबव्यवस्थेचा आणि तेथील ताण-तणावाचा अभ्यास केला होता. स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबले पाहिजे म्हणून शाहू महाराजांनी एक कायदा करून या कायद्याद्वारे स्त्रियांना क्रूरपणे वागविणाऱ्याला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आणि २००/- रुपये दंड म्हणून घेतले जाईल असे नमूद केले. शाहू महाराजांनी ११ जुलै १९१९ मध्ये घटस्फोटाचा कायदा केला. पुरुषप्रधान संस्कृतीत पती कसाही असला तरी चालतो,महिलेचे एकदा लग्न झाले तर ते कायमचे..मग नवरा म्हातारा असो की रोगी संसार करावाच लागत असे. केवळ परंपरा सांगते म्हणून एखाद्या स्त्रीला अमानुष वागणूक मिळू नये यासाठी शाहू महाराजांनी खोलवर विचार केला.
राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात लोकांची गरिबी, पिण्याच्या पाण्याची टंचाई, अज्ञान, श्रीमंताकडून गरीब लोकांची होणारी पिळवणूक, खराब रस्त्याची दुर्दशा जुळवून बघितली होती. हे सर्व बघून शाहू महाराज अस्वस्थ झाले. आपल्या राज्यात सुधारणा झाली पाहिजे या दृष्टीने त्यांनी विचार करायला सुरुवात केली. दुष्काळांच्या काळात एका जागेवरून जीवनावश्यक वस्तू सुरक्षित ठिकाणी पोहचविण्यासाठी रस्त्याची कमतरता होती. रस्ते खराब झालेली होती, तर कुठे तर रस्तेच नसायचे. त्यामुळे शाहू महाराजांनी पक्के रस्ते बांधकाम काम सुरू केले.
राजर्षी शाहू महाराजांनी समाजाने नाकारलेल्या फासेपारधी जमातीचे लोक सामान्य माणसाच्या वस्तीत राहावे म्हणून त्यांना राहण्यासाठी जमिनी दान केल्या. समाजाच्या नजरेत गुन्हेगार जमात म्हणून ओळख असलेल्या,जंगलात राहणाऱ्या मानव जातीला आपल्या समाजाच्या चौकटीत आणले अन् नुसते आणलेच नाही तर त्यांना आईची माया देऊन त्यांचे जीवनमान उंचविले जाऊ शकते ह्यावर महाराजांनी अंमल केला. कुणी विचार करू शकणार नाही असे परिवर्तन महाराजांनी आपल्या राजकीर्दीत करून दाखवले. असा या सामाजिक परिवर्तनाच्या किमयागाराचे महा निर्वाण ६ मे १९२२ ला झाले. अशा महान क्रांतिकारी, परिवर्तनवादी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पवित्र स्मृतीस माझे विनम्र अभिवादन... !
पत्रकार विश्वास बळीराम गायकवाड
बोरघर / माणगांव, रायगड
८००७२५००१२ / ९८२२५८०२३२
No comments:
Post a Comment