कल्याणचे एक्झिक्यूटिव्ह इंजिनीयर म्हणतात,
रस्ता डांबरीकरणासाठी निधीच उपलब्ध नाही !!
टिटवाळा, उमेश जाधव -: करोडो रुपयांचा कर कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला भरूनही पाच वर्षात नागरिकांना खड्डेमय रस्त्यांवर जीव टांगणीला टाकून प्रवास करावा लागत असून नियोजित रस्त्यांचे काम किमान आठ ते नऊ कोटी रुपयांचे प्राकलन धूळखात पडून असून महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्याने डांबरीकरण केले जात नसल्याची माहिती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांनी दिली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या "अ" प्रभाग क्षेत्रातील चार ठिकाणी सार्वजनिक रस्त्यांची साफ चाळण झाली असून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात राजकीय राजवट संपुष्टात येऊन प्रशासकीय राजवटीचा कारभार सुरू करण्यात आला. मागील महिन्यात दोन वेळेस पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने संपूर्ण खड्डेमय रस्तेच पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने रस्त्यांवर डबक्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. टिटवाळा बल्याणी रस्ता तसेच मोहीली, गाळेगाव, उंभर्णी व आंबिवली गावातील रस्ते पाच वर्षापासून खड्डेमय अवस्थेत असल्याने येथील करदात्या नागरिकांना वाहनाने प्रवास करणे अवघड होऊन बसले आहे. अनेकदा या रस्त्यांवर दुचाकी तसेच चार चाकी वाहने पलटी झाल्याच्या घटना देखील घडल्या असून अपघात होणे नित्याचेच होऊन बसले आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत निवेदन दिले आहेत मात्र खासदार-आमदार निधी मिळविण्याकरिता कधी प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी खासदार-आमदार निधी उपलब्ध झाला नसल्याने आता महापालिकेने ही हात वर करीत निधी नसल्याचे सांगून टाकल्याने खड्ड्यांवरील रस्त्यावर होत असणाऱ्या अपघानांना जिम्मेदार कोण असा सवाल येथे उपस्थित केला जाऊ लागला आहे.
टिटवाळा बल्याणी रस्त्यांवर सतत वाहतूक सुरू असताना या रस्त्यांवर तात्पुरती मलम पट्टी करून पालिका प्रशासन जागृत असल्याचा आव आणीत असून पडलेल्या खड्ड्यात खडी टाकायचे काम मोठ्या जोमाने बांधकाम विभाग करताना दिसून येत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दीड वर्षात कोरोना संसर्गाने पछाडून सोडले होते यामुळे विकास कामांना खीळ बसण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. अनेक लोकप्रतिनिधींचा प्रभागातील इतर कामांसाठी वापरण्यात येणारा निधीवर देखील प्रशासनाने रोख लावून धरला होता. "अ" प्रभाग क्षेत्रातील टिटवाळा बल्याणी रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून रस्त्यांवरील हाकेच्या अंतरावर येथील स्थानिक नगरसेविका नमिता पाटील तसेच कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयुर पाटील वास्तव्यास आहेत.
कोरोना काळात महापालिका क्षेत्रात विकास कामे झाली नसून निधी उपलब्ध नसल्याने "अ" प्रभागातील चार रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे थांबविण्यात आली असून प्राकलन तयार आहे.
सुभाष पाटील, कडोंमपा बांधकाम, कार्यकारी अभियंता.
या रस्त्यांच्या बाबत वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच निधी मंजूर असून देखील पालिका प्रशासन जाणूनबुजून कानाडोळा करत आहे.
नमिता मयुर पाटील, माजी नगरसेविका
आम्ही प्रशासनाला करोडो रूपयांचा कर भरत असून आम्हा करदात्यांना काय सुविधा प्रशासन देते. येथील रस्त्यांची अवस्था गेली पाच वर्षांपासून अतिशय दयनीय झाली आहे. सुविधा नाही तर आम्ही कर का द्यावा हा प्रश्न आम्हाला पडला आहे.
विवेकानंद कानेटकर, जेष्ठ नागरिक, टिटवाळा
No comments:
Post a Comment