इंदिरानगर बाबाधाम चाळींमध्ये जोरदार वाहू लागला धबधबा !!
टिटवाळा : हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच या धबधब्यावर पिकनिकला जायचा बेत आखला असणार ; पण थांबा हा धबधबा नसून टिटवाळा इंदिरानगर येथील बाबाधाम चाळीची दृश्य आहेत. काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे इंदिरानगर येथील बाबा धाम चाळीला धबधब्याचे रूप आल्याचे पहावयास मिळाले.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाच्या कृपेने इंदिरानगर परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळी निर्माण होत आहेत या चाळी डोंगराच्या नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात तयार होत असून नैसर्गिक प्रवाह बुजवून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाले आहे.
या अनधिकृत बांधकामास प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप सत्याग्रह फोरमचे केंद्रीय संघटक भरतकुमार सोनार यांनी केला आहे. प्रशासन अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करीत नसल्यानेच अनधिकृत बांधकामांमध्ये वाढ होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. बाबाधाम चाळ परिसरात ३५ ते ४० कुटुंबे राहत असून त्यांना अद्याप प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वच प्रभागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली असून अनेक ठिकाणी नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बुजवून तसेच काही ठिकाणी त्यावर भर टाकून अनधिकृत बांधकामे केली आहेत या अनधिकृत बांधकामामुळे नैसर्गिक प्रवाहांना जाण्यासाठी मार्ग नसल्याने हे प्रवाह चाळीमधून लोकांच्या घरातून चालण्याच्या रस्त्यावरून वाहत आहेत. त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांचे लाखो हसवणूक देखील होत आहे.
अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी डोंगरावरील अडविलेले तसेच बंद केलेले नैसर्गिक प्रवाह प्रशासनाने तातडीने खुले करावे तसेच येथील कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी भरत सोनार यांनी केली आहे.
दरवर्षी पावसामध्ये येथील नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. वेळीच नैसर्गिक प्रवाह खुले केले नाही तर मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



No comments:
Post a Comment