मी कृषीमंत्री होतो पण कधी शेतकऱ्यांनी पिकं फेकून देण्याची वेळ आणली नाही - शरद पवार.
भिवंडी, दिं, 05, अरुण पाटील (कोपर) :
'कोरोनाच्या' संकटात लोकांना एकत्र करणे टाळले पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी सूचना दिल्या आहेत पण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अशा कार्यक्रमाला यावं लागलं. पण व्यासपीठावरील गर्दी टाळून हा कार्यक्रम होतोय, मात्र काळजी घेतली पाहिजे' असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचा सल्ला दिला. तसंच, आपण कृषीमंत्री असताना कधी शेतकऱ्यांना पिकं फेकून देण्याची वेळ आणली नाही, असंही पवार म्हणाले.
जुन्नर येथील शेतकरी मेळावा पार पडला. या वेळी शरद पवार यांनी कृषी आणि कोरोनाच्या परिस्थितीवर आपली भूमिका मांडली. 'आपल्याकडे केंद्रीय कृषी खातं होतं पण आम्ही शेतकऱ्यांवर पीक फेकून द्यायची वेळ आणली नाही. भाजी, टोमॅटो याचे दर खाली येऊ दिले नाही. सध्या शेतकरी मेटाकुटीला आला आहे. टोमॅटो, शिमला मिर्ची फेकून द्यावे लागत आहे. मात्र, आता साखरेचे भाव वाढत आहेत, अशीच परिस्थिती राहिली. तर उसाला दर जादा भाव देता येईल' असंही पवार म्हणाले.
'जुन्नरच्या हापूस आंब्याची एक वेगळी ओळख वाढली याचा अभिमान यासोबत येथील भाजीपाला खराब होऊन नये यासाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था केली तर शेतकऱ्यांना या नुकसानीतून वाचविता येईल, असा सल्ला पवार यांनी मार्केट कमिटीला दिला.आजच्या सभेला महिलांची उपस्थितीवर मात्र पवार यांनी नाराजी व्यक्त केली. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच महिला का उपस्थित आहेत? आम्ही पन्नास टक्के आरक्षण आणलंय. राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराज घडवले, यांच्या संस्काराने स्वराज्य घडलं. त्यामुळं या आपल्या राजमातांना संधी द्या, प्रोत्साहित करा, असा विचार व्यक्त केला.
याच व्यासपीठावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही केंद्र सरकारच्या सहकार संपवण्याच्या भूमिकेवर टीका केली. केंद्र सरकार छुप्या पद्धतीने अर्बन बँका, जिल्हा बँका, मार्केट कमिटी या सगळ्या सहकार क्षेत्रावर आपला वेगळाच वचक ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.तसंच, 'सहकारातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था आणि ग्रामीण भागाला चांगले स्थान प्राप्त झाले आहे मात्र आता केंद्र सरकारवर अवलंबून राहावे लागत असल्याबदलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment