ठाणे जिल्ह्यात ग्रामपंचायत कर्मचारी 'ग्रामसेवकाच्या' मानगुटीवर? नाकापेक्षा मोती जड अशी झाली "भाऊसाहेब" यांची अवस्था !!
कल्याण, (संजय कांबळे) : लोकशाहीची मिनी संसद म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतीचा कारभारी अर्थात ग्रामसेवक (भाऊसाहेब) यांची सध्या बिकट परिस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी या ग्रामसेवकांंच्या अक्षरशः मानगुटीवर बसले असून आता ते इतके डोईजड झाले आहेत की, नाकापेक्षा मोतीजड असे म्हणण्याची वेळ भाऊसाहेबांवर आली आहे.
ठाणे जिल्ह्यात ३५०/४०० च्या आसपास ग्रामपंचायत कर्मचारी आहेत, कल्याण तालुक्यात ४६ ग्रामपंचायती, मुरबाड मध्ये १२६ ग्रामपंचायती, ८२ ग्रामसेवक, ३२ रिक्त, शहापूर ११० ग्रामपंचायती, १०९ ग्रामसेवक, २ निंलबित, झाल्याने १०६, भिवंडी व अंबरनाथ तालुक्यात देखील काही पदे रिक्त आहेत.
त्यामुळे अनेक ग्रामसेवकांकडे इतर अनेक ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. त्यामुळे ते बहुतांश वेळी वेळ वाचविण्यासाठी जवळपास सर्वच आर्थिक व्यवहार हा कर्मचाऱ्यांच्या हातात सोपवितात, ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीला ३/४ वर्षे कसेतरी काढतात व बदली होऊन दुसरीकडे जातात, त्यामुळे ते या कर्मचाऱ्यांशी "पंगा" घेत नाहीत, मात्र या उलट कर्मचारी हा त्याच गावातील असतो व तो स्थानिक असल्याने त्याचे सरपंच, सदस्य किंवा इतर राजकारण्यांशी घनिष्ट संबंध असतात. त्यामुळे ते बिनधास्त राहून ग्रामसेवकांना मुळीच घाबरत नाही काही ठिकाणी तर झाडू मारणे, टेबल खुर्ची साप करणे, कार्यालय उघडणे ही कामे भाऊसाहेबांना करावी लागतात. काही महाभाग तर भाऊसाहेबांच्या खुर्चीवर बसून तंबाखू, गुटखा कार्यालयातच खातात असे सामाजिक कार्यकर्ते विनोद जाधव यांनी सांगितले.
या सर्व प्रकारास ब-याच अंशी भाऊसाहेब/ ग्रामसेवकच जबाबदार असतात. कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय योजनेचे यशापयश हे ग्रामसेवकावर अवलंबून असते. त्यामुळे पंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामसेवक हा अंत्यत महत्त्वाचा घटक मानला जातो, असे असताना आपली जबाबदारी विसरून हे भाऊसाहेब हाताखालील कर्मचाऱ्यांच्या हातात जवळपास सर्व आर्थिक व्यवहार देतात, कपाटाच्या चाव्या, सही केलेले कोरे चेकबुक, विविध दाखले, एनओश्या, दफ्तर, आदीमुळे हे कर्मचारी स्वतः ला ग्रामसेवक समजूनच वागत असतात. त्यामुळे हे मग नागरीकांशी उध्दट बोलणे, मनमानी करणे, ग्रामपंचायतीची कामे न करणे आदी प्रकार घडतात. कल्याण तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांने स्वच्छता विषयी कामे न करण्याचा मेसेज एका ग्रुपवर टाकला होता, यावर गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी संबधित ग्रामसेवकाला झापले होते व तूमचे कर्मचारी ऐकत नाही का? त्याला नोटीस काढा, कारवाई करा? असे बजावले होते, या संदर्भात गटविकास अधिकारी भवारी यांना विचारले असता त्यांनी मात्र असे काही घडले नसल्याचे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करून आपल्या कडे अशी तक्रार अली नसल्याचे सांगून खांदे उडविले.
तर शहापूर तालुक्यातील एका महाशयांनी चक्क एका "दारुवाल्याच्या" आणि "सोनाराच्या" नावाने चेक काढला होता, मात्र या बाबतीत तक्रार झाल्यावर संबंधित ग्रामसेकाला निंलबित करण्यात येऊन सध्या त्याची विभागीय चौकशी सुरू असलयाची माहिती मिळतेय. अशी एक ना अनेक प्रकरणे आहेत की ज्यामुळे भाऊसाहेब घरी बसलेले आहेत. आजही असे अनेक ग्रामसेवक आहेत की ज्यांची दफ्तर अपूर्ण आहेत, रिपोर्ट पेंडिंग आहेत.
अर्थात सर्वच ग्रामसेवक अथवा कर्मचारी वाईट आहेत, असे मुळीच नाही, असे अनेक कर्मचारी आहेत की आपले गाव व आपले "भाऊसाहेब" अडचणीत येणार नाहीत, गैरव्यवहार, गैरकाम करणार नाही असे ठणकावून सांगत इमानेइतबारे, प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या देखील मागण्याचा विचार व्हायला हवा, चांगले काम करणाऱ्याच्या पाठीवर शाबासकीची थाप व नाटाळाच्या माथी वेळीच काठी बसायलाच हवी, अन्यथा भाऊसाहेब व त्यांच्या हाताखाली काम करणारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या अवस्था चांदोबा या गोष्टी रुप पुस्तकातील 'विक्रम व वेताळा' सारखीच व्हायला वेळ लागणार नाही. असे का घडते? कोणामुळे घडते? आपली चूक काय? याचा भाऊसाहेबांनी सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून विचार करायला हवा.
प्रतिक्रिया :-
'खरेच असे काही कामचुकार व प्रशासनाच्या विरोधात काम करणाऱ्या कर्मचा-यावर कारवाई व्हायला हवी,-अजय जाधव (ठाणे जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन)
'काही ग्रामपंचायतीचे कर्मचारी अत्यंत शेफारलेले आहेत, ग्रामस्थांशी निट बोलत नाही, माहिती देत नाहीत -किशोर पंडीत, सामाजिक कार्यकर्ते, शहापूर.




No comments:
Post a Comment