वात्सल्य मंदिर, ओणीतर्फे अनाथ-निराधार मुलांचा "आनंद मेळावा" उत्साहात साजरा !!
"प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांनी प्रशासन तुमच्या सोबत आहे, आम्ही तुमचे आहोत हा प्रेमाचा दिला विश्वास"
कोकण, (शांताराम गुडेकर) :
वात्सल्य मंदिर, ओणी-राजापूर- आयोजित रत्नागिरी जिल्ह्यातील विविध बालगृह-अनाथालय मधील वास्तव्य करणाऱ्या मुलांकरिता "आनंद मेळावा" चे आयोजन करण्यात आले होते. या आनंद मेळाव्यात वेगवेगळ्या संस्थांमध्ये वास्तव्य करणाऱ्या जवळपास १५०- २०० मुल-मुली तसेच संस्था प्रतिनिधी..आजी-माजी विद्यार्थी सामील झाले. मागील दोन वर्षे कोविड महामारी संक्रमणामुळे संस्थांमध्ये असलेल्या अनाथ-निराधार मुलांचे आयुष्य हे भावनिकदृष्ट्या बंदिस्त झाले होते. त्यांच्या कोंडलेल्या मनाला मोकळा श्वास त्यांना घेऊ देता यावा,तर संस्थांमध्ये असलेल्या मुलांशी मोकळा संवाद साधता यावा, त्यांच्या जगण्याला, विचारांना आनंदाची लहर प्राप्त व्हावी या उद्देशाने या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मातृमंदिर, गोकुळ, देवरुख, महिलाश्रम बालगृह, लांजा, माहेर संस्था, रत्नागिरी आणि वात्सल्य मंदिर, ओणी-राजापूर या संस्थामधील मुले उत्स्फुर्तपणे सहभागी झाली होती. दिवसभर दंगा-मस्ती, मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम आणि भाऊ-बहिणींचे नाते अधोरेखित करणारा सण म्हणजे "भाऊबीज" अशी कार्यक्रमाची रेलचेल होती. या कार्यक्रमात अनेक मान्यवर, प्रतिष्ठित, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. सर्वसाधारणपणे शासकीय अधिकारी सामान्यपणे सामाजिक उपक्रम, तसेच जनतेत मिसळत नाहीत अशीच काहीशी प्रतिमा सर्वसामान्यांची असते. परंतु या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) मा. वैशाली माने, राजापूर तालुक्याच्या तहसीलदार मा. शितल जाधव तसेच इतर प्रशासकीय अधिकारी आवर्जुन उपस्थित होते. सुरुवातीला "वात्सल्य मंदिर" नव्याने बांधण्यात आलेल्या बालगृह प्रवेशद्वाराचे उद्घाटन संस्थेतील सगळ्यात लहान असलेला विद्यार्थी कु. प्रतिक याच्या हस्ते केले गेले. सुरवातीला अख्या जगाला "प्रामाणिक आणि खरे बोला" याचे धडे देणारे साने गुरुजी. यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन विविध संस्था चालक आणि मुले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात "खरा तो..एकची धर्म..जगाला प्रेम अर्पावे" या गीताने झाली. आनंद मेळावा हा मुलांसाठी असल्यामुळे सगळी सुत्रे मुलांच्या हाती होती. विविध उपस्थित संस्था चालक- प्रतिनिधी, प्रतिष्ठित मान्यवर, प्रशासकीय अधिकारी यांचे वात्सल्य मंदिर यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील बालगृह यांच्या संस्था प्रतिनिधी यांनी आपल्या संस्थेच्या कार्याची ओळख उपस्थित सर्वांना करून दिली. त्यानंतर मुलांचा विविध कलागुण दर्शन म्हणजेच सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यामध्ये सगळ्याच संस्थांमधील मुलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. तहसीलदार मा. शितल जाधव यांची दोन्ही मुले तसेच इतर मान्यवर यांच्या मुलांनी आपलाच कार्यक्रम समजुन सहभाग घेतला. कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे.. सांताक्लॉज कार्यक्रम ठिकाणी अवतरले. नाताळ सण असल्यामुळे मुलांचे मनोरंजन या सांताक्लॉज ने केले. ही भुमिका संस्थेचा माजी विद्यार्थी आणि सद्यस्थितीत डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत-रायगड येथे संशोधन सहाय्यक पदी कार्यरत असणारे श्री. महेशकुमार घारपुरे (महेश एन.एन.के.) यांनी केली. संकल्पना ही संस्थेचा माजी विद्यार्थी आणि वात्सल्य मंदिर संस्थेचा सन्मानीय कार्यकारिणी सदस्य श्री. रुपेश रेडेकर आणि त्यांची पत्नी कविता यांची होती. यामुळे कार्यक्रमाची रंगत अजुन वाढली. ही दोन्ही मुले मातृमंदिर- वात्सल्य मंदिर मधील माजी अनाथ मुले. या सांताक्लॉजने मुलांवर चॉकलेटचा वर्षाव केल्यामुळे मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. यानंतर जेवण आणि त्यानंतर भाऊबीज कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. उपस्थित अनाथ-निराधार मुलींनी इतर मुले तसेच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सगळ्यांना ओवाळले, एकमेकांना भेटवस्तु दिल्या.
"नभुतो.. न.. भविष्यती" असा हा डोळ्याचे पारणे फेडणारा संस्मरणीय कार्यक्रम पार पडला. उपस्थित मान्यवर यांचे वात्सल्य मंदिर, ओणीच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांनी प्रशासन तुमच्या सोबत आहे. आम्ही तुमचे आहोत.हा प्रेमाचा विश्वास दिला.वात्सल्य मंदिर संस्थेचे कार्यकारणी सन्मानीय सदस्य अनुक्रमे संस्था अध्यक्ष डॉ. महेंद्र मोहन गुजर, उपाध्यक्ष श्री.प्रदीप संसारे, कार्यवाह श्री. नितीन मुजुमदार, खजिनदार सौ. भारती चव्हाण, सल्लागार सन्मानीय श्री. बाळकृष्ण चव्हाण सर, मुंबई सचिव श्रीमती.गीताताई प्रभू, कार्यकारिणी सदस्य एकनाथ मोंडे, रुपेश रेडेकर, कर्मचारी प्रतिनिधी अलोक मोहन, अधिक्षिका सुवर्णा राघव, मातृमंदिर संस्था, देवरुखचे कार्यवाह श्री. आत्माराम मेस्त्री, माहेर संस्थेचे श्री. सुनील कांबळे, लांजा महीला संस्थेच्या अधिक्षिका सौ. सुचिता कांबळे, नुतन विद्या मंदिर, ओणी हायस्कुल चे मुख्याध्यापक श्री.पाटील सर, माजी शिक्षक श्री.साखळकर, मातृमंदिर आणि वात्सल्य मंदिरचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सगळ्यानी या आनंद मेळावा चा उत्साह आणखीन आनंदमयी केला. वात्सल्य मंदिर संस्थेचा हा पहिलाच उपक्रम. याचे कौतुक सगळ्यानी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विशेष मेहनत संस्था अध्यक्ष डाँ. महेंद्र मोहन, माजी विद्यार्थी महेशकुमार घारपुरे, श्री. रुपेश रेडेकर आणि वात्सल्य मंदिरची सर्वच टीम यांचे योगदान राहीले. सगळ्यात महत्वाचा वाटा आणि सहभाग श्री. बी.के. गोंडाळ यांचा राहीला. कार्यक्रमाचे अतिशय समर्पक शब्दांत सूत्रसंचालन त्यांनी करुन कार्यक्रमात रंग पसरले. कार्यक्रमाची सांगता हम होंगे कामयाब म्हणत आम्ही अनाथ असलो तरीही सर्व समस्यांवर एक दिवस मात करुन नक्कीच आमचा विकास घडवु हा विश्वास व्यक्त करत मुलांच्या मनमुराद विविध गाण्यांच्या ठेक्यावर नाचण्याच्या कार्यक्रमांनी झाली.
No comments:
Post a Comment