Wednesday, 15 December 2021

कोकणची लोककला "नमन" जपणे काळाची गरज !!

कोकणची लोककला "नमन" जपणे काळाची गरज !!


परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणभूमीत अनेक कलांचा विकास झाला आहे. त्यामध्ये नमन (खेळे), शक्तीतुरा (जाकडीनृत्य), भारुड, डफावरील पोवाडे इ. कलांचा समावेश आहे. कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्हातील नमन (खेळे) या लोककलेची प्रसिध्दी जगभर पसरली आहे. 


श्री गणरायाचे आगमन, मृदंग, ढोलकीच्या तालावर ठेका धरणारी नटखट गवळण, काल्पनिक पौराणिक वगनाट्य सादर करणारी ही नमन लोककला कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना, शासनाचे अनुदान नसतानाही कोकणवाशीय जोपासत आहेत. या लोककलेला फार प्राचीन काळापासून रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, देवरुख, लांजा, राजापूर, मंडणगड या तालुक्यातील लोकांनी ही लोककला जोपासून शासनाच्या, भारत सरकारच्या अनेक योजना या लोककलेतून लोकांपर्यंत पोहचवून त्याविषयी जनजागृती करण्याचे काम पार पाडले आहे. झाडे लावा- झाडे जगवा, पाणी वाचवा, नशाबंदी, वृक्षतोड थांबवा, स्त्रीभ्रुणहत्या, शिक्षणाचे महत्त्व इ. विषयांवर या लोककलेतून लोकांपर्यंत संदेश देण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. 


गुहागर तालुका नमन संघटना आयोजित बहुरंगी नमन सोमवार दिनांक १० जानेवारी २०२२ रोजी ठीक रात्रौ ८:३० वाजता विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ नाट्यगृह येथे गुहागर तालुका नमन संघटना या तालुका शाखेच्या उन्नती करता आणि तालुक्यातील नमन मंडळांना आणि लोक कलावताना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी, तसेच तालुक्यातील कलावंतांना त्याच्या कला गुणांना वाव मिळावा तसेच नमन संघटनेच्या गुहागर तालुका शाखेचा प्रसार आणि प्रचार व्हावा आणि प्रत्येक गावा- गावात नमन मंडळांना आणि नमन लोक कलावंतांना जागृत करून शासन दरबारी न्याय मिळावा या शुद्ध हेतूने आर्थिक निधी संकलन करण्यासाठी कुणबी वाडी विकास मंडळ असोरे (ता. गुहागर) याचे नमन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आम्ही तालुक्यातील नमन मंडळांना आव्हान करतो आहे की आपल्या गाव मंडळातील नमन मंडळांनी सदर कार्यक्रमाला उपस्थीत राहून तालुका शाखेने हाती घेतलेल्या उपक्रमाला सहकार्य करावे ही नम्र विनंती.
सदर कार्यक्रमाची तिकिटे घेण्यासाठी संघटनेचे खजिनदार सन्मानीय उदय दणदणे साहेब याच्या कडे संपर्क करावा. संपर्क नंबर : ८२७५६२७६३६ असे श्री सुधाकर मास्कर (अध्यक्ष)यांनी सांगितले. 


नमन या लोकनृत्य मध्ये गणगौळण मध्ये अनेक सोंगे असतात. सोंगात प्रथम मान गणपतीरायाचा असतो. गणपती पूजन व गणपती गाणे होते. गणेश पुजनात गणेशाची आख्यायिका असते. ही सोंगे झाडांच्या लाकडापासून बनवलेली असतात. मात्र आजच्या तारखेला ही सोंगे अनेक प्रकारची हलकी व प्लास्टिक, फायबर याची बघायला मिळतात. गणपतीच्या आगमनवेळी इतर सोंगेही दाखवली जातात. यामध्ये नटवा असतो. शंखासूर, वाघ, हरण इ. असून या प्रकारात वापरल्या जाणाऱ्या तलवारी लाकडी असतात. गण झाल्यावर “गवळण” प्रकाराला सुरुवात होते. हा भाग खुपच मजेदार व ऐकण्यासारखा असतो. दही, दूध, लोणी घेऊन गवळणी मथूरेच्या बाजाराला जात असतात. त्यांची वाट (रस्ता) गोकुळातील पेंद्या, सुदामा (श्रीकृष्ण सवंगडी) वाट अडवतात. त्यावेळी गोपीका व पेंद्या, सुदाम यांच्यातर्फे अनेक गाणी व वेगवेगळ्या कला सादर होतात. कृष्णाचे संवगडी गवळींची वाट अडवत त्यांच्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या मालाची लुट करतात. माठही फोडतात. यावेळी मावशी (गवळणी मधील जेष्ठ) अनेक कला सादर करुन नमन रसिकांना हसायला भाग पाडते. गवळणी गाणं म्हणताना या संवगडींना म्हणतात “दहीदुधाचे माठ घेऊनी चाललो मथूरेच्या बाजारी…दह्यादुधाचे नुकसान कान्हा तु का रे करी... !कारण कान्हा रस्त्यामध्ये उभा राहून गवळींची वाट अडवत असतो. त्यावेळी गवळणी त्याला विनंती करतात की, कान्हा सोड आमची वाट,आम्हा जाऊ दे बाजारी…दह्यादुधाने भरल्या घागरी…. ! अशा त-हेरे गवळणी नंतर कौटुंबिक जीवनावर आधारीत पण एक चांगला संदेश देणारी छोटीशी नाटीका (फार्स) सादर केली जाते. या नाटीकेचा विषय सामाजिक जनजागृतीचा संदेश देणारी असतो. या संपूर्ण नमन खेळात शिपाई हे आदिच्या पोलीस दलातील हवालदार प्रमाणे असतात.गंभीर विषय विनोदी करुन सांगताना त्यातून अनेक संदेश दिले जातात. आपल्या अभिनयातून सामाजिक परिस्थितीचा आढावा घेत असतात. 


शेवटी वगनाट्यात महाभारत, नल-दमयंती आदी कथा किंवा एकादा सद्दस्थितीचा विचार करुन कथाभाग सादर करण्यात येतो. परमेश्वर धारण केलेल्या दहा अवतारांवर आधारीत सोंगे आणणे, त्यांच्या जीवनावरील काही घटना प्रसंगाचे खेळातून दर्शन घडवणे हा या नाट्याचा उद्देश असतो. आजच्याघडीला बदलत्या काळाप्रमाणे नवे-जुने यांचा स्विकार करत आजचे आधुनिक नमन मुंबईसह कोकणात पहावयास मिळत आहे. मुंबईत दामोदर नाट्यगृह, रविंद्र नाट्यगृह, साहित्य संघ, दिनानाथ नाट्यगृह या ठिकाणी कोकणातील मंडळांतर्फे देवदेवतांच्या मंदिर जिर्णोध्दार ,शाळा उभारणी फंड उभा करण्यासाठी नमन, खेळे किंवा शक्तीतुरा कार्यक्रम लावताना दिसतात. संघ, प्रतिष्ठान यांच्यातर्फे चाकरमान्यांचा नमन पहाता यावे म्हणून याच कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. मुंबईकर चाकरमानीही उत्फूर्त प्रतिसाद देतात.आज या नमन,खेळे, शक्तीतुरा  कार्यक्रमात स्त्री पात्र महिलावर्गच करताना दिसतो. आधुनिकतेप्रमाणे सध्या या लोककलेकडे व्यावसायिक दृष्टिकोणातून पाहिले जात आहे. त्याचे रुपही बदलत आहे.पारंपरिक पद्धतीत आधुनिकतेची भर पडली आहे. मात्र दशावताराप्रमाणे या नमन लोककलेला मानाचे स्थान प्राप्त झाले नाही. कोकणात नमनाच्या संवर्धनासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. कोकणात या कलेला जनाधार असतानाही शासन या कलेकडे दुर्लक्षच करत आहे. याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट  झालेले नाही. कोकणचे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्षच आहे.तमाशाला सोन्याचे दिवस आले. मात्र शासनाच्या दुर्लपणामुळे नमन या कलेला वाईट दिवस आले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नमन कलाकारांची "रात्री राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा” अशी स्थिती आहे. आधुनिकतेचा पगडा पडलेली ही नमन कला अशीच यापुढेही चालु राहवी यासाठी कोकण भूमिपुत्र, नमन प्रेमी यांनी आयोजक यांना सहकार्य करावे असे आमचे प्रामाणिक मत आहे. गुहागर तालुका नमन  संघटना आयोजित बहुरंगी नमन, बहुरंगी नमन सोमवार दिनांक १० जानेवारी २०२२ रोजी ठीक रात्रौ ८:३० वाजता विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ नाट्यगृह येथे मोठया संख्येने उपस्थित रहावे व कोकण ची ही कला वाचवावी.

शांताराम गुडेकर; कोकण भूमीपुत्र
ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी
+91 88795 44540

No comments:

Post a Comment

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !! कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे : मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा...