समता विद्या मंदिरात गुंजला बाळगोपाळांचा किलबिलाट !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) ::
शासनाच्या आदेशानुसार इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग आज दिनांक १५ डिसेंबर पासून सुरू होत आहेत. गेले दीड ते पावणेदोन वर्षापासून शाळा बंद होत्या.परंतु ऑनलाइन शिक्षण सुरू होते. प्रत्यक्ष वर्गात जो आनंद मिळतो तो ऑनलाईन वर्गात मिळत नव्हता.
मुलांचा आणि पालकांचा कोंडमारा झाला होता. फार मोठ्या कालखंडानंतर पहिली ते सातवीचे वर्ग सुरू आहेत. याचा आनंद बालक पालक आणि शिक्षकांना झाल्याचा आज प्रत्ययास येत आहे.
इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू होणार याची तयारी समता शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय राज्य सर व संचालक मंडळ आणि मुख्याध्यापक शिक्षक- शिक्षकेतर यानी केली होती. सर्व वर्ग निर्जंतुक करून घेण्यात आले आहेत. शारीरिक अंतर पाळणे, सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात धुणे या संदर्भात सूचना वर्गा वर्गात लावण्यात आल्या आहेत. पालकांच्या संमतीने बालकांना शाळेत बोलावले आहे. बालकांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. गरज भासल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांची तत्काळ मदत मिळविण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यामुळे पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेत आले आहेत. आलेल्या बालकांचे त्यांना आवडणारे कार्टून मिकी माऊस व छोटा भीम यांच्या माध्यमातून चॉकलेटआणि गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. एकूणच दीड वर्षानंतर बालकांच्या खेळण्याचा बागडण्याच्या किलबिलाटाने शाळेचे प्रांगण फुलले आहे.



No comments:
Post a Comment