Tuesday, 8 March 2022

बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी ३७ लाखांची लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला एसिबीने केली रंगे हात अटक !!

बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी ३७ लाखांची लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला एसिबीने केली रंगे हात अटक !!


भिवंडी, दिं,८, अरुण पाटील (कोपर) :
          देशात व मुंबईसह महाराष्ट्रात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून कायदे कठोर करूनही अशा प्रकरणात घट होताना दिसत नाही. अशात बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका पोलिस अधिकाऱ्याने आरोपीच्या नातेवाईकाकडे ३७ लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (ACB) सापळा रचून पोलीस अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक केली आहे.
        भरत मुंढे असं अटक केलेल्या 33 वर्षीय लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. तो सध्या ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोअर परळ येथील ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात एका तरुणा विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक भरत मुंढे यानं आरोपी तरुणाच्या नातेवाईकाकडे 37 लाखांची मागणी केली.
          यातील तीस लाख रुपये पीडित मुलीला, पाच लाख रुपये स्वत:ला आणि 2 लाख रुपये वरिष्ठ पोलिसांना द्यायचे असल्याचं त्यानं सांगितलं.यानंतर आरोपी तरुणाच्या नातेवाईकानं याबाबतची लेखी तक्रार वरळीतील एसीबीच्या कार्यालयात दाखल केली.
          त्यानुसार एसीबीच्या पथकाने तक्रारीचा पाठपुरावा केला व सोमवारी सापळा रचून आरोपी पोलीस उपनिरीक्षक भरत मुंढे याला तरुणाकडून सात लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले. मुंढे याच्या विरुद्ध एसीबीनं भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ आणि ७अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एसीबी अधिकारी आरोपीची कसून चौकशी करत आहेत. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातून सुटका करण्यासाठी एवढी मोठी रक्कम मागितल्यानं पोलीस प्रशासनात देखील खळबळ उडाली आहे. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का ? याचा तपास पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...