पिंपळोली गावचे प्रगतीशील शेतकरी मधूकर रोहणे यांच्या पत्नी सोनाबाई रोहणे यांचे अल्पशा आजाराने निधन !
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील पिंपळोली गावचे प्रगतीशील शेतकरी मधूकर हरी रोहणे यांच्या पत्नी श्रीमती सोनाबाई मधूकर रोहणे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झालं, मृत्यू समयी त्या ५७वर्षाच्या होत्या.
रायते पिंपळोली ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये पिंपळोली या छोट्या गावातील मधूकर हरी रोहणे हे हाडाचे शेतकरी म्हणून परिसरात ओळखले जात आहेत. त्यांनी आपल्या शेतीत अनेक नवनवीन प्रयोग केल्याने ते तालुक्यात प्रगतीशील शेतकरी म्हणून परिचित आहे. त्यांच्या पत्नी सोनाबाई मधूकर रोहणे या नावाप्रमाणेच सोन्यासारख्या होत्या, त्यांचा लहान मुलगा कमलेश रोहणे हा प्रसिद्ध तबलावादक, पकवाजक असल्याने तो संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. त्यांने आपल्या गावाचे नाव राज्यात चमकावले आहे. त्यामुळे या ना त्या कारणाने अनेक अधिकारी, कर्मचारी, कलाकार हे त्यांच्या घरी ये जा करीत असतात तेव्हा या सोनाबाई, अनेकांच्या, मावशी, काकी, आत्या, आई झाल्या होत्या.
त्यांच्या प्रेमळ, गोड,हसमुख स्वभावाने त्या संपूर्ण गावात सर्वाच्या आवडत्या होत्या, अंत्यत अडचणीत असताना त्यांनी कष्टाने पती मधूकर रोहणे यांना समर्थपणे साथ दिली होती. सगळं कुंटूब भक्ती मार्गाचे,वारकरी संप्रदायाचे असल्याने भजन, किर्तन हा सोहळा यांच्या घरी नित्यनेमाने होत होता. गणेशोत्सव काळात तर या घरात यात्राच भरलेली असायची ! या सर्वाची जबाबदारी सोनाबाई या 'माऊली' अगदी विनातक्रार पार पाडायच्या त्यामुळे त्यांचे असे अचानक निघून जाणे प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारे असेच आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुन व नाती असा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला संपूर्ण कल्याण तालुक्यातून मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी कल्याण तालुका वारकरी संप्रदाय,मुरबाड तालुका वारकरी संप्रदाय, तसेच जनाधार निर्भीड पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय कांबळे, आदींनी या माऊलीस भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.




No comments:
Post a Comment