Tuesday, 26 April 2022

१०० कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता, आरोपांत तथ्य नसल्याचा चांदीवाल आयोगाचा अहवाल !!

१०० कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता, आरोपांत तथ्य नसल्याचा चांदीवाल आयोगाचा अहवाल !!


भिवंडी, दिं,२६, अरुण पाटील (कोपर) :
            १०० कोटींच्या वसुली प्रकरणात चांदिवाल आयोगाने आपला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे आयोगाने सादर केलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आल्याची माहिती आहे.


             परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे आयोगाच्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे अनिल देशमुखांना क्लिन चिट मिळणार असल्याची शक्यता आहे. १०० कोटी वसुली प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंत्रिपद सोडावे लागले होते.
           २० मार्च २०२१ या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. या आरोपाने राज्यात एकच खळबळ उडाली होती.
                 या प्रकरणी आरोपांची शाहनिशा करण्यासाठी राज्य सरकारने चांदिवाल आयोगाची स्थापना केली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल या न्यायाधीशांची या आयोगाच्या अध्यक्षस्थानी नेमणूक केली. कोविडच्या काळातही या चौकशी आयोगाने आपले कामकाज सुरुच ठेवले होते.
              मुंबई पोलीस खात्यामध्ये पुन्हा सामावून घेण्यात आलेल्या सचिन वाझे या अधिकाऱ्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानावर बोलावून घेतले होते. या दरम्यान त्यांनी सचिन वाझे यांना सांगितले होते की, मुंबईत १७५०बार आहेत. प्रत्येक बारकडून २ ते ३ लाख रुपयांची वसुली दर महिन्याला केल्यास ४० ते ५० कोटी रुपयांचा टार्गेट हे पूर्ण केले जाऊ शकते. उरलेले ५० कोटींच्या टार्गेटसाठी इतर माध्यमातून प्रयत्न करावा लागेल, असे सांगून दर महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास त्यांना सांगण्यात आल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी पत्रात केला होता.
              याशिवाय, दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील ग्रीन सी हॉटेलमध्ये आत्महत्या केल्यानंतर या संदर्भात सुसाईड नोटच्या आधारावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा मुंबई पोलिसांकडे नोंद घेण्यात यावा, म्हणून गृहमंत्री हे आग्रही होते. मात्र, मुंबई पोलीस आयुक्त म्हणून मी माझा अनुभव त्यांना सांगून या संदर्भात आपण कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करावी, असे सुचवले होते.
              प्रथम दर्शनी डेलकर यांनी आत्महत्या केली होती. यास त्यांनी दादरा -नगर हवेली येथील प्रशासन व काही अधिकार्‍यांची नावे सुसाईड नोटमध्ये लिहिलेली होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास हा दादरा-नगर हवेलीच्या पोलिसांकडून करण्यात यावा, असे मी सुचवले होते, आसा दावाही परमबीर यांनी पत्रात केला होता.

No comments:

Post a Comment

टेनिस क्रिकेट स्पर्धा माध्यमातून के.सी.सी.बॉईज बेलघर यांची अव्वल स्थान पटकावून उत्तुंग कामगिरी !

टेनिस क्रिकेट स्पर्धा माध्यमातून के.सी.सी.बॉईज बेलघर यांची अव्वल स्थान पटकावून उत्तुंग कामगिरी ! मुंबई, (केतन भोज) : तळा तालुका ...