सेवा हा स्काऊट्सचा धर्म; स्काऊट्स गाईडने देशसेवेचा संकल्प करावा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी !!
मुंबई, आजाद श्रीवास्तव : सेवा हा स्काऊट्सचा धर्म आहे. प्रत्येक स्काऊट आणि गाईड हा केवळ आपल्या कुटुंबाचा सदस्य नसतो तर तो समाजाचा व देशाचा देखील सदस्य असतो. त्यामुळे स्काऊट्स सदस्यांनी आपल्या प्रतिज्ञेला जगात देशासाठी सेवा करण्याचा संकल्प करावा व राज्याचे तसेच देशाचे नाव मोठे करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील १४५ स्काऊट्स व गाईड्स यांना सन २०१८-२०१९ व २०१९- २०२० या वर्षांतील राज्यस्तरीय स्काऊट - गाईड्स राज्य पुरस्कार प्रमाणपत्र मंगळवारी (दि. २६) वितरीत करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
स्काऊट गाईड पॅव्हिलियन, शिवाजी पार्क, मुंबई येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तसेच महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स व गाईडचे अध्यक्ष सुनील केदार, राज्यमंत्री आदिती तटकरे, स्काऊट व गाईडचे राज्य मुख्य आयुक्त ओमप्रकाश बकोरिया व सरचिटणीस एन बी मोटे प्रामुख्याने उपस्थित होते.
पासष्ट वर्षांपूर्वी दुर्गम गावातील आपल्या शाळेत एनसीसी वगैरे काही नव्हते त्यावेळी आपण स्वतः स्काऊट म्हणून रुजू झालो होतो व स्काऊट्सच्या सहली व शिबिरांना उपस्थित राहिल्याचे सांगून स्काऊट मध्ये राहून अनुशासन व शिस्त या गुणांचे महत्व कळते असे राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.
चांगले काम केले तर प्रत्येकदा प्रमाणपत्र मिळणार नाही, परंतु समाजाकडून आशीर्वाद अवश्य मिळतील व ते अधिक मोलाचे असतात असा मंत्र राज्यपालांनी स्काऊट्स व गाईड्सना दिला. 'दया कर दान भक्ती का', ही स्काऊट्सची प्रार्थना केवळ म्हणण्यासाठी नसून ती जीवनात आचरणात आणण्यासाठी आहे असे सांगून आपल्या वाट्याला जे काही काम आले ते सर्वोत्तम करावे असे राज्यपालांनी सांगितले.
भारत हा सरासरी २५-२६ वर्षे वय असलेला युवकांचा देश आहे, त्यामुळे युवकांना घडविल्यास देशाची प्रगती होईल असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी यावेळी सांगितले. राज्याच्या विभागीय स्तरावर स्काऊट्स - गाईड, एनसीसी व राष्ट्रीय सेवा योजना यांचा संयुक्त कार्यक्रम आयोजित करावा अशी सूचना सुनील केदार यांनी केली.
एकशे चौदा वर्षांपूर्वी स्थापन झालेली स्काऊट गाईड ही चळवळ ग्रामीण भागात पोहोचावी व मुलींचा आत्मसन्मान वाढून त्यांचे सक्षमीकरण व्हावे अशी अपेक्षा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली.
देशातील स्काऊट गाईड मध्ये महाराष्ट्राचे प्रमाण २२ टक्के इतके आहे असे सांगून हे प्रमाण पुढील काही वर्षात ५० टक्के नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे राज्याचे मुख्य स्काऊट गाईड आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी यावेळी सांगितले. एन बी मोटे यांनी आभारप्रदर्शन केले.
No comments:
Post a Comment