हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे श्री. ठाकरे यांच्या हस्ते थाटात लोकार्पण !!
*मुंबई ही जगाची आरोग्य राजधानी व्हावी : पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे*
मुंबई, आजाद श्रीवास्तव :
कोविड कालावधीतील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगिरीचे ‘मुंबई मॉडेल’ संपूर्ण जगाच्या कौतुकास पात्र ठरले. शिक्षण, पाणी, आरोग्य यासारख्या नागरी सेवा-सुविधा स्वस्त आणि मस्त पद्धतीने पुरविणारी मुंबई महानगरपालिका ही देशातील कदाचित एकमेव महानगरपालिका असावी की जिचे स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय आहे. मुंबईत जे-जे करु ते जगात सर्वोत्तम ठरावे, हा आमचा ध्यास असून मुंबई ही जगाची आरोग्य राजधानी व्हावी, हे आमचे ध्येय आहे, असे उद्गार राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी काढले.
विलेपार्ले (पश्चिम) स्थित बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डॉ. रु. न. कूपर रुग्णालय व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज (दिनांक २५ एप्रिल २०२२) समारंभपूर्वक करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी राज्याचे उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा मंत्री श्री. सुभाष देसाई, परिवहन व संसदीय कार्ये मंत्री ऍड. अनिल परब, स्थानिक खासदार श्री. गजानन कीर्तीकर, आमदार श्री. सुनील शिंदे, माजी महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर, माजी आरोग्य मंत्री श्री. दीपक सावंत, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. संजय कुऱहाडे, उप आयुक्त (परिमंडळ ४) श्री. विजय बालमवार, कूपर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, के/पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहाण हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, माजी आमदार श्री. अशोक जाधव, महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री. यशोधर फणसे, माजी नगरसेवक श्री. राजू पेडणेकर, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. नीलम अंद्राडे, संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) सुधीर गजरगावकर, प्रमुख अभियंता (किनारी रस्ता प्रकल्प) श्री. चक्रधर कांडलकर, मनपा वास्तुशास्रज्ञ श्री. सुरेंद्र बोराळे, राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. (श्रीमती) संगीता रावत, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) मंगला गोमारे, सेव्हन हिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ, विशेष कार्य अधिकारी डॉ. महारुद्र कुंभार, आरोग्य पायाभूत सुविधा कक्षाचे उप प्रमुख अभियंता श्री. रवींद्र घुले तसेच कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र घाटे, पाडुरंग चव्हाण, घोराडे यांच्यासह विविध वैद्यकीय अधिकारी, अभियंते, वैद्यकीय विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.
प्रारंभी, पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करुन, फित कापून तसेच कोनशिला अनावरण करुन नवीन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी झालेल्या समारंभात संबोधित करताना श्री. ठाकरे पुढे म्हणाले की, कोविड विषाणू बाधितांचे आकडे आता १०० च्या आत आहेत. गेली दोन वर्षे कोविडचा सामना करताना डॉक्टर म्हणजे देव हे सर्वांनी जवळून अनुभवले आहे. कोविडचा पूर्वानुभव नसल्याने सुरुवातीच्या काळात नेमकं काय करावं, हे कुणालाही लक्षात येत नव्हतं. मात्र, काही दिवसातच सर्व आरोग्य यंत्रणेने आणि एकूणच महानगरपालिका प्रशासनाने जे काम केलं त्याचं देशातच नव्हे तर, संपूर्ण जगात आजही कौतुक केले जात आहे. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने विक्रमी वेळेत १० ते १५ दिवसात जम्बो कोविड सेंटर उभे करण्याची कामगिरी झाली. ऑक्सिजनपासून औषधांपर्यंत सर्व उपाययोजना करणाऱया मुंबई महानगरामध्ये देशभरातून आलेल्या रुग्णांना जीवदान दिले. या सर्व कालावधीत डोक्यावर बर्फ ठेवून काम कसं करावं, हे प्रामुख्याने डॉक्टरांनी शिकवलं, असे सांगून श्री. ठाकरे यांनी सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि वैद्यकीय क्षेत्रातील संपूर्ण यंत्रणेचे आभार मानले.
पुढे ते म्हणाले की, महानगरपालिकेच्या शाळा आणि वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतलेली मंडळी आज जगभरात वैद्यकीय सेवा देत आहेत. ५ वैद्यकीय महाविद्यालय असणारी मुंबई महानगरपालिका एकमेव स्थानिक स्वराज्य संस्था असेल. कोविड कालावधीत देखील न थांबता इमारतीचे बांधकाम अखंडपणे पूर्ण करण्यात आले, याचे कौतुक आहे. खरेतर अशा इमारती, वैद्यकीय महाविद्यालये उभे करताना अनेक परवानग्या आणाव्या लागतात. ती प्रक्रिया अत्यंत कठीण असते. मात्र, जे-जे चांगलं आहे, ते पूर्ण करण्याची आणि ते जगात सर्वोत्तम ठरावे, अशारितीने करण्याची शिकवणच बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळाली आहे, असे पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी नमूद केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेतील एकूण रुग्णशय्या क्षमता आता २५ हजारापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले असून जगभरात जे-जे चांगलं आहे, ते मुंबईसाठी आणू, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सातत्याने ताणतणावाचा सामना करुन वैद्यकीय सेवा देणाऱया डॉक्टर मंडळींसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मनोरंजन केंद्र उभारण्यात येईल. या केंद्रामध्ये योगा आणि तत्सम सर्व सुविधा पुरविल्या जातील, अशी घोषणा देखील श्री. ठाकरे यांनी याप्रसंगी केली.
उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई मनोगतात म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुपाने मुंबईतील उपनगरांसाठी स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित झाले आहे. आता या रुग्णालयाची दिमाखदार इमारत उपलब्ध झाल्याने महानगरपालिकेची दर्जेदार आरोग्य सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल. कोविड कालावधीतील मुंबई मॉडेल आणि धारावी मॉडेल संपूर्ण जगासाठी कौतुकाचा विषय ठरले. इतर राज्यांमध्ये रुग्णांची ससेहोलपट होत असताना मुंबईने मात्र आपली जबाबदारी अत्यंत चांगल्यारितीने पार पाडली. लोकसेवेच्या भावनेतून राजकीय मंडळी रात्रंदिवस डॉक्टरांना फोन करतात. तरीही न कंटाळता डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील सर्व संबंधित सहकार्य करतात, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण, त्यांना सेवेचा नेमका अर्थ माहीत आहे, असे सांगून श्री. देसाई म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईची सर्वतोपरी काळजी घेतली. त्याचप्रमाणे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे हे देखील मुंबईकरांच्या आरोग्य सेवेला प्राधान्यक्रम देतात. ठाकरे कुटुंबियांनी महानगरपालिकेमध्ये रुजवलेला नागरी हिताचा विचार आणि कृती यातून मुंबई महानगरपालिका आरोग्य क्षेत्रातही आपला पहिला क्रमांक कायम राखेल, असे उद्गार श्री. देसाई यांनी अखेरीस काढले.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. सुरेश काकाणी प्रास्ताविक करताना म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबई उपनगरासाठी वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती आणि त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचेच समर्पक नांव या महाविद्यालयाला दिले गेले. ४० महिन्यांच्या कालावधीत बांधून ही इमारत पूर्ण करण्यात आली आहे. महाविद्यालयाची नवीन वास्तू अनेक आधुनिक व सुसज्ज सेवा-सुविधांनी युक्त आहे. आज या इमारतीत १३ विभाग सुरु होत आहेत. भविष्याची गरज लक्षात घेता, ही संख्या ४० पर्यंत वाढवणे देखील शक्य आहे. एवढेच नव्हे तर, सुपरस्पेशालिटी व एक्सलन्स सेंटर देखील या ठिकाणी आणण्याचा विचार आहे. या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱया एम.बी.बी.एस. पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहं बांधली जात आहेत. मुली व मुलींच्या वसतिगृहांच्या दोन्ही इमारती पूर्णत्वाकडे जात आहेत, असे देखील श्री. काकाणी यांनी नमूद केले.
एन.सी.सी.सी.एल. चे व्यवस्थापकीय संचालक श्री. महेश मुद्दा यांनी देखील समयोचित मनोगत व्यक्त केले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे वास्तुविशारद श्री. शशी प्रभू यांच्यासह आब्बास जसदनवाला यांचा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सेव्हन हिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ, उप अधिष्ठाता डॉ. स्मिता चव्हाण आणि विशेष कार्य अधिकारी डॉ. महारुद्र कुंभार यांनी सेव्हन हिल्स रुग्णालयातील कामगिरीविषयी संपादीत केलेल्या ‘कोविड १९ साथरोगाचे सर्वंकष व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील पालकमंत्री श्री. ठाकरे व मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कुणाल रेगे यांनी केले. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी आभार प्रदर्शन केले.
*हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीविषयी माहितीः*
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे डॉ. रु. न. कूपर रुग्णालय व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय हे विलेपार्ले (पश्चिम) मधील गुलमोहर मार्गावर जेव्हीपीडी स्कीम येथे स्थित आहे. यातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयासाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. ही नवीन इमारत मुख्यत्वाने एमबीबीएस (बॅचलर ऑफ मेडिसीन ऍण्ड बॅचलर ऑफ सर्जरी) पदवी व पदव्युत्तर शिक्षणाकरीता उपयोगात येणार आहे. तळघर, तळमजला आणि त्यावर ५ मजले अशा स्वरुपाची या इमारतीची संरचना आहे. सुमारे ३६ हजार ३९७ चौरस मीटर (३ लाख ९१ हजार ७७५ चौरस फूट) इतक्या क्षेत्रफळाचे बांधकाम असलेल्या या इमारतीमध्ये तळमजला ते चौथ्या मजल्यापर्यंतचा वापर वैद्यकीय महाविद्यालयीन सेवांकरीता होणार आहे. पाचव्या मजल्यावर सर्व विभागप्रमुखांची कार्यालये असतील. यामध्ये तेरा विभागांची व्यवस्था राहणार आहे. तसेच तळघरामध्ये ५९ चारचाकी वाहने आणि ४९ लहान वाहन क्षमतेचे वाहनतळ उभारण्यात आले आहे. मध्यवर्ती अंगण, २४० आसन क्षमतेच्या चार वर्गखोल्या, ३०० आसन क्षमतेचे एक परीक्षा सभागृह, ५०० आसन क्षमतेचे एक बहुउद्देशीय सभागृह, प्रात्यक्षिक कक्ष, अभ्यागत कक्ष, ८०० चौरस मीटरची दोन ग्रंथालये, स्वयंपाकगृह, भोजनगृह, वातानुकूलन व्यवस्था, उद् वाहन इत्यादी सर्व व्यवस्था या इमारतीत उपलब्ध आहेत.
*इमारतीतील प्रत्येक मजलानिहाय तपशील लक्षात घेता पुढीलप्रमाणे रचना ठरविण्यात आली आहे.*
१) तळघर: वाहनतळ (५९ चारचाकी वाहने आणि ४९ लहान वाहन क्षमता), वातानुकूलन यंत्रणा कक्ष, उदंचन कक्ष, विद्युत संरचना कक्ष, आठ उद् वाहनांसाठी चार खोल्या.
२) तळमजला: अधिष्ठाता कार्यालय, प्रशासन, अभ्यागत कक्ष, शरीररचना विभाग, आच्छादित अंगण, प्रात्यक्षिक कक्ष, संशोधन प्रयोगशाळा, मध्यवर्ती ग्रंथालय, स्वयंपाकगृह, भोजनगृह.
३) पहिला मजलाः फार्माकोलॉजी, बायोकेमिस्ट्री, सेंट्रल लायब्ररी, लायब्ररी (जर्नल सेक्शन), सेंट्रल लायब्ररी, सहा डेमो रूम्स, रिसर्च लॅब, म्युझियम, प्रॅक्टिकल लॅब, स्टाफ फॅसिलिटी रूम, महिला विद्यार्थी कॉमन रूम, पुरुष विद्यार्थी कॉमन रूम.
४) दुसरा मजलाः फिजिओलॉजी, कम्युनिटी मेडिसीन, सहा डेमो रूम्स, रिसर्च लॅब, २४० आसन क्षमतेच्या दोन वर्गखोल्या, ३०० आसन क्षमतेचे एक परीक्षा सभागृह, ५६५ चौरस मीटरचे ग्रंथालय, संग्रहालय, प्रॅक्टिकल लॅब, ऑडिओ व्हिज्युअल रूम्स, एअर हँडलिंग युनिट.
५) तिसरा मजलाः पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, सहा डेमो रूम्स, रिसर्च लॅब, २४० आसन क्षमतेच्या दोन वर्गखोल्या, संग्रहालय, प्रॅक्टिकल लॅब, एअर हँडलिंग युनिट.
६) चौथा मजला: न्यायवैद्यक औषध विभाग, तीन डेमो रूम्स, रिसर्च लॅब, ५०० आसन क्षमतेचे एक बहुउद्देशीय सभागृह, संग्रहालये, विभागासाठी प्रॅक्टिकल लॅब, तीन परीक्षा सभागृह, पी.जी. विद्यार्थ्यांसाठी कॉमन लॅब.
७) पाचवा मजला: सर्व १३ विभागप्रमुखांची कार्यालये. यामध्ये ऑफिस ऑफ मेडिसिन, त्वचाविज्ञान, वेनेरोलॉजी आणि कुष्ठरोग, क्षयरोग आणि श्वसन रोग, ऑटोरिनॉलॅरिन्गोलॉजी, शस्त्रक्रिया, मानसोपचार, बालरोग, ऑर्थोपेडिक्स, रेडिओ-निदान, रेडिओ-थेरपी, दंतचिकित्सा, प्रसूती आणि गायनेकोलॉजी यांचा समावेश.
No comments:
Post a Comment