उमराठ खुर्द आंबेकरवाडीचा कौतुकास्पद उपक्रम ६० वर्ष पुर्ण केलेले ग्रामस्थ "जीवन गौरव" पुरस्काराने सन्मानित !!
[ निवोशी / गुहागर- उदय दणदणे ] :
उमराठ खुर्द आंबेकरवाडीची वार्षिक सार्वजनिक श्री सत्यनारायणाची महापुजा रविवार दि. ८ मे २०२२ रोजी श्री देव भराडा मंदिर येथे मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात पार पडली.
*सार्वजनिक श्री सत्यनारायणाची महापुजेची ऐतिहासिक परंपरेची १०५ वर्षे सातत्य राखत धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबवत उमराठ आंबेकरवाडीने दिला एकोप्याचा संदेश.*
उमराठ आंबेकरवाडीच्या सार्वजनिक श्री सत्यनारायण महापुजेचा इतिहास पाहता त्यावेळच्या आंबेकरवाडीतील पुर्वजांनी संघटीत होऊन एकोप्याने १९१८ साली त्या वेळेच्या ग्रामस्थांमध्ये असलेले ताडी-माडी, दारू अशा प्रकारच्या नशा प्राशन करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीला आळा बसावा या उद्देशाने नशाबंदीची शपथ घेऊन सार्वजनिक हितासाठी श्री सत्यनारायणाच्या पुजेचे आयोजन सुरुवात झाली होती. सन २०१७ मध्ये या सामुहिक पुजेला १०० वर्षे पुर्ण झाल्याने शतक महोत्सवी वर्ष म्हणून दोन दिवस विविध शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले होते.
या वर्षी याच आंबेकरवाडीत सार्वजनिक श्री सत्यनारायणाच्या महापुजेचे १०५ वे वर्ष विविध उपक्रमांने साजरे करण्यात आले. सदर उपक्रमांत खुर्द उमराठ आंबेकरवाडी प्रतिष्ठानच्यावतीने प्रतिष्ठानच्या धेय्य-धोरणानुसार शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना अधिक प्रोत्साहन मिळण्यासाठी इयत्ता पहिली ते पदवीधर तसेच विविध क्षेत्रात उच्च/तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भेट वस्तू देऊन त्यांचे कौतुक करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
*उमराठ गाव प्रति योगदान देणाऱ्या तब्बल ४० वरिष्ठ ग्रामस्थ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित*
यावेळी महसुली गाव उमराठ खुर्द आंबेकरवाडीतील ६० वर्षे पुर्ण केलेल्या ४० ग्रामस्थांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन *जीवन गौरव* पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत उमराठ मधील आंबेकरवाडी प्रभाग क्रमांक १ मधून बिनविरोध निवडून आलेले उमेदवार: जनार्दन पांडुरंग आंबेकर, शशिकांत सिताराम आंबेकर आणि सौ. अर्पिता अनंत गावणंग आणि पोलीस पाटील वासंती आंबेकर यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.
*उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांचा विशेष सत्कार*
उमराठ खुर्द आंबेकरवाडीचे सदस्य जनार्दन पांडुरंग आंबेकर यांची ग्रामपंचायत उमराठच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल प्रतिष्ठानचे स्थानिय अध्यक्ष महादेव देवजी आंबेकर यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान/ सत्कार करण्यात आला.
सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त करताना सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सांगितले की, हा फक्त माझा सन्मान नसून उमराठ खुर्द आंबेकरवाडी आणि उमराठ बुद्रुक या दोन्ही महसुली गावांतील ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास टाकून बिनविरोध सरपंच म्हणून निवड केल्याबद्दल दोन्ही महसुली गावांतील ग्रामस्थांचा सन्मान आहे. शासनाच्या येणाऱ्या विविध योजना ग्रामस्थांपर्यंत पोहचवून त्या कार्यान्वित करून घेण्याचे काम आमची ग्रामपंचायत सदस्य कमिटीतर्फे करण्यावर आमचा भर असून सर्व ग्रामस्थांनी वेळोवेळी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. दोन्ही महसुली गावांचा सर्वांगीण विकास हेच आमचे प्रमुख ध्येय/उद्दिष्टे आहे. आता *एकच ध्यास गावचा विकास*.
सदर कार्यक्रमाला उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर, पोलीस पाटील कु. वासंती पांडुरंग आंबेकर, उमराठच्या तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संदीप गोरिवले, ग्रामसेवक अनंत गावणंग, उमराठचे ग्रामस्थ प्रकाश पवार, उदय पवार, नामदेव पवार, शांताराम गोरिवले, गोविंद धनावडे, इत्यादी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. तर प्रतिष्ठानचे मुंबईचे अध्यक्ष लक्ष्मण आंबेकर, सरचिटणीस मंगेश आंबेकर, चिटणीस विनायक रांगले, सहचिटणीस शशिकांत. पोस्कर, माजी खजिनदार मनोहर आंबेकर, विष्णू आंबेकर तर स्थानिक अध्यक्ष महादेव आंबेकर, चिटणीस मोहन आंबेकर, खजिनदार अशोक पोस्कर, सल्लागार गंगाराम गावणंग, धोंडू आंबेकर, गणपत आंबेकर, वसंत आंबेकर, पोस्ट मास्तर दिलीप आंबेकर आणि बहुसंख्य ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.
यावेळी पूजेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत आंबेकरवाडीचे पारंपारिक संगीत नमन(खेळे) सादर करण्यात आले. यापूर्वी संगीत नमन गाजवणारे गोविंद गोपाळ आंबेकर, कै. भागोजी रामा आंबेकर, भिकू रामा आंबेकर आणि सहकारी या ग्रुपच्या पावलावर पाऊल टाकत सदरचा कार्यक्रम स्थानिक आणि मुंबईकर तरूण मंडळींच्या सहकार्याने मोठ्या दिमाखात सादर करण्यात आला. यामध्ये लहान मुलांचा सक्रिय सहभाग होता.
सदर संपूर्ण कार्यक्रमाला उमराठ खुर्दची पोलीस पाटील कु. वासंती पांडुरंग आंबेकर यांनी अतिशय उत्कृष्टपणे सुमधूर गोड आवाजात पार्श्वसंगीताने साथ दिली. तिला हार्मोनियमवादक कु. चैतन्य धोंडू गावणंग व ढोलकीवादक कु. सारंग कृष्णा गावणंग तर कोरस म्हणून प्रिती गोविंद आंबेकर व शशिकांत पोस्कर, विलास आंबेकर, इत्यादी तरूणांनी उत्तम साथ दिली. नेपथ्य करण्यात सौ. राधा मुकूंद आंबेकर हिचेही मोलाचे सहकार्य लाभले. या सर्व सहभागी लहान-थोर यशस्वी कलाकारांचे मनःपुर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment