Sunday, 24 July 2022

स्वतःला सांभाळून वर्षा विहार करा.....

स्वतःला सांभाळून वर्षा विहार करा.....


          पावसाळ्यात महाराष्ट्रातील विशेषतः सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील विविध धबधबे, नद्या, नाले, ओहोळ खळाळत असतात. सर्वत्र हिरवळ, पावसाळी वातावरण, धुके पर्यटकांना खूणावत असतात. तोरणमाळ, महाबळेश्वर, गगनबावडा, दुधसागर धबधबा, भंडारदरा, साणंद दरी, लोणावळा, खंडाळा, विविध गड किल्ले, अभयारण्य हे पर्यटकांना खूणावत असतात. वर्षा विहाराची सर्वांनाच ओढ असते. अर्थात या सर्व निसर्ग अलंकारांचा आनंद प्रत्येक व्यक्तिने घेतलाच पाहिजे, यात दुमत होण्याचे काहिच कारण नाही.पण हा आनंद लुटतानाही निसर्गाची मर्यादा आपण पाळली पाहिजे. ती मर्यादा पाळली नाही तर मग दुर्देवी घटनांना सामोरे जावे लागते. सेल्फी घेताना खोल दरीत, नदीत, पाण्यात पडून दुर्घटना झाल्याच्या कितीतरी बातम्या येतात. पाण्यात पडलेल्या एकाला वाचवायला दुसरा जातो, तिसरा जातो. त्या सर्वांना पोहता येत नसल्याने म्हणा, किंवा पाण्याच्या आत कपारीत अडकून किंवा पाण्यातल्या खडकावर डोके आटपून त्यांचा अंत झाल्याचे समोर येते. जुन्या काळापासून म्हटले जाते, की ' तुम्ही कितीही शुरबहाद्दूर असा , पण आग आणि पाण्याशी कुस्ती खेळू नका ! बऱ्याचदा पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाचा व खोलीचा अंदाज येत नाही, नदीत गुढगाभर पाणी आहे असे समजून बिनधास्त पुढे जाणाऱ्या व्यक्तिचा पाय पुढे नदीपात्रात वाळूमाफियांनी केलेल्या आठ दहा फूट खोल खड्डयात पडू शकतो व त्या खोल पाण्यात पडून त्याचे बरेवाईट होवू शकते . खानदेशात तापीपात्रात अशा घटनांची नोंद झालेली आहे. ओव्हर कॉान्फिडन्स मध्ये पांझरेच्या मोठी ओढ असणाऱ्या पुरात उडी मारणाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अगदी दगड खदाणीत साचलेल्या पाण्यात उतरलेल्या काहींनी तेथील खडक, कपारी व पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आपले प्राण गमावले आहेत.
           मुळ मुद्दा म्हणजे पट्टीच्या पोहोणाऱ्याने देखील ज्या पाण्याविषयी , जागेविषयी पूर्ण माहिती नाही, तेथे अधिक काळजी घेतली पाहिजे . तोरणमाळच्या यशवंत तलावाचा तळ सापडत नाही, असे काही जण म्हणतात. त्या तलावात पोहोण्यास उतरलेले माहिती खात्यातले एक अधिकारी मित्र मोठ्या मुश्किलीने वाचले होते. तोरणमाळची सीता खाई व खान्देशातच वणीचा देवीचा गड तेथील चितखडा पॉईंट, सातपुडातील मनु देवी, लाळिंगचा धबधबा, धडगाव ते अक्कलकुवा मधला देवगोई घाट, मांगी तुंगी अशी कितीतरी उंच ठिकाणे आहेत . तेथे सेल्फी घेण्याचा मोह कुणालाही होणे साहजिक आहे. पण ही सेल्फी घेताना आपली काळजी आपण घेणे आणि निसर्गाची मर्यादा सांभाळणे आवश्यक असते. तेथे दुर्घटना घडते. त्या दुर्घटनेस त्या जागेला , निसर्गास दोष देता येणार नाही. एक तर प्रत्येकाने स्वतः काळजी घेतली पाहिजे. सेल्फी काढताना ती व्यक्ति स्वतःमध्ये इतकी केंद्रित होवून जाते , की त्यास अवघड जागेचे भान राहात नाही. तोल सांभाळण्यापेक्षा सेल्फी सेट करण्यात मेंदू अधिक व्यस्त होवून जातो .मग थोडाही तोल गेला की दुर्घटना घडते. हे प्रकार सर्वत्र वारंवार घडतात . यास्तव लळिंग धबधबा असो, की इतर अन्य सेल्फी पॉईंट, त्या ठिकाणी या प्रकारे धोक्याची सूचना असणारे दोन चार फलक लावणे, येथे आतापर्यंत कोणकोणत्या तारखांना दुर्घटना घडल्या आहेत, त्याची त्या फलकांवर नोंद करणे आवश्यक ठरते . शिवाय वरच्या बाजुस व खालच्या बाजुस सुरक्षात्मक बॅरीकेटिंग करणे, जाळ्या लावणे आदी उपाय करता येवू शकतील. डोळ्याने दिसणारे निसर्ग सौंदर्य , निसर्ग वैशिष्ठ बाधित न करता हे व शक्य ते अन्य सुरक्षात्मक उपाय अशा पर्यटन स्थळी केले पाहिजेत. त्यापेक्षाही मोठी सुरक्षा ही प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे आणि निसर्गाची मर्यादा राखणे हीच आहे. वर्षा सहलीला जा पण जीवघेणे काहीही होणार नाही खबरदारी पण घ्या.

शांताराम गुडेकर.....
सदस्य -महाराष्ट्र हरित सेना, वन विभाग, महाराष्ट्र शासन (एमसी/२०१७/इंडिया /१६२४६६/२-३-२०१७) 
पार्क साईट, विक्रोळी (प.)
मुंबई - ७९
भ्रमणध्वनी -९८२०७९३७५९

No comments:

Post a Comment

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !           सध्या सर्वत्र सुरू असलेल्या बहुचर्चित विषयावरील आयुष्यमान धना...