Tuesday, 26 July 2022

**शोध स्त्रीशक्तीच्याअस्मितेचा ** **सोनाली प्रकाश शिराळकर व डॉ. विष्णू ज. भंडारे** **(संशोधक विद्यार्थिनी व मार्गदर्शक) (संशोधक विद्यार्थीनी)**

**शोध स्त्रीशक्तीच्याअस्मितेचा **
**सोनाली प्रकाश शिराळकर व डॉ. विष्णू ज. भंडारे** **(संशोधक विद्यार्थिनी व मार्गदर्शक) (संशोधक विद्यार्थीनी)**


( श्री. मंगल डोंगरे ) :
सालाबादाप्रमाणे मुंबई विद्यापिठाने आयोजित केलेल्या १६ व्या आंतरमहाविद्यालयीन आविष्कार रिसर्च कन्व्हेंशनमध्ये सलग दुसर्यांदा एक स्पर्धक म्हणून सहभागी झाले, माझ्या शोध निबंधाचा विषय होता “THE STUDY ON WOMEN IN MUMBAI POLICING : BREAKING THE BARRIERS AND LIGHTING A PATH”, साधारण दिड महिन्याच्या कालावधीत स्वत: तयार केलेल्या प्रश्नावलीच्या आधारे ९८ पोलिंसांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भेटून प्रारंभिक अभ्यास ( पायलट स्टडी) करून सदर निबंध दि.२ मे, २०२२ रोजी मान्यवर परिक्षकांसमोर सादरकेला, ज्याला प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. मार्गदर्शकांच्या सल्यानुसार सदर शोध निबंधाला जास्तीतजास्त वाचकांपर्यंत विशेषत: पोलीस बंधू भगिनिंपर्यंत पोहचवण्यासाठी केलेला हा प्रामाणिक प्रयत्न !
प्रगती पथावर नेणाऱ्या सामाजिक बदलांसाठी क्रांती घडून येणे फार महत्त्वाचे !" ज्या दिवशी आपल्यातील प्रत्येक जण पोलीस समजून एक कर्तव्यदक्ष नागरिकाप्रमाणे कायदा व सुव्यवस्थेचे पालन करेल, त्या दिवशी राष्ट्रीय क्रांती होईल…" - “क्रांती” हा शब्द इतका प्रभावी आहे की, आपल्या देशाच्या प्रगतीत हातभार लावणाऱ्या प्रत्येकाच्या त्यागाची आणि शौर्याची गाथा उलगडते, प्रगतीपथावर देश आगेकूच करत असताना, या प्रगतीत प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा, मगतो पुरुष असो किंवा स्त्री...!
श्री. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या माँसाहेब जिजाऊ असोत किंवा पहिल्या शिक्षिका सावित्रिबाई फुले अगदी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी, धावपटू पी.टी.उषा, अंतराळवीर कल्पना चावला किंवा डॉ. आनंदीबाई जोशी, इथ पासून आयपीएस ऑफिसर किरण बेदी, मिरा बोरवणकर, अर्चना त्यागी, रश्मि करंदीकर यां पर्यंत सर्वांनीच आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.

“We need women at all levels, including the top, to change the dynamic, reshape the conversation, to make sure women’s voices are heard and heeded, not overlooked and ignored.”–Sheryl Sandberg

शेरिल सँडबर्ग यांच्या - या वाक्याला सार्थ ठरवत, स्त्रिया अनेक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना - समाज घडवतात, शिस्त लावतात आणि जेव्हा प्रश्न शिस्तीचा-सामाजिक बांधिलकीचा असतो, तेव्हा पोलिस खात्याला पर्याय राहात नाही !महिलांचे पोलिस खात्यातील योगदान, त्यांचा प्रवास खूपच लक्षणीय आहे. समाजात प्रत्येक दिवसा गणिक येणारी आव्हाने असोत किंवा कोविड १९ महामारी सारखी कठीण परिस्थिती !! या साऱ्याचा आढावा घेण्यासाठी, स्वतः तयार केलेल्या प्रश्नावलीच्या आधारे ९८ पोलिसांचा प्रारंभिक अभ्यास (पायलट स्टडी) केला गेला, अभ्यासात सहभागी होणाऱ्या पोलिसांमध्ये ३१ ते ४० या वयोगटातील पोलिसांची संख्या अर्ध्यापेक्षा ही जास्त होती. महिलांचा पोलीस क्षेत्रातला प्रवास समजून घेणे हा उद्देश तर होताच, पण त्याच बरोबर या प्रवासात येणाऱ्या अडथळ्यांना दूर करत तिमिरातून तेजाकडे जाणाऱ्या वाटचालीचा वेध घेणे हाही होता. पोलीस क्षेत्रात कार्यरत असताना सतत सतर्क राहून वेळोवेळी आपली कर्तव्य बजावणे हे म्हणावे तितके सोपे नाही. तसेच इतर क्षेत्रांसारखीच पोलीस क्षेत्रातही तितकीच स्पर्धा आणि आव्हाने ही आहेत हे ही अभ्यासानंतर लक्षातआले.
भारत हा पुरुषप्रधान देश, त्यात स्त्रियांच्या कार्यक्षमतेबद्दल नेहमीच प्रश्नचिन्ह...! अलीकडच्या काळात खरं तर भारतीय कायद्यानुसार, नोकर भरतीत स्त्रियांना ३३% आरक्षणाची तरतूद झाल्यामुळे, स्त्री - पुरुषांच्या तुलनात्मक अभ्यासात असे लक्षात आले आहे की, “लिंग आणि कार्यक्षमता” यांचा दुरापास संबंध नाही. पोलीस क्षेत्रात स्त्रियांचा लढा १९६० साला पासून अमेरिकेत चालू झाला आणि हळूहळू १९७० पर्यंत सामाजिक बदल घडत गेले. परंतु भारतात कायदा आणि व्यवस्थापनेत स्त्रियांचा प्रवेश १९७० च्या दशकात झाला. ही उत्क्रांती तेव्हा यशस्वी ठरली, जेव्हा युनिफॉर्म फोर्समध्ये पहिल्या महिलेने आपले ठोस पाऊल उमटवले आणि त्यानंतर येणारी तीन दशकेही भारतातील कायदा व व्यवस्थापनाच्या जडणघडणीला कलाटणी देणारी ठरली. २०१०च्या BPRD (ब्युरोऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट) नुसारती सह जार महिला पोलिसांची क्षमता अपेक्षित होती आणि सातव्या UN सर्वेक्षणात आढळले की, भारतातील पोलीस दलात महिलांचा सहभाग खूपच कमी आहे, त्यांचे कारण - लोकांची मानसिकता, समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन, कामाचे स्वरूप ,कामाच्या ठिकाणचे वातावरण आणि येणारी आव्हाने हे सर्व महत्वाचे !
२००५ ते २०१० सालापर्यंतचा काळ हा फारच अवघड होता. भारतातील अनेक राज्यांत, महिला पोलीस क्षेत्रात भाग घेण्यास उत्सुक नव्हत्या, तसेच राजस्थान, हरियाणा, आसाम येथे महिलांचा उल्लेखनीय सहभाग नव्हता. Commonwealth Human Rights Initiative (२००७) नुसार, महिलांसाठी करियरची संधी म्हणून -पोलीस खात्यात नोकरी हा पर्याय नव्हता; याची मुख्य करणे- कुटुंबाचा न मिळणारा पाठिंबा, कामाचे स्वरूप, कामाचे वातावरण, स्त्री-पुरुष भेदभाव, मानसिक-लैंगिक छळही होय! तसेच कित्येक महिलांनी या क्षेत्रात पुढे जाण्याची मानसिकता दाखवली नाही कारण कौटुंबिक जबाबदाऱ्यांना प्राधान्य….!
आजही मुंबईसारख्या महानगरात, मुंबई पोलिसांच्या हद्दीत ९१ पोलिस ठाणी असतानाही फक्त आठ पोलिस स्टेशनच्या प्रमुख महिला आहेत. या अभ्यासात असे निदर्शनात आले की, शासन पुरुषांच्या बरोबरीने या क्षेत्रात महिलांना पुरेशा संधी उपलब्ध करून देत आहे. महिलांची संख्या पोलीस क्षेत्रात वाढती राहणे, हे महिला सबलीकरणाचे संकेत ठरणार आहेत या विधानाला ८५% पोलिसांनी अनुमती दर्शविली आहे.
पोलिसांची भरती ही योग्य निकषांवर केली जाते असे ८४% पोलीसांचे म्हणणे असले तरीही, उरलेल्या १६% पोलिसांच्या मतानुसार सकारात्मक बदलांना वाव आहे हे मात्र निश्चित ! तसेच ८६% पोलिसांचे असे म्हणणे आहे की, करिअरच्या क्षमता सिद्ध करण्यासाठी प्रत्येकाला समान संधी मिळते ; पण त्यातही उर्वरीत १४ टक्के पोलिसांची प्रतिक्रिया ही विचार करायला लावणारी ठरते. घर आणि काम यांचा समतोल साधणे हे सर्वात मोठे आव्हान आहे असे ९९% पोलिसांचे मत आहे. कामाचा जास्त ताण आणि कामाचे अधिक तास, कामाच्या वेळा हे जीवनात समतोल न राखणारे- आव्हानात्मक घटकआहेत, असे ९२% पोलिसांचे म्हणणे होते. त्याच बरोबर स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी दर्जेदार वेळ मिळत नसल्याची खंत ९०% पोलिसांनी दर्शवली. 
पोलीस हे लढवय्ये आणि संरक्षक म्हणून आपली भूमिका ठोसपणे बजावताना दिसतात, कोरोना काळातील त्यांचे योगदान खूपच प्रशंसनीय आहे. शासनाचे धोरण हे पुरूषांप्रमाणेच महिलांनाही करिअरच्या संधी उपलब्ध करून देणे असे असले, तरी प्रत्यक्षात मुली अथवा महिला यांनी पोलिस क्षेत्राचा करिअर म्हणून विचार करण्याची गरज आहे आणि त्यांचा सक्रिय सहभाग त्याहूनही महत्त्वाचा!
महिलांना करियरच्या समान संधी उपलब्ध आहेत असे असले, तरी प्रत्यक्षात या संधीचा खरंच महिला पोलिसांना लाभ घेता येतो का ? या प्रश्नाकडे लक्ष वेधले असता असे निदर्शनात आले की, या क्षेत्रात अनेक पोलिसांनी आपले प्रामाणिक योगदान दिले आणि तरीही त्यांना एकाच पदावर अनेक वर्षे आपला कार्यभार सांभाळावा लागला. घर आणि काम यांच्यात समतोल साधणे हे सर्वात मोठे आवाहन आहे, विशेषतः महिलांना आई, पत्नी, सुन, बहिण, मुलगी आणि कामाच्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या अशा सर्व आघाड्यांवर आपली क्षमता सिद्ध करताना तारेवरची कसरत करावी लागते.
पोलिसांचे कामाचे स्वरूप हे इतर कार्यक्षेत्रांच्या तुलनेत खूपच वेगळे असून, वाढता ताण आणि त्याहूनही महत्त्वाचे कामाचे जास्त तास हा ऐरणीवरचा प्रश्न, सर्व पोलिसांच्या जीवनात असमतोल राखण्यास कारणीभूत ठरतो. वाढता ताण, शारीरिक- मानसिक दडपण, आरोग्यावर होणारा परिणाम, सर्वांच्या वाढत्या अपेक्षा, अशी कसरत करत असताना करिअरच्या कक्षा रुंदावत ठेवणे म्हणजे शिवधनुष्य हाती पेलण्यासारखे आहे. 
समाजाचा स्त्री कडे पाहण्याचा दृष्टिकोन, कुटुंबातून न मिळणारे सहकार्य, आणि पुढे जाण्यास न मिळणारी प्रेरणा, पुरुषांशी केली जाणारी तुलना-हे स्त्रीच्या प्रगतीपथात अडथळे निर्माण करणारे मुख्य घटक ठरतात. आजही स्त्रियांना अनेक प्रकारच्या भेद भावाचा सामना करावा लागतो. एकाच वेळी अनेक कामे हाताळण्याचे कौशल्य स्त्रीकडे असूनही, तिच्या कार्यक्षमतेवर उभेराहणारेप्रश्न..-ही विचार करायला लावणारी बाब आहे. पोलिसांचा दैनंदिन जीवनात गुन्हेगारांशी होणारा सामनाअसो, कामाच्या पद्धती असो, किंवा कामाच्या ठिकाणचे वातावरण असो- हे सारेच इतर कामांच्या तुलनेत खूपच वेगळे आहे ! आजच्या एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने, खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात; मग त्यात पोलीस क्षेत्र कसे मागे असेल?
समाजाचा कल हा नकारात्मक बाजूकडे बघण्याचा अधिक असून, त्या नाण्याच्या दुसऱ्या सकारात्मक बाजूकडे आपले दुर्लक्ष तर होत नाही ना ?याचा विचार करायला हवा. पोलीस महिलांची बदली लग्न अथवा मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या इच्छेनुसार करता येणारी असली, तर महिलांच्या प्रगतीला समाजाचा व शासन व्यवस्थेचा हातभार लागेल. पोलिसांच्या तब्येतीकडे आणि त्यांच्या तंदुरुस्तीकडे अजून जास्त चांगल्या पद्धतीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कामाच्या तणावपूर्ण पद्धतीमुळे जे आनंदाचे शिक्षण हे पोलीस बांधव आणि भगिनी गमावतात, त्यासाठी त्याची भरपाई कामाच्या योग्य मोबदल्याच्या स्वरूपात मिळाल्यास, त्यांना काम करण्यास प्रेरणा मिळेल हे सर्वात महत्वाचे. दिवसाचा काही काळ, पोलिसांनी आपल्या तंदुरुस्तीसाठी ठेवावा व तशी उपायोजना कामाच्या ठिकाणी असावी. आपली कार्यक्षमता वाढती ठेवण्यासाठी योग्य प्रकारचे प्रशिक्षण वेळोवेळी पोलीस बंधू-भगिनींना मिळाल्यास समाजात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवणे सहज शक्य होईल.
आजही कामकाजाच्या समस्यां बरोबर इतर समस्याही पोलिसांसमोर उभ्या आहेत. विशेषतः महिला पोलिसांची या समस्यांमुळे फारच कोंडी होते- बऱ्याच ठिकाणी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यांचा दर्जा टिकवणे फार महत्त्वाचे !अनेकदा बंदोबस्त ड्युटी करताना अस्वच्छतेचा सामना करावा लागतो. पोलिसांचे काम हे समाजाभिमुख आणि समाज व्यवस्थेला हातभार लावणारे कसे करता येईल ?याचा विचार व्हायला हवा. कामाचा दर्जा सुधारण्यावर भर द्यायला हवा आणि समाजाची काळजी घेणाऱ्या सर्व सुरक्षा रक्षकांची काळजी घ्यायला हवी. तुलनेने कनिष्ठपण, अनुभवाने जेष्ठ अशा कमी पदावर काम करणाऱ्या, सर्व पोलीस बंधू-भगिनींना सन्मान मिळणे गरजेचे आहे.
अधिक काम करूनही न मिळणारा भत्ता, एका व्यक्तीवर पालकत्वाची जबाबदारी, वाढता खर्च आणि मिळणारी तुटपुंजी रक्कम यामुळे पोलिसांसमोर अधिक आव्हाने तयार होतात, नोकरीच्या ठिकाणी महिलांकरिता अजूनही पायाभूत सुविधांची कमतरता आहे. महिलांमध्ये खूप सामर्थ्य आहे; असे आपला इतिहास सांगतो, पण तरीही त्यांच्या प्रगतीला पूरक ठरणाऱ्या सुविधांच्या सुधारणेस वाव आहे, त्याच बरोबर पोलिसांनी सुद्धा स्वतःला काळानुसार अपडेट (अद्ययावत) ठेवणे गरजेचे !

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला क्रिया:॥

या संस्कृत श्लोका नुसार अर्थात जिथे स्त्रियांना सन्मानित केले जाते तिथे देवतांचा निवास असतो आणि जिथे स्त्रियांचा अवमान होतो, तिथे केली जाणारे सर्व चांगली कामे ही निष्फळ ठरतात.परंतु आता चित्र बदलत चालले आहे, हळूहळू महिला पोलिसांना जनतेचा आदर आणि विश्वास मिळू लागला आहे. सध्याच्या काळात महिला पोलिसांना गरज आहे ती- खंबीर पाठिंब्याची आणि योग्य मार्गदर्शनाची. कामात होणारा अतिरिक्त किंवा वाढता हस्तक्षेप टाळणे, योग्य प्रकारचे समुपदेशन यांचा उपयोग करून मिळालेल्या संधींना न्याय देता येईल. काळाबरोबर होणारे बदल आत्मसात करण्यासाठी तंत्रज्ञानआणि योग्य प्रकारचे ट्रेनिंग खूप गरजेचे आहे. योग्य प्रकारची सुसज्ज वाहने आणि स्वतःच्या विकासाला पुरेसा वेळ देता येणे हे ही तितकेच महत्त्वाचे!
पत्रकार देबाशिष पाणिग्रही यांच्या मतानुसार, मुंबई पोलिसांमधील महिलांमध्ये सकारात्मकबदल होत आहेत. महिला पोलीस, फक्त कारकुनी काम करण्यासाठी नव्हेतर फिल्ड ड्यूटी करण्यासाठी तितक्याच सक्षम आहेत हे हळूहळू सिद्ध होत आहे. Erik Fritsvold, PhD -Academic Director, M.S. Law Enforcement and Public Safety Leadership in University of San Diego, यांच्या मतानुसार महिलांचा स्वभाव, त्यांच्याकडे असलेली विशेष कौशल्य यामुळे त्यांचे कायदा आणि समाज व्यवस्थापनेतील योगदान खूप महत्त्वाचे ठरते. अशा या संघर्षमय आणि खडतर मार्गावर स्वतःचे खंबीर पाऊल रोवून, लढा देत असलेल्या प्रत्येक स्त्री शक्तीला मनापासून सलाम !
या अभ्यासानंतर अनुमान पर्यंत नक्की येता येईल की, पूर्वी घरी चूल आणि मूल बघणारी स्त्री, समाजाच्या नजरेस न पडणारी स्त्री - आज सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करते आहे व समाजात कायदा आणि सुव्यवस्थापनात पुरूषांच्या बरोबरीने कार्यरत आहे. शेवटी एवढच म्हणावसं वाटतं -तिमिरातून तेजाकडे जाणाऱ्या या महिला पोलिसांच्या प्रेरणादायी आणि अभिमानास्पद प्रवासाला मानाचा मुजरा…!



(लेखिका मुंबई विद्यापीठाच्या, सिद्धार्थ महाविद्यालय संशोधन केंद्राच्या अभ्यासक व आणि लेखक त्यांचे संशोधन मार्गदर्शक आहेत. Email: sonalishiralkar3888@gmail.com , bhandarevjv@gmail.com)

No comments:

Post a Comment

निर्भिड पत्रकार सुरेश म्हात्रे यांचे निधन !

निर्भिड पत्रकार सुरेश म्हात्रे यांचे निधन ! पेण (पंकजकुमार पाटील) :  पेण तालुक्यातील गडब -काराव गावातील निर्भीड पत्रकार व साप्ता...