आदिवासी मुलांच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु !
बुलडाणा, दि. ३ : आदिवासी विकास विभागाच्या बुलडाणा येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दि. ५ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करावे लागणार आहे.
वसतिगृहाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा, विद्यार्थ्यांकडे व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. चालू वर्षातील तहसिलदार यांचा उत्पन्नाचा मुळ दाखला आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे स्वत:चे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे बंधनकारक आहे. हे खाते आधार कार्ड आणि मोबाईलशी संलग्न असावे. प्रवेश घेतलेल्या शाळा, महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, कुटुंब प्रमुखाचे हमीपत्र असावे लागणार आहे. विद्यार्थ्यांचा शाळा, कॉलेज सोडल्याचा दाखला आणि गुणपत्रिका, आधारकार्ड, आई, वडील नोकरीवर नसल्याचे ग्रामसेवक, तलाठी यांचे प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेले महाविद्यालय बुलडाणा शहराचे ठिकाणी असणे आणि मान्यताप्राप्त महाविद्यालय, संस्थांमध्ये मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असणे गरजेचे आहे.
परिपूर्ण अर्जाची प्रत आणि आवश्यक दस्ताऐवज गृहपाल, आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा स्तरीय कार्यालय, येथे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment