बनावट मद्यासाठी प्लास्टिक बुचे बाळगणाऱ्या दोघांवर राज्य उत्पादन शुल्काची कारवाई !
*गणेशोत्सवात विविध ठिकाणी कारवाई*
बुलडाणा, दि. ६ : बनावट विदेशी मद्यासाठी जिवंत प्लास्टिक बुचे बाळगणाऱ्या दोघांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. यात दोघांवर गुन्हे नोंदविण्यात आले, तर यातील एक आरोपी फरार आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अधीक्षक भाग्यश्री जाधव यांचे मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव कालावधीमध्ये अवैध मद्य वाहतूक, निर्मिती आणि विक्री विरोधात दि. ३१ ऑगस्ट २०२२ रोजी बुलडाणा ते खामगांव रस्त्यावर वरवंड शिवारातील दिव्य सेवा फांउडेशनसमोर एक पांढऱ्या रंगाची इंडीका कार क्र. एमएच ३० एई १४०५ ची दारूबंदी गुन्ह्या कामी तपासणी केली असता कारमध्ये बनावट विदेशी मद्यासाठी वापरण्यात येणारे इंम्पेरीयल ब्ल्यू व्हिस्कीचे २ हजार ५०० नवीन वुचे आणि मॅकडॉल नं. १ व्हिस्कीचे २ हजार ५०० नवीन बुचे असे एकुण पाच हजार नवीन बुचे महेंद्र नामदेवराव गोदे, रा. भारती प्लॉट, बाळापूर नाका, अकोला, ता. जि. अकोला आणि श्रीकृष्ण दादाराव गावंडे, रा. घुसर, ता. जि. अकोला या दोघांच्या ताब्यातून सापळा लावून जप्त करण्यात आले. यात कारसह एकुण १ लाख ७३ हजार ८० रूपये मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा चे कलम ६५ ऐ, एफ व ८३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तसेच चिखली परिसरात दि. ३० सप्टेंबर २०२२ रोजी चिखली ते मेहकर रस्त्यावरील लव्हाळा चौफुली, ता. मेहकर येथे सापळा लावून एक सुझूकी कंपनीची एस-प्रेसो क्र. एमएच २८ बीके ६६८४ पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये देशी दारूचे १७.५ बॉक्स यात एकुण ८९३ देशी दारूच्या सिलबंद बाटल्या असा एकूण ३ लाख ८ हजार ९४० रूपयांचा मुद्देमाल शाम किसन चांगाडे, पवन सुभाष अवसरे, दोघेही रा. अमडापूर, ता. चिखली या दोघांकडून जप्त करण्यात आला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कोरडे दिवस जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कमी प्रतीचे बनावट मद्य विक्री होत असल्याने ही कार्यवाही करण्यात आली. जिल्ह्यात बनावट मद्य आढळण्याची शक्यता असल्याने, मद्यसेवन परवाना प्राप्त करून केवळ शासनमान्य अबकारी मद्य विक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी आणि सेवन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
परिसरात अशी अवैध मद्य वाहतूक, निर्मिती आणि विक्री होत असल्याचे आढळल्यास टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३ किंवा व्हॉट्सऍप नंबर ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या पोर्टलवर तात्काळ माहिती कळविण्यात यावी.
या कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक ए. आर. आडळकर, प्र. निरीक्षक आर. आर. उरकुडे, एन. के. मावळे, दुय्यम निरीक्षक आर. एम. माकोडे, जवान एस. आर. एडसरकर, एन. ए. देशमुख, एन. एम. सोळंके, ए. पी. तिवाने, पी. ई. चव्हाण आणि आर. ए. कुसळकर, वाहनचालक पी. टी. साखरे यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा तपास श्री. आडळकर करीत आहेत.

No comments:
Post a Comment