Thursday, 27 October 2022

📖✍️ मी गुरुजी बोलतोय.... (१०)

📖✍️ मी गुरुजी बोलतोय.... (१०)


*कुणबी राजकीय संघटन समितीसह सर्व कुणबी बांधवाना मनापासून शुभेच्छा !* (सर्व प्रकारच्या कार्याचा आढावा घेता घेता, आपण वास्तवतेकडे येऊन विचार करीत आहोत.)
        खरं आणि रोखठोक विचार प्रदर्शित करतो म्हणून कुणाला रागही येत असेल. परंतु, खरं बोललं तर..... ही परिसंवादाची भाषा आहे. *राजकीय संघटन तर केलेच पाहिजे, ती काळाची गरज. त्याचबरोबर सक्षम कार्यकर्ते घडवायला हवेत. त्यासाठी नव्या पिढीला ही माहिती द्यायलाच हवी.*

*चोवीस तास’ राजकारणाचा पाश.....*
        राजकीय पक्षांना राजकारण हवेच आहे. कारण.... *निवडणुका, मराठी, राजकारण, राष्ट्रवेध, राजकारण हे विषय आता आपल्या घरापर्यंत पोहचले आहे.* त्यामुळे कौटुंबिक समुहांमध्ये, भावभावंडांमध्ये, मित्रांमध्ये राजकीय विचारधारेवरून खटके उडू लागले आहेत. *‘व्हॉट्सअप’सारख्या सोशल मीडियावर पेटणारे राजकीय वादही* आपण सगळ्यांनीच अनुभवले आहेत. *राजकीय मतभेद आधीही होते, पण आजच्या सारखे ते विखारी आणि घरफोडे नव्हते.*
        एकमेकांविषयी द्वेष, ईर्ष्या आज जेवढी वाढली आहे, तेवढी याआधी ती कधीही नव्हती. *हे सगळे राजकीय पक्षांना हवेसे आहे.* कारण, त्यातूनच त्यांचे त्यांना हवे तसे मतदार घडणार आहेत. *पण, ‘चोवीस तास’ राजकारणाच्या या पाशात आपल्या सामान्य आयुष्याची माती होणार नाही, याची काळजी आपणच घ्यायला हवी.*
        दिवसभरातील चोवीस तास, राजकारणाचा ध्यास ही आदर्श राजकारणाची आजकालची पद्धत झाली आहे. 
        *वर्षातील ३६५ दिवस, दिवसाचे २४ तास आणि तासाच्या प्रत्येक मिनिटाला फक्त राजकारणच करावे,* असे मानणाऱ्या राजकारण्यांचा वर्ग वाढत आहे. *परंतु या राजकारणामुळे समाजामध्ये दुही माजत आहे. तुम्ही या बाजुला की त्या बाजुला याच्या पलिकडे, हा वर्ग काहीच विचारेनासा झाला आहे. त्यामुळे जीवनाच्या कोणत्याही क्षेत्राला राजकीय रंग देण्याचे घातक काम यांच्याकडून सुरू झाले आहेत.*
        कोरोना विषाणूच्या काळात तातडीचा उपाय म्हणून,  टाळेबंदी करण्यात आली. याच काळात उपासमारीने  मृत्यूही झाले. स्थलांतरित झालेल्या मजुरांच्या संख्येत बिहारी लोकांची संख्या प्रचंड होती, मात्र त्यांना इतर सोयी सुविधा देण्यापेक्षा टीव्ही देऊन त्यावर आपल्या पक्षाचा प्रचार करुन, भाषणे ऐकायला लावणे, यालाच तर चोवीस तास राजकारणाचा ध्यास म्हणतात.
       भारतातील निवडणूक प्रचार मोहिमेचे स्वरूपच आता बदलून गेले आहे. एक प्रकारचा विलक्षण वेग त्यात निर्माण झाला आहे. निवडणुकीत प्रचाराचे *मागील ३० वर्षातील स्वरूप आणि त्यात  झालेल्या खर्चाचा ताळेबंद पहिला तर या दोन निवडणुकांचे वेगळेपण स्पष्ट होते.* शिवाय निवडणूक प्रचारासाठी विराट, विशाल सभा, देखाव्याचे स्टेज, लेझर तंत्रज्ञानाचा वापर यासह प्रचाराचे स्वतंत्र चँनेल आणि *निवडणुकीसाठी लागणाऱ्या पैशासाठी आणलेले बॉंडस, म्हणजे सर्व कांही भव्य आणि दिव्य !*

       *त्यामुळे भारतीय नागरिक हा नागरिक तर सोडाच, पण मनुष्यही राहिलेला नसून तो निव्वळ विकाऊ मतदार झालेला आहे, हेच यातून स्पष्ट दिसून येत आहे.*
       राजकारण या शब्दाला खूप व्यापक अर्थ आहे. *अर्थकारण, धर्मकारण, समाजकारण, युद्धनीती, दंडनीती आणि न्याय अशा अनेक बाबींनी मिळून, राजकारणाची व्याख्या असायची.* लोकशाही ही सर्वोत्तम राजकीय व्यवस्था समजली जायची.
      *लोकशाहीतही दोष आहेत पण, त्यापेक्षा सर्वोत्तम व्यवस्था अजून तरी  राजकीय तज्ञांनी निर्माण केलेली नाही. भारतात संसदीय लोकशाही पद्धती आहे, मात्र देशातील राजकारणाचा बाज मात्र गेल्या चार पाच वर्षात पूर्णतः बदललेला आहे.*
       राजकारण हे लोकशाहीत सदैव चालू असते मात्र एकदा निवडणुका झाल्या की निवडून आलेले सरकार आपली ध्येयधोरणे अमलात आणते. *संसदीय राजकारण आणि निवडणुकांचे राजकारण यात पूर्वी जो फरक होता तो मात्र आता पूर्णतः नष्ट झाला आहे.* चोवीस तास राजकारण यात ‘काळ व्यापकता’ हा मुद्दा आहे मात्र काळा  बरोबर ‘जळी स्थऴी, काष्ठी पाषाणी   म्हणजेच *‘यत्र तत्र सर्वत्र’ राजकारण हीच वृत्ती या चोवीस तास राजकारणाच्या ध्यासाचा भाग आहे.*

         *त्यातच चोवीस तास राजकारण ही वृत्ती लोकांमध्ये बळवण्यास २४ तास चालणा-या, वृत्तवाहिन्यांचा वाटा खूप मोठा आहे. मानवी मनातील विरोध, ईर्ष्या, क्रोध, मत्सर यांना अष्टोप्रहर सचेतन ठेवणे. यातून त्या व्यक्तीच्या विचार करण्याच्या पद्धतीवरच नियंत्रण मिळवणे, हे या वाहिन्याचे साध्य बनले आहे. राजकीय नेत्यांनी देखील याचा वापर सुरू करून दर्शकांना यंत्रवत बनवले आहे. त्यातून २४ तास राजकारण अंगात एवढे भिनले गेले आहे.*
       अगदी एका कुटुंबात वा नातेवाईकात देखील राजकीय मतभेद वा समर्थन पराकोटीला जाऊन पोचलेले आहे. *सुशिक्षित वा उच्च शिक्षित लोकही अत्यंत निराधार वक्तव्ये आणि समर्थन करताना दिसून येत आहेत. कारण सत्याचा संबध मानवी जीवनात खूप अल्प झाला असून, चोवीस तास राजकारणामुळे एक प्रकारची रोगट आणि विरोधाची चुरस, त्वेष आणि त्यातून द्वेषवृत्ती वाढीस लागली आहे.*

       *विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही चोवीस तास राजकारणाने सर्व सामान्य नागरिकांचे जीवन बाधीत केले आहे.*

       *समृद्ध लोकशाहीसाठी राजकीय शिक्षण महत्वाचे असते. चोवीस तास जनतेचे हीत असा या चोवीस तास राजकारणाचा विषय असता, तर कदाचित त्यातून नेते व जनतासुद्धा  राजकीय दृष्ट्या अधिक शिक्षित आणि अधिक प्रगल्भ बनत आहे म्हणता आले असते.*     
       दुर्दैवाने देशात आता तशी स्थिती दिसत नाही. चोवीस तास राजकारण *याचा अर्थ निव्वळ ‘सदा सर्वदा, सर्व प्रहर  वा सर्वत्र ‘ सत्तेचा ध्यास असा घेतला जातो आहे.*
       खरे तर त्याऐवजी २४ तास जनतेचे हित, सतत राजकीय प्रग्ल्भता वाढवणे आणि मानवी जीवन सर्वार्थाने समृद्ध करणाऱ्या जीवनातील सर्वांगांना कवेत घेणे, असा व्यापक अर्थ असायला हवा.
       *आजकालचे राजकीय नेते आपण सतत प्रसार माध्यमात राहावे, आपले अस्तित्व चोवीस तास सामाजिक आणि राजकीय पटलावर असावे, म्हणून चोवीस तास राजकारण करत असतील तर तशीही स्थिती नाही. राजकारणाचा अर्थ एवढा संकुचित झालेला आहे की, देशातील सत्ताधारी किंवा विरोधकही राजकीय कार्यक्रमाशिवाय साहित्य संमेलनात, काव्य मैफलीत वा एखाद्या नाट्य मेळाव्यास किंवा संगीत समारोहात अजिबात दिसून येत नाहीत.*
      चोवीस तास राजकारण ही बाब संवेदनशील व्यक्तीसाठी कठीण असते. *जनतेने लोकशाहीत कोण्या एखाद्या पक्षाच्या बहुमताचे साधन न बनता, सर्वार्थाने परीपूर्ण जीवन जगावे, अशी भूमिका घेऊन वावरणारे नेते आधी होते. हे नेते, राजकीय नेते असण्यासोबतच लेखक, समीक्षक, वाचक, कवी आणि अगदी चित्रकारही होते. आज असा एकही नेता दिसत नाही.* ‘चोवीस तास राजकारण’ या वृत्तीने राजकीय नेत्यांना पाच वर्ष, ३६५ दिवस, चोवीस तास, निवडणुकीतील उमेदवार बनवून संसदीय राजकारणातील स्टेट्समनशीपचा अंत केला आहे.
       *‘चोवीस तास राजकारण’ या वृत्तीतून प्रजेची किंमत एक माणूस म्हणून नव्हे, तर एक मतदार म्हणूनच होऊ शकते. उद्या एखाद्या आपत्तीत मनुष्यहानी झाली तर, मेलेले लोक कोणत्या पक्षाचे मतदार होते, हेच बघितले जाईल. जे येणा-या पिढ्यासाठी खूप घातक असेल.*
                        शाहीर वसंत भातडे 
                      *मो. ९९६७९८३३०२*

No comments:

Post a Comment

घाटकोपर मनपा एन विभागात नालेसफाईत महाघोटाळा ?नालेसफाई नाही तर, ही तर हात सफाई ? नालेसफाईच्या कामाची चौकशी करण्याची मागणी !!

घाटकोपर मनपा एन विभागात नालेसफाईत महाघोटाळा ?नालेसफाई नाही तर, ही तर हात सफाई ? नालेसफाईच्या कामाची चौकशी करण्याची मागणी !! नालेसफाई करणाऱ्य...