Thursday, 26 January 2023

श्री.महालक्ष्मी कलामंच मुंबई निर्मित - *वीररत्न बाजीप्रभू* रंगमंचीय कलाविष्काराचा शुभारंभीय नाट्यप्रयोग !

श्री.महालक्ष्मी कलामंच मुंबई निर्मित - *वीररत्न बाजीप्रभू* रंगमंचीय कलाविष्काराचा शुभारंभीय नाट्यप्रयोग !
    
     छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवकालीन इतिहास माणसाच्या मनामनात रुजावा त्याच्या पाऊलखूणा सतत जीवंत ठेवण्याचा प्रयत्न *श्री. महालक्ष्मी कलामंच मुंबई"* ही नाट्यसंस्था करीत आहे. राम शिंदे लिखित *"वीर शिवाजी"* या ऐतिहासिक नाटकाच्या ३१ यशस्वी प्रयोगानंतर संस्थेचे २ रे नाट्यपुष्प 'श्री.विद्याधर शिवणकर' लिखित *"वीररत्न बाजीप्रभू"* या नाटकाचा शुभारंभ प्रयोग २१जाने.२०२३ रोजी दामोदर नाट्यगृह परळ,मुंबई येथे हाऊसफुल झाला.

      सिद्धी जौहारच्या बुलंद वेड्यातून पन्हाळ्यावर कोंडलेला महाराष्ट्राचा पंचप्राण "शिवाजी महाजांना" विशालगडी सुखरूप पोचवताना ६०० बांदल,देशमुखांच्या असामान्य पराक्रमाची, शिवा काशिदांच्या बलीदानाची आणि बाजु प्रभूंच्या पवित्र स्वामीनिष्ठेची यशोगाथा सांगणारी नाट्यकलाकृती म्हणजेच *वीररत्न बाजीप्रभू !*

.       या नाटकाचा पडदा उघडताच छ.शिवाजी महाराजांच्या घोषणांनी आणि टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृह दणाणून सोडले होते. मंद प्रकाशझोतात रंगमंचाच्या मध्यभागी पाठमोऱ्या बाजी प्रभूंचा (संदीप शिंदे) बलदंड देहएखाद्या पहाडासारखा उभा ठाकला होता. त्यातंच फुलाजी प्रभूंची (संजय मांडवकर) यांची एन्ट्री झाली.जणु मावळ प्रांतातील स्वराज्याचे दोन बुरूजंच भासावे असे दोन सख्खे बंधू प्रेक्षकांच्या समोर येताच नाटकाचा पात्रपरीचय ही सूरूवात छान वाटली.

           आदिलशाही सरदार कृष्णाजी बांदल (दीपक रायकर) म्हणजे स्वतःला राजे समजत असत. शिवाजी महाराजांचे राजेपण त्यांना पसंत नव्हते. महाराष्ट्राला वाचविण्यासाठी एकत्र येऊन गनिमाशी झुंजले पाहिजे असा शिवाजी महाराजांचा खलिता येताच कृष्णाजी बांदलांची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांचे मुख्य शिलेदार बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभूं या जोडगोळीला शिवाजी महाराजांशी लढण्यास प्रवृत्त करतात. धन्याशी एकनिष्ठ रहावे म्हणून हे दोघेही लढण्यास सज्ज होतात. शत्रृला गाफील ठेऊन त्यांच्या गोठात शिरून विजय मिळवावा ही शिवाजी महाराजांची रणनिती इतिहासात अमर आहे. महाराजांनी अमावस्येच्या मुहर्तावरंच मोजक्या मावळ्यांसह कृष्णाजी बांदलावर हल्ला चढविला, सामोपचाराने ऐकले नाहीत म्हणून जशास तसेच उत्तर द्यावे या हेतूने स्वराज्याचे निष्ठावंत सरदार आबाजी प्रभू (प्रदीप रेवाळे) कृष्णाजी बांदलांवर तुटून पडले त्यात कृष्णाजी बांदल धारातीर्थ पडले. धन्याच्या सुडाचा बदला म्हणून बाजी,फुलाजी ही जोडी आबाजी आणि महादजीवर तुटून पडली. वयानं आणि  युद्धकौशल्यात माहिर असलेल्या आबाजीशी लढताना बाजींचे डावपेच आणि आवेश पाहून खुद्द शिवाजी महाराज भारावून गेले." त्यांनी युद्ध थांबवले.आणि या दोन्ही बंधूना आपल्या हक्क आणि कर्तव्याची जाणीव करवून स्वराज्यात सामील केले.

          . अशा या हातघाईच्या प्रसंगात शांत, संयमी आणि सोज्वळ मुद्रा असलेले शिवाजी महारांज (प्रणय धाडवे) यांनी भूमीकेला न्याय देण्याचा नेटाने प्रयत्न केला. त्यांचे अष्टप्रधान मंडळातील त्रंबक पिंगळे (हरीष कदम) आणि गंगाधर पंत  (दस्तुरखुद्द विद्याधर शिवणकर) यांनी आपल्या ओघवत्या मधाळ वाणीने  पंतांची भूमिका चांगलीच रंगवली होती. पन्हाळ्याचे किल्लेदार विठोजी(आत्माराम बाचिम), महादजी (ओमकार बोरकर), यशवंता (विनायक धामणे), सखू (श्रद्धा पांचाळ) आणि रत्ना तमासगीर (सोनल गुरव) यांनी मावळ खोऱ्यातल्या रांगडी भाषेतून आपला अभिनय चांगलाच खुलवला. सिने-नाट्य अभिनेत्री सोनल गुरव यांच्या लावणीच्या अदाकारीने प्रेक्षकांना भूरळ पाडली, प्रेक्षकांनी त्यांच्या लावणीला टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.

            मराठ्यांच्या एका पाठोपाठ एक प्रवेशानंतर उत्सुकता वाढत असतानाच आदिलशाही दरबार दाखवण्यात आला. नेपथ्य डिझायनर श्री. प्रदीप रेवाळेंच्या प्रायोगिक डिझाईनने सजलेल्या नेपथ्याला प्रकाश योजनाकार (नितिन बैकर) यांनी विविध रंगछटांच्या आताशबाजीने रंगमंच प्रकाशमान केला होता. या मनमोहक आकर्षक रंगमंचावर नजर खिळलेली असतानाच कानावर पडणारे पार्श्वसंगीतांचे स्वर प्रसंगाची रंगतता वाढवीत होती. पार्श्वसंगीतकार (योगेश बेंद्रे-अविनाश गोसावी) यांनी प्रसंगानुरूप संगीताच्या स्वर, लय आणि तालबद्धतेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. दरबारात उपस्थित आदिलशाही सरदार.. फाजल (शेखर आग्रे), रुस्तमे जमाखाॕं (अमोल जोगरे) .वजीर. (सचिन पानगले) हितगुज करीत असतानाच दरबारात बडी बेगम (अपेक्षा रानडे) आणि तिचा नातू अदिलशाह ( गौरव चव्हाण) यांची एन्ट्री झाली. बडी बेगम आणि छोटा आदिलशाह यांच्या करारी मुद्रेतील भाषेचा कडवटपणा दरबारातील सरदारांना खुजं करून ठेवत होती. त्यातंच वयानं लहान असलेल्या अदिलशाहाचे बोचरे बोल " हमारी हिफाजत मे जाँंबाजोंकी नही, बल्की नामर्दोंकी फौज भरी है !" या वाक्यांनी  सरदारांना अपमानीत करीत होती. आपल्या वालिदांचा मृत्यूमयी देह रणांगणावर सोडून पळालेल्या आणि पन्हाळा किल्ला घाबरून मराठ्यांच्या ताब्यात देऊन पळून आलेल्या फाजल खानाला आणि रुस्तमे जमाहचा बडी बेगम चांगलाच समाचार घेत होत्या. या संवादाच्या अतिशबाजीत अभिनयातील हावभाव कलाकारांच्या अंगिक अभिनयातून खुलून येत होता. त्यातंच कर्नुळचा रांगडा सरदार सिद्धी जौहार (प्रसाद धोपट) यांच्या एन्ट्रीने नाटकातील उत्साह शीगेला पोचला होता...सिनेनाट्य अभिनेते प्रसाद धोपट यांच्या करारी मुद्रेने आणि रांगडी भाषेने तसेच त्यांच्या पेहरावानी सिद्धी कमालीचा रंगवला होता.

            दिवसेंदिवस पन्हाळ्याचा वेढा आवळला जात असताना गडावरील संपत आलेली कुमक आणि धान्याची रसद पाहता शिवाजी महाराजांची घालमेळ मात्र प्रजेची काळजी कशी करावी आणि त्यातून मार्ग कसा काढावा याचाही भावूक अभिनय नवोदित प्रणय धाडवे यांनी चांगलाच रंगवला होता. कंसाच्या मथूरेत बंदिवान झालेला कृष्ण गोकूळात कसा सुखरूप पोचवावा या काळजीत असलेला वासुदेव बांजींच्या भूमिकेतून दिसत होता. या सल्ला-मसलतीत बाजी-फुलाजींच्या योजना बाजी महाराजांना पटवून देत असताना बाजींचा अभिनय पाहण्यासारखा होता...  त्यातंच शिवा काशीदच्या (अक्षय रामाणे) यांच्या  हुबेहूब महाराजांच्या पेहरवातील एन्ट्रीने टाळ्यांचा कडकडाट झाला. कदाचित् इतिहास माहित असल्याने पुढे काय होणार याचा प्रेक्षकांना अंदाज होताच तरीही अक्षयने आपल्या रांगड्या भाषेतील रंगवलेल्या शिवा न्हाव्याची भूमिका आणि नाट्यमतरीत्य फुलवलेली शिवाजी महाराजांची भूमिका असा दुहेरी अभिनय करताना प्रेक्षकांची वाहवा मिळवत होता. मरणाला मिठी मारायची आहे माहित असतानाही महाराजांनी सिद्ध्याच्या गोठात त्यांच्याच वेशात जाण्यासाठी  महाराजांनी आपला पेहराव,आभूषणे आणि जिरेटोप शिवाच्या हातावर ठेवताना भावूक झालेला  शिवा काशीद यांचा अभिनय पाहताना डोळ्यात पाणी आले. 

         बाजी- फुलाजींच्या योजनेने गुरुपोर्णिमेच्या मध्यरात्री सिद्धी जौहारचा बुलंद वेढा फोडून ६०० बांदल गडावरून निघाले. त्यात दोन पालख्यांचे नियोजन केले होते एका पालखीत महाराज तर दुसऱ्या पालखीत महाराजांचं सोंग घेतलेला शिवा काशीद.महाराज निसटले पण शिवा काशीद पकडला गेला.. त्याला सिद्धीच्या छावणीत आणलं जातं, महाराजांच्या मान-मरतबात सिद्धी स्वागत करतो. तरीही एका हशमाकरवी खातरजमा करतो. मगच तहाची बोलणी चालू असताना दुसरा हशम येऊन बातमी सांगतो,हुजूर सिवा भाग गया!सिद्धी मात्र शिवाने हुबेहुब रंगविलेल्या सोंगाने बुचकळ्यात पडतो. तत्क्षणी फाजल आणि शिवाची नजरानजर होते.आपल्या बापाचा कोथळा फाडणारा शिवाजी फाजलच्या मस्तकात भीनलेला  होताच त्याने शिवा हा सोंगाड्या असल्याचेओळखताच शिवाच्या छाताडात तलवार घुसवतो. शिवा जमीनीवर कोसळताना म्हणतो, 'जन्माने शिवा न्हावी म्हणून जगलो पण मरताना शिवाजी महाराज म्हणून मरणार याहून भाग्य ते कोणते?' आणि देह जमीनीवर ठेवला. आपल्या धन्यासाठी प्रसंगी प्राणांची आहुती देणारे मराठे किती निगरगठ्ठ असतात याची जाणीव सिद्धीला होते तेव्हा मात्र शिवाजी महाराजांचे आणि त्यांच्या शिलेदारांचे कौतुक करताना अनूभवी कलाकार प्रसाद धोपट यांनी कडाडून टाळ्या घेतल्या. कर्तव्याची जाण होताच सिद्धीने फाजल आणि रुस्तमला शिवाजीच्या मागावर फौज घेऊन धाडतात आणि प्रवेश संपतो. 

              त्यानंतरचा प्रवेश उघडताच नेपथ्यकारांच्या (अशोक पालेकर) नेपथ्याचा प्रायोगिक पद्धतीने प्रतिकात्मक खिंड, धो-धो कोसळणारा पाऊस त्याला साजेशी प्रकाशयोजना म्हणजे नेपथ्य डिझायनर प्रदिप रेवाळे यांनी कलात्मकतेचा कस लावलेला होता. गजापूरच्या त्या घोडखिंडीत बाजींनी पालखी थांबवली.गनिमाच्या आरोळ्या कानावर येताच बाजीनी महाराजांना आर्जव केली. राजं यातले  ३०० मावळे घेऊन तुम्ही खेळणा गड गाठा... तुम्ही सुखरूप पोचल्यावर तोफेचा बार उडवून इशारत द्या. तोवर या खिंडीतना एक शत्रुही पुढं येऊ  देणार नाही"! त्यावर महाराज म्हणतात, "नाही बाजी, तुमच्यासारख्या जीवाच्या जिवलगांना सोडून आम्ही पुढे जाणार नाही. तुमच्या थकल्या खांद्यावर स्वराज्य सोडून जायला  राजे नाही झालोत आम्ही !".... नाही राजं, आमच्या वडीलकीच्या नात्याने तुम्हाला ऐकावंच लागेल, राजं," माझ्यासारखे लाख बाजी मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहीजे, राजं निघा !"....बाजी-फुलाजी आणि शिवाजी महाराजांच्या संवादाची जुगलबंदी अभिनयातून चांगलीच भासली. अखेर मरणाला कवेत घेऊ पाहणाऱ्या बाजी-फुलाजींना महाराजांनी कडकडून मिठी मारण्याचा तो प्रसंग मात्र प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी आणून गेला.

                राजांना शेवटचा मुजरा करून बाजी-फुलाजी छातीची ढाल करून खिंडीत उभे राहीले होते. बाजी सवंगड्याना प्राणपणाने खिंड लढवण्यास प्रोत्साहीत करीत असताना अंगावर काटा उभा राहायचा. लेव्हलवरील कलाकारांची मांडणी मात्र दिग्दर्शक (श्री. प्रकाश लाड) यांनी अभ्यासपूर्वक केली होती. दुश्मनांच्या अमाप सैन्याचा घाला रंगमंचावर दाखवताना ती अजरामर लढाई हुबेहुब दाखवण्यात दिग्दर्शकांची कल्पकता दिसून आली. यवनांशी लढताना कान्होजी जेध्यांचा पुत्र आणि जीगरबाज मावळा (श्वेताली अडसुळ) यांची तलवारबाजी वाखाणण्याजोग होती. एक-एक मावळा स्वराज्याच्या कामी येत होता त्यातंच फुलाजी प्रभूंनी देह ठेवला... मग बाजी दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन लढू लागले. इतिहासातील 'न भुतो नि भविष्यती' असा रणसंग्राम रंगमंचावर दाखवताना दिग्दर्शकांची युद्ध कौशल्यनिती भारावून टाकत होती.इतक्यात बंदुकीची गोळी बाजींच्या छातीत घुसते बाजी कोसळतात पण तोफेचे बार कानी न पडल्याने अर्धमेल्या स्थितीत पुन्हा उठून लढू लागतात तोच तोफेचे बार कानी येतात.या भारत मातेचं सौभाग्य सुखरूप विशालगडी पोचल्याचं कळताच बाजींनी प्राण सोडला. रंगमंचावर स्मशान शांततेत.....

*श्रीबाजींचे रक्त पेरिले खिंडीत त्या काला, म्हणोनि रायगडी स्वातंत्र्याचा राज्याभिषेक जाहला!"*
 वि.दा. सावरकरांच्या त्या कवितेने नाटकाचा पडदा पडला.
            पावनखिंडीचा धगधगता इतिहास दोन अंकात आटोपता घेताना लेखक/दिग्दर्शकांची फरफट झालेली दिसली. परंतू पहिला प्रयोग असल्याने अंदाज बांधणे कठीण होते हे ही तितकंच खरं होतं.यामध्ये मराठे मावळे (चंद्रकांत गोताड, रविंद्र केसरकर,संदेश आग्रे) तर यवनी सैन्य (अजय ओर्पे, संदेश घाणेकर ,दिपक मायंगडे) यांच्याही छोट्या-छोट्या भूमिका उठून दिसल्या. कलाकारांची प्रत्येक भूमिका हुबेहूब रंगविण्यात रंगभूषाकार (उल्लेश खंदारे) यांनी कसर ठेवली नव्हती. प्रत्येक कलावंताचा पेहराव वेशभूषाकारांनी (स्व.नाना शिंदे) चांगलाच सजवला होता. या प्रयोगात लेखक/दिग्दर्शक/नेपथ्यकारआणि अभिनेता म्हणून नावारूपाला आलेले श्री. प्रदिप रेवाळे आणि नाट्यदिग्दर्शक व सिनेनाट्य अभिनेते श्री.प्रसाद धोपट यांच्या अनूभवाच्या जोरावर नाटकातील नव्या- जुन्या कलाकारांनी लेखकाच्या संहितेला आणि दिग्दर्शकांच्या कल्पनाविस्ताराला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला दिसला. व्यवस्थापनेत श्री.मनोज पाताडे, योगेश ओकटे, गिरिजा शींदे, अक्षता आवसरे यांनी आपापली भूमिका चोख बजावली. माऊली कलामंचाच्या शिलेदारांचे सहकार्य लाख मोलाचे ठरले.
        एकंदरीत *वीररत्न बाजीप्रभू"* या नाटकाचा पहिला शुभारंभीय प्रयोगहाऊसफूल्लमध्ये यशस्वी झाला. 
, *वीररत्न बाजीप्रभू* या नाटकाच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!!!💐💐💐
         🌹 *शब्दांकन*  🌹
      🙏 *संतोष सारंग*🙏
(नाट्याभिनेता/दिग्दर्शक /निवेदक आणि शिवव्याख्याता)

10 comments:

  1. खूपच छान सविस्तर लेखन.... सारंग सर तुम्हाला मानाचा मुजरा

    ReplyDelete
  2. खुप सुंदर👍🏼

    ReplyDelete
  3. Superb play.. I loved it a lot

    ReplyDelete
  4. खूप छान आहे

    ReplyDelete
  5. खूपच सुंदर.. संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला वाचताना.. अवांतर लेखन.. महाराज आणि त्यांच्यासाठी प्राणाची आहुती देणारे आपले मावळे.. खरचं व्यक्त न करता येण्यासारखं.. प्रत्येक कलाकाराला मनाचा मुजरा..

    ReplyDelete
  6. खूप छान, अप्रतिम नाटक. उत्तम अभियानाने नटलेली कलाकृती.

    ReplyDelete

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! घाटकोपर, ...