Wednesday, 25 January 2023

"वडेश्वर शिवमंदिर" अंभई ता. सिल्लोड - रामेश्वर जाधव पाटील

"वडेश्वर शिवमंदिर" अंभई ता. सिल्लोड 

औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यात अजंठा डोंगराच्या सानिध्यात अंभई हे खेडेगाव आहे. हे गाव सिल्लोडपासून ३५ कि.मी. अंतरावर आहे. येथे असलेले शिवमंदिर चालुक्यकालीन मंदिरापैकी एक सुंदर मंदिर आहे. हे शिवमंदिर त्रिदल पध्दतीचे आहे. येथील मंदिरास तीन गर्भगृह आहेत. मंदिर पूर्वाभिमुख आहे ; तर मंडपाच्या पश्चिम, दक्षिण व उत्तर बाजूस गर्भगृहे आहेत. या मंदिराची पूर्वपश्चिम लांबी ६५ फूट आणि दक्षिण उत्तर रुंदीही ५० फूट आहे. एका चार फूट उंचीच्या जोत्यावर मंदिराची उभारणी केली आहे. हे मंदिर इसवी सनाच्या १२ व्या शतकात सोमेश्वर तिसरा याच्या कारकिर्दीतीत बांधले. 

गर्भगृह

मंदिराला तीन गर्भगृह आहेत. मंडपाच्या पश्चिम, दक्षिण आणि उत्तरेस गर्भगृह आहेत. मुख्य गर्भगृहाचा आकार ८ बाय ८ चौरस फूट आहे. मुख्य गर्भगृह मंडपाच्या पश्चिमेस असून ते शिव वडेश्वर यास अर्पण केले आहे. हे गर्भगृह पृष्ठभागापासून ४.९ फूट खोल आहे. त्यांच्या गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर गणेश शिल्प कोरले आहे. दक्षिण गर्भगृह विष्णू मंदिर आणि उत्तर गर्भगृह ब्रह्मदेवाचे मंदिर आहे. याठिकाणी सप्तमातृकाची शिल्प कोरलेली आहेत. मंडपाच्या दक्षिण आणि उत्तरेकडील गर्भगृहाचा आकार ४.१० चौरस फूट आहे. मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराची उंची ५.८ फूट व रुंदी ३ फूट आहे. 

अंतराळ

तिन्ही मंदिरासमोर अंतराळ आहे. मुख्य अंतराळ गर्भगृहासमोरील अंतराळ दक्षिण - उत्तर ८.६ फूट लांब व पूर्व-पश्चिम ६.६ फूट रुंद आहे. त्यांच्या प्रवेशद्वाराची उंची ५.८ फूट आहे. मंडपाच्या दक्षिण व उत्तरेकडील गर्भगृहासमोरील अंतराळ ४.१० चौरस फूट आकाराचे आहेत. त्यामध्ये देवकोष्ट आहेत. या देवकोष्टात ब्राम्ही, सरस्वती आणि वैष्णवी इत्यादी शिल्प आहेत.मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर कीर्तीमुख कोरलेले आढळते. येथे मंदिराच्या प्रवेशद्वारावर ४ द्वारशाखा आहेत. याठिकाणी व्यास स्तंभ आणि कलस कलाकृती कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वाराची जी चौकट आहे. ती चतुशाखा होय. चतुशाखाद्वार यास गांधारी किंवा मध्यद्वार म्हणतात. मंडपाचे आढे उद्ध्वस्त झाले आहेत. 

मंडप

अंतराळाच्या समोर मंडप आहे. या मंडपाचा आकार ३४ बाय ३४ चौरस फूट आहे. मंडपात २८ स्तंभ आहेत. मध्यभागी ४ स्तंभ आहेत. याच ४ स्तंभानी मंडपाच्या छताला प्रमुख आधार दिलेला आहे. मंडपात मध्यभागी १० बाय १० चौरस फुटाचे व्यासपीठ आहे. हे रंगशाला होय. याठिकाणी नंदीचे शिल्प आहे. मध्यभागातील ४ स्तंभावर छताला पेलून धरलेले आढे आहेत. मंडपात दोन देवकोष्ट आहेत. परंतु आज त्यामध्ये कोणत्याही देवतेची मूर्ती नाही. देवकोष्ट कोरीवकाम करून सजविले आहेत. 

बाह्यभिंत

मंदिराच्या बाह्यभिंतीवर २८० सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. यामध्ये उपना, कणी व पद्म उल्लेखनीय आहेत. येथे २१४ हंस शिल्पीत केले आहेत. येथेच कीर्तीमुख सुध्दा कोरलेले आढळतात. मंडोवर आणि जंघा भागावर अष्टदिगपाल, शिव, सुरसुंदरी, अप्सरा, मिथुन शिल्पे, नटराज, भैरव, नृवराह, विष्णु व सूर्य इत्यादी शिल्पे कोरलेली आहेत. नटराज, शिव, भैरव, विष्णु, नृवराह, सूर्य आणि ब्रम्हा इत्यादी शिल्पे देवकोष्टावर कोरलेली आढळतात. येथे ३८ नृत्यांगनांची शिल्प आहेत.
येथे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.
गावकारी मोठ्या हिरीरीने यात भाग घेतात. सद्ध्या या मंदिरावर हरिनाम सप्ताह चालू आहे.

मराठवाडा स्थित चाळुक्यकालीन शिवमंदिर - रामेश्वर जाधव पाटील

No comments:

Post a Comment

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न "

"सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती वकृत्व स्पर्धेद्वारे संपन्न " सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त...