मंडळ अधिकारी टिटवाळा, म्हारळ बु कार्यक्षेत्रात अवकाळी पावसामुळे नुकसान नाही? तलाठी सजा कल्याण (प) व चवरे येथे घरांचे नुकसान !
कल्याण, (संजय कांबळे) : मागील आठवड्यात कल्याण तालुक्यात अवकाळी पावसामुळे आंबा मोहर,विटभट्टी, भाताचा पेंडा, विविध चारा पिके, भाजीपाला, तसेच काही ठिकाणी घंराचे, झाडांचे नुकसान झाले असताना मंडळ अधिकारी टिटवाळा, आणि मंडळ अधिकारी म्हारळ बु या कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचा अहवाल कल्याण तहसीलदार जयराज देशमुख यांना दिला असून केवळ तलाठी सजा कल्याण(प) व तलाठी सजा चवरे येथे घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हाहाःकार उडविला होता. कल्याण तालुक्यातील टिटवाळा मंडळ अधिकारी क्षैत्रात, ३ मार्च ते ७ मार्च २०२३ रोजी अवकाळी पाऊस पडला. तर मंडळ अधिकारी म्हारळ बु क्षैत्रात ७ व ८ मार्च २०२३ मध्ये अवकाळी पाऊस पडला. यामध्ये टिटवाळा कार्यक्षैत्रातील टिटवाळा सजा, बापसई, चवरे, कुंदे, घोटसई इत्यादी सजेत कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. याशिवाय मंडळ अधिकारी म्हारळ बु क्षैत्रातील तलाठी सजा कल्याण, वाडेघर, चिकणघर, बारावे, सापाड, शहाड, आंबिवली, म्हारळ तलाठी सजेत कांबा, रायते, वाहोली व वसत शेलवली,आदी परीसरात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही असा अहवाल कल्याण तहसीलदार जयराज देशमुख यांना देण्यात आला आहे .
केवळ तलाठी सजा चवरे मधील म्हसरोंडी गावातील काळुराम मंगा भला याच्या घराचे कवले, तांदूळ, खुर्ची, कपडे, टाकी, भांडी असे १२/१३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच कल्याण पश्चिम तलाठी सजेतील चिखलेबाग, संतोषी माता रोडवरील मिराबाई सुर्वे चाळीतील चौघांच्या घरावर ताडाचे झाड पडून दिड ते दोन लाख रुपये पर्यंत नुकसान झाले आहे. यामध्ये राजू रमेश कांबळे, संतोष दामु खिलारे,कैलाश कृष्ण
धानपुरे आदींचा समावेश आहे.
यांच्या घरांचे पत्रे, भिंती, कपाट, पंखे, साहित्य यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कल्याण ग्रामीण भागातील आपटी, येथेअवकाळी पावसामुळे आंब्याचे मोहर, पळसोली, गेरसे कोसले, काकडपाडा येथे वीटभट्टी, मांजर्ली, मानिवली, पिंपळोली, रायते येथे भाताचा पेंडा, भाजीपाला पिके, गुरांचा चारा, गोवेली ठाकूरपाडा येथे शौचालयाचे पत्रे असे अनेक गावात अवकाळी वादळी पावसाने नुकसान झाले असताना या भागात नुकसान झाले नसल्याचा अहवाल संबंधित तलाठ्यानी दिल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये संताप पसरला आहे.
प्रतिक्रिया - जयराज देशमुख (तहसीलदार, कल्याण)
-वीटभट्टी हा व्यवसायीक धंदा आहे, तो आपल्या नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई मध्ये येत नाही, त्यामुळे त्यांचे पंचनामे करण्यात आले नाही.
सोमनाथ मिरकुटे(कल्याण तालुका अध्यक्ष, काँग्रेस पक्ष)
-आंबा पिक, भाजीपाला, भाताचापेंडा,चारा पिके यांचेही नुकसान झाले आहे, त्यांना नुकसान भरपाई मिळायला हवी.
No comments:
Post a Comment