दोन हजारांच्या नोटांबाबत आरबीआयने केल्या बँकाना व ग्राहकांना सुचना !
भिवंडी, दिं,२२, अरुण पाटील (कोपर) :
दोन हजारच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा महत्त्वाचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) घेतला आहे. २३ मे पासून स्थानिक बँकांमध्ये दोन हजार रूपयांच्या नोटा बदलून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. २ हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत ‘आरबीआय’कडून देण्यात आली आहे. दरम्यान,आज (दि.२२) या संदर्भात आरबीआयने देशातील बँका आणि ग्राहकांसाठी काही सूचना केल्या आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या सूचनेमध्ये नमूद केले आहे की, नागरिकांना 23 मेपासून स्थानिक बँकेत २ हजार रुपयांच्या नोटा जमा करून त्याच्या बदल्यात रक्कम घेता येणार आहे. एकावेळी जास्तीत जास्त २० हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळतील, असे देखील आयबीआयने दिलेल्या सूचनेत सांगितले आहे.
दोन हजार रुपयाची नोट बदलून घेण्याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाने रविवारी स्पष्ट केले की, बँकेचे ग्राहक आता कोणतीही मागणी स्लिप न मिळवता त्यांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा बदलू शकतात. ग्राहकांना त्या वेळी कोणताही ओळख पुरावा किंवा कोणताही फॉर्म सादर करण्याची आवश्यकता नाही. स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या सर्व शाखांना ग्राहकांची गैरसोय न करता सुरळीत आणि अखंडपणे नोटा बदलून देण्याचे काम सुरु ठेवावे यासाठी सहकार्य करावे, असे सांगितले आहे.
No comments:
Post a Comment