Thursday, 3 August 2023

कल्याण तालुक्यातील कृषी विभाग असंवेदनशील, वरीष्ठांच्या सूचनेनंतर देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे ढुंकूनही पाहिले नाही ?

कल्याण तालुक्यातील कृषी विभाग असंवेदनशील, वरीष्ठांच्या सूचनेनंतर देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे ढुंकूनही पाहिले नाही ?

कल्याण, (संजय कांबळे) : वेगवान निर्णय गतीमान सरकार, हे सरकार डबल इंजिन सरकार, शेतकऱ्यांना वा-यावर सोडणार नाही, सर्वसामान्याचे सरकार अशा घोषणा, वल्गना आपण वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तोंडून ऐकत असतो, पण त्या किती पोकळ, फसव्या आहेत हे कल्याण तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या उदाहरणावरून दिसून येत आहे. या शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त होऊनही शिवाय जिल्हा विकास कृषी अधिकारी यांनी सूचना देऊनही एकाही कृषी अधिकारी, किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी या शेतकऱ्यांकडे ढुंकूनही पाहिले नाही.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागील आठवड्यात आलेल्या मुसळधार वादळी पावसामुळे तालुक्यातील पिंपळोली गावातील प्रगतीशील शेतकरी मधुकर हरी रोहणे यांनी मुंबई वडोदरा एक्स्प्रेस मधून वाचलेल्या माळरानावर घरातील संपूर्ण कुंटूब राबून गोसाळी, काकडी, आणि शिरोली (दोडका) ही भाजीपाला लागवड केली होती. यासाठी मंडप, मजूर असे एक महिना काम सुरू होते, यासाठी या शेतकऱ्यांने पदरमोड करून १ लाखाच्या आसपास खर्च केला होता, सुदैवाने या कष्टाचे चिज देखील झाले आहे असे वाटत होते, कारण भाजीपाला पिक इतके जोरदार आले होते की, एक दिवसाआड तोडा केला तरी २५/३० हजार रुपये मिळणार होते. आता आपल्या अडचणी दूर होतील अशी स्वप्ने रंगवली जात असतानाच १५ जुलै २०२३रोजी झालेल्या वादळी पावसाने रोहणे यांचा संपूर्ण भाजीपाला मातीमोल झाला, संपूर्ण भाजीपाला मांडव चिखलात कोसळला, यामध्ये ५०० किलो गोसाळी, ५०० किलो काकडी आणि ३०० किलो दोडके जमीनीवर आडवे झाले, हे बघून शेतकरी मधुकर रोहणे यांना धक्काच बसला, जगावं की मरावं अशी स्थिती त्यांची झाली. परंतु पत्रकार संजय कांबळे यांनी त्यांना धीर दिला व ही सचित्र बातमी प्रसिद्ध केली.
 
याची दखल महसूल विभाग व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने घेऊन तलाठी, मंडळ अधिकारी तसेच कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांना स्थळपाणी करण्यास पाठवतो असे कल्याण प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील व जिल्हा कृषविकास अधिकारी श्रीमती सारिखा शेलार मँडम यांनी सांगितले.यावर संबंधित तलाठी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचासमोर पंचनामा केला, मात्र कृषी विभागाचे ना कृषी सहाय्यक, ना कृषी विस्तार अधिकारी, ना तालुका कृषी अधिकारी, ना पंचायत समितीचे अधिकारी इकडे फिरकले नाही. त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. शिवाय यानंतर ही कल्याण पंचायत समिती, तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात चकरा मारल्या मात्र कोणीही साधी विचारपूस केली नाही असा आरोप शेतकरी मधुकर रोहणे यांनी केला आहे. तसेच आमच्या वर संकट कोसळेतरी लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी आम्हांला वा-यावर सोडले, याचे उतर भविष्यात आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही, संतापही त्यांनी बोलून दाखवला. विशेष म्हणजे, इतर विभागाचे सोडा, मात्र ज्या बळीराजाच्या जिवावर कृषी विभाग चालतो, त्यांनी देखील ऐवढी असंवेदनशीलता दाखवावी याचे आश्चर्य वाटते. अशी कितीतरी उदाहरणे प्रत्येक तालुक्यात घडली असतील, याचा विचार कोण करणार, वेगवान शासन गतीमान निर्णय?

No comments:

Post a Comment

शाहीर जयंत चव्हाण (बापू) कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !!

शाहीर जयंत चव्हाण (बापू)  कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !! मुंबई (शांताराम गुडेकर)               बालपणापासून गायन व...