दसऱ्याचे अध्यात्मिक महत्व
- संत राजिन्दर सिंह जी महाराज
आपण सर्व हे जाणतो की, दर वर्षी आपण दसरा हा सण साजरा करतो. हा सण असत्यावर सत्याचा आणि वाईटावर चांगल्या गोष्टीच्या विजयाचे प्रतीक आहे. रामायण कथेचे दोन प्रमुख पैलू आहेत, एक बाह्य आणि दुसरा आंतरिक. बाहय पैलू बाबत आपण सर्वजण चांगल्या प्रकारे जाणून आहोत परंतु, जो आंतरिक पैलू आत्म्याशी संबंधित आहे त्याविषयी आपण फारच कमी जाणतो. रामायणाचा वास्तविक बोध अध्यात्मिक आहे, परंतु आपण बाह्य पैलु पर्यंतच सीमित राहतो.
जर आपण दसऱ्याच्या सणाच्या अध्यात्मिक पैलूवर नजर टाकली असता, असे लक्षात येते की, सर्व संत महापुरुषांनी रामायणातील पात्रांचे उद्देश समजाविले आहेत. त्यांच्या मतानुसार रामा संबंधी अभिप्राय त्या प्रभू सत्तेशी आहे जी सृष्टीच्या कणाकणात व्याप्त आहे. ज्यास "संतांचा राम" म्हटले आहे. सीतेशी संबंधित अभिप्राय आपल्या आत्म्याशी आहे, जो आपल्या शरीरात कैद आहे आणि 84 लाख योनींच्या फेऱ्या मध्ये भटकत आहे. या व्यतिरिक्त लक्ष्मणा विषयी अभिप्राय आपल्या मनाशी संबंधित आहे जे कधीही शांत राहात नाही आणि ते नेहमी युद्धास तयार राहते. रावणाचा संबंध आपल्या अहंकाराची आहे जो प्रत्येक माणसात ठासून भरलेला आहे. दशरथाचा संबंध आपल्या मानवी शरीराशी आहे, जो एका रथा समान आहे, ज्यामध्ये पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये यांचे दहा घोडे बांधलेले आहेत जे याला चालवित आहेत.
संत महापुरुष आपणास याच्या अध्यात्मिक पैलूंविषयी विस्तारपूर्वक समजावतात की, सीता म्हणजेच आपला आत्मा जो स्वतःला विसरून या दुनियेचे रूप बनलेला आहे. रावण रुपी अहंकार त्याचे हरण करतो. राम आणि रावण यांचे युद्ध होते आणि राम सीतेला (आत्मा) रावणा च्या (अहंकार) पंजातून सोडवून परत घेऊन येतो. आत्मा रुपी सीता देह भावनेपासून मुक्त होऊन महाचेतन प्रभू सत्तेशी जोडली जाते, जी त्याची अंश आहे.
दसरा सणाचा एक आध्यात्मिक पैलू असा देखील आहे की, हा आपणास अहंकाराचा त्याग करून नम्रतेने जीवन जगणे शिकवितो. जर आपण आपल्या जीवनावर एक नजर टाकली असता लक्षात येते की, आपल्या पैकी बरेचसे लोक अहंकाराने जीवन जगत आहेत आणि हेच आपल्या विनाशाचे कारण आहे. आपण हे कधीही विसरता कामा नये की, अहंकारामुळे रावणाचे पतन झाले होते. जेव्हा आपण एखाद्या पूर्ण महापुरुषांच्या चरण-कमळी जातो आणि त्यांच्या मतानुसार जीवन व्यतीत करू लागतो तेव्हा त्यांच्या कृपादृष्टीने आपला अहंकार नष्ट होतो. तेव्हाच आपल्या आत्म्याचे प्रभूशी मिलन होते.
ज्याप्रकारे विजयादशमीच्या दिवशी रामाने अहंकारी रावणाला पराजित करून विजय प्राप्त केला होता, ठीक अशाच प्रकारे आपल्याला सुद्धा आपल्या आत्म्यास (सीता) शरीररूपी पिंजऱ्यातून मुक्त करून परमपिता परमेश्वराशी एकरुप करावयाचे आहे.
चला तर ! आपण विद्यमान एखाद्या पूर्ण गुरूंच्या चरण-कमळी जाऊन त्यांच्याकडून ध्यानाभ्यासाची विधी शिकूया जेणेकरून, आपल्या आत्म्याचे मिलन पिता परमेश्वराशी व्हावे आणि तो 84 लाख योनींच्या फेऱ्यातून मुक्त व्हावा. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण दसरा साजरा करू शकू.
--
No comments:
Post a Comment