Saturday, 21 October 2023

तालुक्याचे विकास केंद्र म्हणून ओळखले गेलेल्या कल्याण पंचायत समिती झाली भंगार गोडाऊन? गटविकास अधिका-यांचे दुर्लक्ष !

तालुक्याचे विकास केंद्र म्हणून ओळखले गेलेल्या कल्याण पंचायत समिती झाली भंगार गोडाऊन? गटविकास अधिका-यांचे दुर्लक्ष !

कल्याण, (संजय कांबळे) : जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यातील दुवा आणि तालुक्याचे विकास केंद्र म्हणून ओळखले गेलेल्या कल्याण पंचायत समितीची अवस्था एखाद्या भंगार गोडाऊन प्रमाणे झाली आहे. तर याकडे गट विकास अधिकारी अशोक भवारी यांनी सोईस्कर दुर्लक्ष केले आहे असे वाटते.

कल्याण तालुक्यात ४६ ग्रामपंचायती आहेत, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्यातील दुवा म्हणून पंचायत समितीकडे पाहिले जाते. शासनाच्या विविध प्रकारच्या योजना, विकास कामे, पात्र लाभार्थ्यांना विविध विभागाच्या वैयक्तिक योजना, प्रकल्प, सोईसुविधा आदी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहच होतात की नाही यावर देखरेख ठेवून त्याची अंमलबजावणी करून घेणे हे पंचायत समिती काम करते म्हणूनच तिला विकास केंद्र म्हणून ही संबोधले जाते.
कल्याण पंचायत समिती चा विचार केला तर शहरी आणि ग्रामीण असा दोन्ही भाग येत असल्याने विविध प्रकारचे लोक, शेतकरी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, तालुक्याच्या ठिकाणी येजा करत असतात.या कार्यालयात गटविकास अधिकारी दालन, सामान्य प्रशासन विभाग, लेखा विभाग, ग्रामपंचायत विभाग, आरोग्य, शिक्षण, अभिलेख, स्वर्ण जंयती स्वयंरोजगार, याशिवाय सभापती, उपसभापती, कृषी, बांधकाम, पाटबंधारे, पाणी पुरवठा, पशुसंवर्धन, एकात्मिक बालविकास, आणि सभागृह अशी दालने आहेत.

अशातच शेजारची धोकादायक इमारत पाडल्यामुळे कर्मचाऱ्यांना जागा अंत्यत अपुरी पडत आहे, अशातच जुन्या इमारतीच्या जागी पत्र्याचे शेड उभारले आहे, याच्यात व बाजूला बांधकाम विभागाने जुनी कपाटे, तुटलेले टेबल,खुर्च्या, बँनर, कुलर, आदी भंगार साहित्य ठेवलेले आहे, यामुळे मोठ्या प्रमाणात जागा आडून राहिलेली आहे.

बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी ना शौचालय ना पिण्याचे पाणी, स्वच्छतेचे तर केंव्हाच 'बारा, वाजले आहे, कार्यालयाचा परिसर, जिने, दरवाजाच्या मागे, सभागृहातील भिंतीचे कोपरे हे विविध पिचकाऱ्या, गुटखा यामुळे वेगवेगळे नकाशे दिसून येतात, हे नकाशे दिवसेंदिवस वरवर चढाई करताना दिसत आहेत.त्यामुळे नुकतेच 'एक तास,एकसाथ महाश्रमदान अभियान नक्की कुठे राबविले व काय स्वच्छता केली हे लक्षात येते.

दुर्दैवाने या सर्वावर प्रशासनाचे प्रमुख तथा गटविकास अधिकारी अशोक भवारी यांचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही, अधिकारी, कर्मचारी यांच्यातील समन्वयाचा अभाव येथे प्रकर्षाने जाणवतो,काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागात तालुक्यातील काही शिक्षक व केंद्र प्रमुख यांचा गौरव करण्यात आला. मात्र याची साधी कल्पना गटविकास अधिकारी यांना नसावी हे काय दर्शविते? याशिवाय इतर विभागात काय चालू आहे, नागरिकांच्या तक्रारी चे निरसन होते का?अधिकारी व कर्मचारी कधी येतात, कुठे जातात, त्यांचे, हालचाल ,रजिस्टर पाहिले जाते का? कर्मचारी युनिफॉर्म ,ओळखपत्र वापरतात का?या सर्वावर कोणाचे नियंत्रण असायला हवे,हे वेगळे सांगण्याची आवश्यकता आहे का? परंतु कल्याण पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी अशोक भवारी यांचे कंट्रोल नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याबाबत त्यांंची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही, तर कल्याण पंचायत समिती मध्ये जे भंगार गोडाऊन झाले आहे, स्वच्छतेसह इतर सोईसुविधा नाहीत याबद्दल सीईओकडे तक्रार करणार असल्याचे एका सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

आई जीवदानी कला फाऊंडेशन महाराष्ट्र (रजि.) तर्फे नमन प्रेमींसाठी साहित्य संघ मंदिर येथे बहारदार कार्यक्रमाचे आयोजन !

आई जीवदानी कला फाऊंडेशन महाराष्ट्र (रजि.) तर्फे नमन प्रेमींसाठी साहित्य संघ मंदिर येथे बहारदार कार्यक्रमाचे आयोजन ! प्रतिनिधी - ...