Wednesday, 31 July 2024

वाडा तालुक्यातील गातेस येथील वैतरणेश्वर शिवमंदिर ठिकाणाला यात्रास्थळ दर्जा देण्याची मागणी !!

वाडा तालुक्यातील गातेस येथील वैतरणेश्वर शिवमंदिर ठिकाणाला यात्रास्थळ दर्जा देण्याची मागणी !!

🔸 आमदार दौलत दरोडा यांच्या माध्यमातून पाठपुरावा 

वाडा, सचिन बुटाला : वाडा तालुक्यातील गातेस खुर्द येथील वैतरणेश्वर शिवमंदिर ठिकाणाला यात्रास्थळ दर्जा देण्याची मागणी स्थानिक ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. सदर ठिकाण शहापूर विधानसभा मतदारसंघात येत असून याबाबतची मागणी करणारे निवेदन स्थानिक आमदार दौलत दरोडा यांना नुकतेच देण्यात आले आहे. तर आमदार दौलत दरोडा यांनीही याबाबत तात्काळ दखल घेवून पाठपुरावा सुरू केला असून नुकत्याच झालेल्या पालघर जिल्हा नियोजन समिती व पालकमंत्री यांना याबाबतचे पत्र आमदार दरोडा यांनी दिले आहे. वैतरणा नदीकाठी असणाऱ्या या ठिकाणी स्वयंभू शिवमंदिर असून या परिसराला नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे. या ठिकाणी अनेक भाविक व पर्यटक भेट देत असतात तसेच महाशिवरात्री व श्रावण महिन्यात दर्शनासाठी या ठिकाणी भाविकांची गर्दी दिसून येते. तसेच या ठिकाणी दशक्रिया विधी सुद्धा केले जातात. मात्र या ठिकाणी सुविधांची वाणवा असून वैतरनेश्वर शिव मंदिराला यात्रा स्थळाचा दर्जा मिळाल्यास सभा मंडप, दशक्रिया घाट, जोड रस्ता भक्तनिवास यांसह अन्य सुविधा निर्माण होण्यासाठी निधी उपलब्ध होऊ शकतो, यासाठी वैतरनेश्वर या ठिकाणाला यात्रास्थळ दर्जा मिळावा,  यासाठी पंचायत समिती उपसभापती जगदीश पाटील, गातेस ग्रामपंचायत सरपंच संजना तरसे, उपसरपंच, प्रशांत गोतारने, सदस्य विधी विकास पाटील व स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी यांनी आमदार दौलत दरोडा यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत.

प्रतिक्रिया : 
गातेस खुर्द येथील वैतरणा नदीच्या काठी असणारे वैतरणेश्वर शिव मंदिर हे पुरातन शिवमंदिर व स्वयंभू महादेवाचे स्थान असून या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या मालकीची मोठी जागा सुद्धा उपलब्ध आहे. सदर ठिकाणी पुरातन काळापासून प्रसिद्ध असून या ठिकाणी भाविकांसाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी यात्रास्थळ दर्जा मिळावा, ही आमची मागणी आहे.
प्रशांत गोतारणे 
उपसरपंच : ग्रुप ग्रामपंचायत गातेस

Tuesday, 30 July 2024

पुणे येथे कौशल्यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे केंद्र स्थापनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला करार !!

पुणे येथे कौशल्यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे केंद्र स्थापनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला करार !!

*** राज्य शासन आणि एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार

मुंबई, दि. 30 : - पुणे येथे कौशल्यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे केंद्र स्थापन करण्यासाठी राज्य शासन आणि एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेड यांच्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य कराराचा लाभ राज्यातील युवकांना देशात व परदेशात रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी होणार आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक प्रमोद नाईक,सचिव स्मिता गाडे, एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेदमणी तिवारी, एनएसडीसी इंटरनॅशनल कंपनीचे सल्लागार संदीप कौरा, उपाध्यक्ष नितीन कपूर, राष्ट्रीय कौशल्य विकासचे प्रमुख मोहम्मद कलाम, व सर्व विभागाचे प्रधान सचिव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जगभरात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी देशातील युवकांना प्राप्त होण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्यमशिलता मंत्रालयाकडून प्रसिध्द करण्यात येणाऱ्या रोजगाराच्या संधींच्या अनुषंगाने एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीकडून कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम राबविण्यात येतात. राज्यामध्ये हे अभ्यासक्रम राबविण्यासाठी एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीसोबत हा सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार कंपनीतर्फे वेगवेगळ्या देशांमध्ये मनुष्यबळाच्या कौशल्याच्या गरजेनुसार प्रशिक्षण दिले जाणार आहे. याव्यतिरिक्त कंपनीकडून विद्यार्थ्यांना परदेशातील नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

 एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीला प्रशिक्षण केंद्रासाठी पुण्यातील शासकीय दूरशिक्षण तंत्र निकेतन संस्थेची जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आजच्या सामंजस्य करारप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्यावतीने तंत्रशिक्षण विभागाचे संचालक प्रमोद नाईक, यांनी तर एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेदमणी तिवारी यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. 
00000

मंगळवार दि. ३० जुलै २०२४ रोजी मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय !!

मंगळवार दि. ३० जुलै २०२४ रोजी मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय !!

१) सामाजिक न्याय विभाग 
 
वसतीगृहे, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे दरडोई अनुदान वाढविले

विविध विभागांच्या वसतीगृहे, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात भरीव वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 

सामाजिक न्याय, दिव्यांग कल्याण, इतर मागास बहुजन कल्याण, आदिवासी विकास, महिला व बालविकास या विभागांमार्फत सुरु असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानीत संस्थांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे दरडोई परिपोषण अनुदान आता प्रती विद्यार्थी प्रती महिना 1500 रुपयांवरुन 2200 रुपये करण्यात येईल, तर एड्सग्रस्त व मतीमंद निवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान 1650 रुपयांवरून 2450 इतके वाढविण्यात येईल.  

यासाठी येणाऱ्या 346 कोटी 27 लाख इतक्या निधीला मान्यता देण्यात आली.  या सर्व संस्थांमधून एकूण 4 लाख 94 हजार 707 विद्यार्थी असून सुमारे 5 हजार संस्था आहेत. वाढत्या महागाईमुळे हे अनुदान देखील वाढविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती.  
-----०-----

२) आदिवासी विकास विभाग

आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज

आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या धर्तीवर दीर्घ मुदतीचे कर्ज देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 

आजपर्यंत आदिवासी सहकारी सूत गिरण्या या लाभापासून वंचित होत्या.  सध्या या सूत गिरण्यांना 1 : 9 या प्रमाणात शासकीय भागभांडवल देण्यात येते.  आता दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी मुदत कर्ज देणाऱ्या वित्तीय बँका व वित्तीय संस्था यांच्या व्यतिरिक्त मिटकॉन, ॲग्रीकल्चर फायनान्स कार्पोरेशन मुंबई, दत्ताजीराव टेक्निकल इन्स्टिट्यूट इचलकरंजी यांच्यापैकी एका संस्थेकडून प्रस्ताव तपासून शासनास सादर करावा लागेल.  प्रकल्प किंमतीच्या 5 टक्के आणि 80 लाखापर्यंत सभासद भागभांडवल गोळा करणाऱ्या गिरण्या कर्जासाठी पात्र असतील.  या शिवाय सूत गिरणीला वेगवेगळ्या सहकारी संस्थांच्या कर्ज भाग भांडवलाच्या अटी व शर्ती लागू राहतील. 

प्रकल्प सुरु झाल्यानंतर 2 वर्षांनी कर्जाची परतफेड सुरु होईल. 

-----०-----

३) सहकार विभाग

नांदेडच्या श्री गुरुजी रुग्णालयास शासकीय भाग भांडवल

नांदेड येथील श्री गुरुजी रुग्णालयास विशेष बाब म्हणून शासकीय भाग भांडवल उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 

हे रुग्णालय नंदीग्राम वैद्यकीय सहकारी संस्थेमार्फत सहकार तत्त्वावर चालविले जाते.  संस्थेने एक कोटी भाग भांडवल जमा करून तसेच 6 कोटी कर्ज घेऊन रुग्णालय सुरु केले आहे.  मात्र कर्जाच्या बोजामुळे रुग्णालय तोट्यात गेले असून जवळपास 200 कुटुंबांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे. रुग्णसेवा आणि सामाजिक संवेदनशीलतेमुळे रुग्णालय चालविणे आवश्यक असल्यामुळे संस्थेला 1 : 9 याप्रमाणे 9 कोटी भाग भांडवल स्वरुपात 10 वर्षात शासकीय भाग भांडवल अंशदान स्वरुपात अर्थसहाय देण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली.  शासकीय भाग भांडवलाची परतफेड पुढील 8 वर्षात समान हप्त्यात करावी.  ही भाग भांडवलाची रक्कम बिनव्याजी राहील. तथापि, परतफेडीचा हप्ता न भरल्यास थकीत रकमेवर 12 टक्के दराने व्याज आकारण्यात येईल. 
-----०-----

४) गृह विभाग

महाराष्ट्रातील कारागृहे होणार अद्ययावत सुधारणांसाठी अध्यादेश काढणार

महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवेसाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

केंद्र सरकारने कारागृहातील बंद्यांमध्ये सुधारणा व पुनर्वसनाचा विचार करून मॉडेल प्रिझन्स ॲक्ट 2023 तयार केला आहे.  तसेच सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशानी देखील या संदर्भात आवश्यक वाटतील त्या सुधारणा करण्याचे म्हटले आहे.  या अनुषंगाने कारागृह विभागाच्या प्रमुखाचे नामाभिधान महासंचालक, कारागृह व सुधारसेवा असे नमूद करणे, विशेष कारागृह, महिलांसाठी खुले कारागृह, तात्पुरते कारागृह, खुली वसाहत, तरुण गुन्हेगारांसाठी संस्था असे कारागृहाचे वर्गीकरण करणे तसेच कारागृह अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी कल्याण निधी, बंद्यांसाठी तक्रार निवारण यंत्रणा अशा काही सुधारणांचा यात समावेश आहे.  संपूर्ण कारागृह प्रशासनाचे संगणकीकरण तसेच आयसीजेएस प्रणालीशी तुरुंगाचा डाटाबेस जोडणे, सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर अशा अनेक बाबींचा देखील यात विचार करण्यात आला आहे.
-----०-----
 
५) महिला व बाल विकास विभाग

नव- तेजस्विनी ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प सात वर्षांसाठी राबवणार

नव तेजस्विनी - महाराष्‍ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाच्या मुदतीत एक वर्षाची वाढ करण्यात आली आहे. हा कार्यक्रम आता सहा ऐवजी सात वर्षांच्या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. याशिवाय या कार्यक्रमात जेंडर ट्रान्सफॉरमेटीव्ह मॅकॅनिझम (Gender Transformative Mechanism- GTM) राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 

या नव्या निर्णयांनुसार आता नव तेजस्विनीच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी जिल्हयांचे जिल्हाधिकारी राहतील. तसेच तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत आता महिला आर्थिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील मंजूर कर्मचाऱ्यांमधून नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली. 

या प्रकल्पासाठी  आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (IFAD) कडून ३२५ कोटी रुपये कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन देण्यास व ९ कोटी १० लाख रुपयांचा निधी अनुदान स्वरुपात उपलब्ध करुन देण्यास, प्रशासकीय खर्चासाठी १८८ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी राज्य शासनाचा हिस्सा असा एकूण ५२३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी कृतीसंगम (Convergence) म्हणून ४३५ कोटी ५० लाख, लोकसहभागाचे ३२ कोटी १७ लाख, वित्तीय संस्थांच्या सहभागाचे १६३० कोटी ४६ लाख, खासगी संस्थाच्या सहभागाचे ६४ कोटी ६५ लाख याप्रमाणे प्रकल्पाच्या एकूण किंमतीत २ हजार ६८५ कोटी ४६ लाख रुपये अशी सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.  
या शिवाय आयफॅड मार्फत जेंडर ट्रान्सफॉरमेटीव्ह मॅकॅनिझम उपक्रमाकरिता ४२ कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार हा उपक्रम आता महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यास मान्यता देण्यात आली.

 तसेच “नव तेजस्विनी- महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प” व जेंडर ट्रान्सफॉरमेटीव्ह मॅकॅनिझम उपक्रमाच्या अंमलबजावणी बाबत आवश्यकतेनुसार बदल/ सुधारणा करण्याचे अधिकार मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय शक्तीप्रदान समितीला देण्याचा निर्णयही घेण्यात आला. 
-----०-----

६) जलसंपदा विभाग 

राज्यातील जुन्या जलविद्युत प्रकल्पांचे होणार आधुनिकीकरण
 
राज्यातील आयुर्मान पूर्ण झालेल्या जलविद्युत प्रकल्पांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्याच्या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 

या धोरणानुसार जलविद्युत प्रकल्पांचे Lease, Renovate, Operate and Transfer (LROT) तत्वावर नूतनीकरण, आधुनिकीकरण, क्षमतावाढ व आयुर्मान वृध्दी करण्यात येणार आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीकरिता प्रकल्पाच्या पाणी वापरानुसार जलविद्युत प्रकल्पांच्या दोन श्रेणी करण्यात आल्या आहेत. श्रेणी एक मध्ये विद्युत निर्मिती हा मुख्य उद्देश असणाऱ्या प्रकल्पांचा समावेश राहणार आहे. अशा प्रकल्पांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण महानिर्मिती कंपनीद्वारे  करण्यात येईल.  तर श्रेणी दोन प्रकल्पांमध्ये सिंचनासहीत विद्युत निर्मिती असणाऱ्या प्रकल्पांचा समावेश राहील. या प्रकल्पांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी निविदा पध्दतीचा अवलंब करण्यात येईल. 

शासनामार्फत कोणतीही भांडवली गुंतवणूक केली जाणार नाही. तर या प्रकल्पांमधून Threshold Premium, Upfront premium,  13% मोफत वीज, भाडेपट्टी व Intake maintenance शुल्क इत्यादी स्वरूपात शासनास दरवर्षी 507 कोटी रुपये महसूल प्राप्त होईल.
-----०-----

७) वस्त्रोद्योग विभाग

पूर्णामाय सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य

अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील खुल्या प्रवर्गातील पूर्णामाय सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या संदर्भातील निर्णय वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उप समितीत घेण्यात आला होता. ही सूत गिरणी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ च्या तरतुदीनुसार झोन १ मध्ये येत असल्याने या सूतगिरणीस अर्थसहाय्यासाठी  ५:४५:५० या सुत्रानुसार निवड करण्याचा प्रस्ताव होता. 
-----०-----

८) महसूल विभाग

ठाणे पालिकेच्या विविध उपक्रमांसाठी शासकीय जमीन

कन्व्हेंशन सेंटर, पक्षी गृह उभारणार

ठाणे पालिकेच्या विविध उपक्रमांसाठी लोकोपयोगी कारणांसाठी शासकीय जमीन विनामुल्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

ठाणे महानगरपालिकेस मौ.वडवली येथे २-३५-७६ हेक्टर आर ही जमीन कन्व्हेंशन सेंटर विकसित करण्यासाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला. तरुण आणि युवा पिढीस रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासासाठी या केंद्राचा उपयोग होईल.  

त्याचप्रमाणे महानगरपालिकेस मौ. कोलशेत तसेच मौ. कावेसर येथील एकूण ५-६८ हेक्टर आर ही शासकीय जमीन विनामुल्य देण्याचा निर्णयही घेण्यात आला.  या ठिकाणी पक्षीगृह (एव्हीअरी सेंटर) विकसित करण्यात येईल.  पक्षांकरिता नैसर्गिक अधिवास निर्माण करणे आणि पक्षांच्या जीवनमानाबद्दल नागरिकांत जागरुकता निर्माण करण्यासाठी हे केंद्र काम करेल.

 मौ. कावेसर येथील २-२०-४३ हेक्टर आर ही शासकीय जमीन रामकृष्ठ मठ आणि रामकृष्ण मिशन या संस्थेस अध्यात्मिक, सामाजिक, आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरण व लोकोपयोगी कारणासाठी देण्याचा निर्णय झाला.  महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४० व सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे नियम १९७१ चे नियम ५० नुसार आणि २५ जुलै २०१९ च्या शासन निर्णयानुसार थेट जाहीर लिलावाशिवाय १ रुपये प्रती चौरस मिटर या नाममात्र दराने ही जमीन देण्यात येईल.
-----०-----
 
९) वस्त्रोद्योग विभाग

राज्यातील यंत्रमाग सहकारी संस्थांना आता राज्य शासनाकडून अर्थसहाय्य

राज्यातील यंत्रमाग सहकारी संस्थांना आता राज्य शासनाकडून अर्थसहाय्य करण्याबाबतची योजना सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्यातील यंत्रमाग उद्योगाचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगम पुरस्कृत योजना आता बंद करण्यात येईल. नवीन योजनेत संस्थेचे सभासद भाग भांडवल १० टक्के, शासकीय भाग भांडवल ४० टक्के आणि शासकीय कर्ज ५० टक्के असेल.  

राष्ट्रीय सहकारी विकास निगमने मंजुरी दिलेले २६ प्रस्ताव व यापूर्वी शासनाकडे आलेले ६७ प्रस्ताव आणि २००९ पूर्वीच्या एका प्रकल्पामध्ये अद्याप संस्थेस द्यावयाचे ५२ लाख रुपये इतक्या प्रस्तावांना अर्थसहाय्य दिल्यानंतर ही योजना बंद करण्यात येईल. 
-----०-----

१०) ग्राम विकास विभाग

आदिम जमातीतील कुटुंबांनाही मिळणार घरे

राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान या अंतर्गत आदिम जमातीतील कुटुंबांसाठी आवास योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

याचा लाभ कोलाम, कातकरी व माडीया गोंड या कुटुंबाना होईल.  या योजनेतील पात्र भूमीहीन लाभार्थीना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकूल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेत अनुदान मिळेल.  पात्र कुटुंबांसाठी प्रती घरकूल २ लाख ३९ हजार अनुदान मिळेल.  यामध्ये घरकूल अनुदान २ लाख, स्वच्छ भारत अभियानातंर्गत १२ हजार रुपये आणि मनरेगा अंतर्गत ९० किंवा ९५ दिवसांचे अकुशल वेतन २७ हजार रुपये याचा समावेश आहे. या योजनेत केंद्राचा हिस्सा ६० टक्के व राज्याचा हिस्सा ४० टक्के एवढा असेल. 
-----०-----
सौजन्य - मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)

आमदार दौलत दरोडा यांच्या प्रयत्नातून वाडा तालुक्यातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत 26 कोटींचा निधी मंजूर !!

आमदार दौलत दरोडा यांच्या प्रयत्नातून वाडा तालुक्यातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत  26 कोटींचा निधी मंजूर !!

वाडा, सचिन बुटाला : शहापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार दौलत दरोडा यांच्या माध्यमातून वाडा तालुक्यातील शहापूर मतदारसंघातील सहा रस्त्यांसाठी 26 कोटी 24 लाख 59 हजार रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यांसाठी भरीव निधी मिळावा यासाठी स्थानिक आमदार दौलत दरोडा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला होता. संबंधित रस्त्यांसाठी भरीव निधी मंजूर झाला असून या कामांच्या प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या रस्त्यांसाठी निधी मंजूर झाल्याने संबंधित गावातील रस्त्यांची समस्या कायमस्वरूपी सुटणार असून यासाठी ग्रामस्थांनी आमदार दरोडा यांचे विशेष आभार मानले आहेत.

शहापूर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या वाडा तालुक्यातील सहा प्रमुख रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर रस्ते पुढीलप्रमाणे -

1. गारगाव ते दाभोन रस्ता लांबी 5.20 किमी, (अंदाजित रक्कम रुपये आठ कोटी 74 लाख 54 हजार),  

2. मुख्य रस्ता ते खैरे -  सासणे जोडरस्ता लांबी 3.450 किमी (अंदाजित रक्कम रुपये पाच कोटी 28 लाख 54 हजार),

3. मुख्य रस्ता ते ठूनावे जोडरस्ता, लांबी 2.500 किमी (अंदाजित रक्कम रुपये तीन कोटी 87 लाख 21 हजार), 

4. डाढरे ते कोलीम सरोवर रस्ता  लांबी 2 किमी, (अंदाजित रक्कम रुपये तीन कोटी 27 लाख 21 हजार), 

5. कोने ते मालोंडे रस्ता लांबी 1.750 किमी, (अंदाजित रक्कम रुपये दोन कोटी 70 लाख 98 हजार), 

6. राज्य मार्ग 79 ते दुपारेपाडा - चिखले  रस्ता लांबी 1.290 किमी, (अंदाजित रक्कम रुपये दोन कोटी 36 लाख 12 हजार),

सह्याद्री कुणबी संघाचे शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारक पाऊल ; विविध विद्यालयात सह्याद्री ग्रंथालयाचे उद्घाटन !!

सह्याद्री कुणबी संघाचे शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारक पाऊल ; विविध विद्यालयात सह्याद्री ग्रंथालयाचे उद्घाटन !!

मुंबई - ( दिपक कारकर )

 सामाजिक पटलावर अग्रेसर असणारी पुण्यातील "सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) उपरोक्त संघटनेच्या शाखा खेड- दापोली- चिपळूण- संगमेश्वर तालुका वतीने "सह्याद्री ग्रंथालय" उदघाटन सोहळा नुकताच गुरुवार दि.२५ जुलै २०२४ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

  "गुरूने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालऊ हा पुढे वारसा" ही विचारधारणा मनाशी बाळगणारी आणि तिमिरातुनी तेजाकडे वाटचाल करणारा एकमेव संघ अर्थात "सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र)" या संघाने शैक्षणिक क्षेत्रात आघाडी घेत, खेड- दापोली तालुक्यातील अनुक्रमे पाच हायस्कूल मध्ये "कै. सौरभ हरिश्चंद्र नाचरे" यांच्या स्मरणार्थ सह्याद्री ग्रंथालय चालू करून येथील विद्यार्थ्यांना पुस्तकरूपी विचारांनी त्यांच्या ज्ञानात अजून भर पडावी व विद्यार्थ्यांना भौगोलिक ज्ञान मिळावे हा उद्देश डोळयांसमोर ठेऊन एक क्रांतिकारक असं शैक्षणिक पाऊल सह्याद्रीने उचलले आहे.

  सदर उपक्रमाचे शुभारंभ "कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड (मुंबई) संचालित न्यू इंग्लिश स्कुल अणसपुरे हायस्कूल येथून करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि स्वागत गीताने उपस्थितांचे स्वागत करून पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आला. तद्नंतर दमामे हायस्कूल, पन्हाळजे हायस्कुल, होडखाड हायस्कूल, आणि शेवटी तुंबाड हायस्कूल मध्ये हा सहयाद्री ग्रंथालय उदघाटन सोहळा साजरा करून, सहयाद्री ग्रंथालयाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले,प्रसंगी सर्व हायस्कूलचे मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक वर्ग,आणि गावातील सरपंच, प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला "सहयाद्री कुणबी संघ पुणे शहर खेड, दापोली, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले. उपरोक्त संस्थेच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे. ह्या स्तुत्य उपक्रमाचे अनेक स्तरावर अभिनंदनासह कौतुक होत आहे.

स्वर्गीय एम.जे.पंडित चॅरिटेबल ट्रस्ट आणि यशोदा चॅरिटेबल कल्याण आयोजित कवी सम्मेलन आणि मुशायरा सोहळा संपन्न...

स्वर्गीय एम.जे.पंडित चॅरिटेबल ट्रस्ट आणि यशोदा चॅरिटेबल कल्याण आयोजित कवी सम्मेलन आणि मुशायरा सोहळा संपन्न...

कल्याण, (अण्णा पंडीत) : कल्याण मधील प्रसिद्ध सोनावणे महाविद्यालयात रविवार दि.२८ जुलै रोजी सायंकाळी ७.०० वा. वरील सेवाभावी ट्रस्ट च्या वतीने के.डी.कॉलेज कल्याण, चे प्राचार्य आणि संचालक डॉ.सुनील शर्मा यांचे अध्यक्षते खाली कवी संमेलन आणि मुशाय-याचा कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमात प्रदिप लालजानी, डॉ.रजनीकांत मिश्रा, अफसर दखनी, डॉ.संगीता शर्मा, ओमप्रकाश पांडेय (नमन), करीमुद्दीन सिद्धार्थनगरी इत्यादी मान्यवरांनी गजल गायन आणि कविता पठन करुन उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी महम्मदिया शाळेचे संचालक सुप्रसिद्ध समाजसेवक साद काजी यांना त्यांचे विविध समाजसेवेच्या कार्याबद्दल प्राप्त झालेल्या डॉक्टरेट पदवी बद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

कवी सम्मेलन आणि मुशायरा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनावणे महाविद्यालयाचे संचालक आणि मानद सचिव, सुप्रसिद्ध कवी गीतकार, गझलकार डॉ.विजय प॔डित यांनी केले.सदर कार्यक्रमाचे निमंत्रक रिटेल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष हृदय पंडित, सोनावणे महाविद्यालयाचे ट्रस्टी श्रीचंद केसवाणी आणि सुनील कुकरेजा इत्यादींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित सर्व मान्यवर आणि रसिक श्रोतागण यांचे आभार मानुन त्यांचे सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Monday, 29 July 2024

पॅरिस ऑलिंपिकमध्ये देशाला कांस्यपदक जिंकून देणाऱ्या नेमबाज मनु भाकरचा देशवासीयांना सार्थ अभिमान -*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन*

पॅरिस ऑलिंपिकमध्ये देशाला कांस्यपदक जिंकून देणाऱ्या नेमबाज मनु भाकरचा देशवासीयांना सार्थ अभिमान -*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन*

मुंबई, प्रतिनिधी : पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये भारतीय चमुसाठी पदकाचे खाते उघडून नेमबाज मनु भाकरने एक चांगली सुरुवात केली आहे. यातून भारतीय खेळाडू प्रेरणा घेतील आणि देशासाठी पदकांची लयलूट करतील असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनु भाकरचे अभिनंदन केले आहे.

महिला नेमबाज मनु भाकरने १० मीटर एअर पिस्तुल नेमबाजीमध्ये कांस्य पदक पटकावून या स्पर्धेतील भारतासाठी पहिले पदक मिळवले आहे. नेमबाज मनु भाकरची ही कामगिरी तमाम देशवासियांसाठी सार्थ अभिमानाची असल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तिला स्पर्धेसाठी तसेच नेमबाजीतील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पुणे जिल्हा दावे निकाली काढण्यात राज्यात प्रथम !!

पुणे जिल्हा दावे निकाली काढण्यात राज्यात प्रथम !!

**राष्ट्रीय लोक अदालतीत १ लाखाहून अधिक दावे निकाली

पुणे, प्रतिनिधी : जिल्ह्यात प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ३३ हजार ६९५ प्रलंबित आणि ६६ हजार ८२२ वादपूर्व असे एकूण १ लाख ५१७  दावे निकाली काढून पुणे जिल्ह्याने राज्यात पुन्हा एकदा प्रथम स्थान पटकावले. 

लोक अदालतीमध्ये बँकेचे कर्जवसूली २ हजार ७८०, तडजोड पात्र फौजदारी २५ हजार ९४७, वीज देयक १०१, कामगार विवाद खटले १००, भुसंपादन ४८, मोटार अपघात दावे न्यायाधिकरण १३१, वैवाहिक विवाद ११३, निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ॲक्ट ३ हजार ४८, इतर दिवाणी ८७५, महसूल ७  हजार ५३७,  पाणी कर ५४ हजार ७८ आणि इतर ५ हजार ७५९ प्रकरणे अशी एकूण १ लाख ५१७ प्रकरणे निकाली काढण्यात आले आहेत.

तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या २ लाख ८० हजार ९६८ दाव्यापैकी १ लाख ५१७ दावे निकाली काढण्यात येऊन ४१९ कोटी २ लक्ष ४९ हजार ८३३ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. वादपूर्व १ लक्ष ८२ हजार ११५ प्रलंबित प्रकरणांमधून ६६ हजार ८२२ प्रकरणे निकाली काढण्यात आली आणि यात ९० कोटी ६९  लक्ष  ३८  हजार ८३३ तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. तर प्रलंबित ३ लाख ३० हजार ५८८ प्रकारणांपैकी ९८ हजार ८५३ सुनावणीसाठी घेण्यात आले. त्यातील ३३ हजार ६९५ प्रकरणे निकाली काढून ३२८ कोटी ३३ लक्ष ११ हजार ५०  तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.  अशाप्रकारे पुणे जिल्ह्याने राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनादरम्यान दावे निकाली काढण्यात अग्रेसर राहण्याची परंपरा कायम राखली आहे. या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्याच्या सर्व न्यायालयातील अधिकारी-कर्मचारी, विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिकांचे चांगले सहकार्य मिळाले आहे, अशी माहिती विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सोनल पाटील यांनी दिली आहे.

*श्रीमती सोनल पाटील, विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर*-लोक अदालतीच्या माध्यमातून न्याय तात्काळ मिळतो. पैसा आणि वेळेची बचत होते. लोक अदालतीचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो. निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कोर्ट फी ची रक्कम परत मिळते. परस्पर संमतीने निकाल होत असल्यामुळे एकमेकातील द्वेष वाढत नाही आणि कटूताही निर्माण होत नाही. त्यामुळे लोक अदालतीला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

पुणे जिल्हा पथक अंतर्गत होमगार्डसाठी सदस्य नोंदणीचे आवाहन !!

पुणे जिल्हा पथक अंतर्गत होमगार्डसाठी सदस्य नोंदणीचे आवाहन !!

पुणे, प्रतिनिधी : पुणे जिल्हा पथकांतर्गत रिक्त असलेल्या होमगार्डच्या १ हजार ८०० जागा भरण्याकरिता होमगार्ड सदस्य नोंदणीचे आयोजन केलेले असून पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी ११ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा होमगार्ड कार्यालयाने केले आहे. 

होमगार्ड नोंदणी नियम व अटी- उमेदवार कमीत कमी १० वी उत्तीर्ण असावा. वय २० वर्ष पूर्ण ते ३१ जुलै रोजीच्या अर्हता दिनांकवर ५० वर्षाच्या आत असावे. उंची  पुरुषांकरीता १६२ से.मी. व महिलांकरीता १५० से.मी. असावी. छाती फक्त पुरुष उमेदवारांकरीता ७६ से.मी. व कमीत कमी ५ सेमी फुगविणे आवश्यक असेल.

उमेदवाराचा रहीवासी पुरावा, आधारकार्ड. शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र, जन्म दिनांक पुराव्याकरीता माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र व शाळा सोडल्याचा दाखला, तांत्रिक अहर्ता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र, खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे. 

होमगार्ड नोंदणीचे अर्ज पुणे जिल्ह्याकरिता ११ ऑगस्ट रोजी सायं. ५ वाजेपर्यत https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर इंग्रजी भाषेमधूनच भरता येतील. आधारकार्ड क्रमांक, जन्म दिनांक व्यवस्थित नोंद करावे. एका उमेदवाराला आधारकार्ड क्रमांकाच्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल. उमेदवार ज्या भागातील रहीवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणेच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील.

अर्ज सादर  केल्यावर नोंदणी अर्जाची छायांकीत प्रत काढावी. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो चिटकवावा, मराठी मधील नाव उमेदवारानी स्वतः लिहायचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरू नये. सर्व अर्जाची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणीकरीता तारीख जाहीर करण्यात येईल.

शारीरिक क्षमता चाचणी- पुरुष उमेदवाराकरिता १६०० मीटर तर महिला उमेदवाराकरिता ८०० मीटर धावणे, पुरुष उमेदवारांना ७.२६० कि. ग्रा. वजनाचा तर महिला उमेदवारांना ४  कि. ग्रा. वजनाचा गोळाफेक अशा पद्धतीने नियमानुसार घेण्यात येईल. गोळाफेक चाचणीसाठी उमेदवाराला जास्तीजास्त तीन संधी दिल्या जातील व त्यातील अधिकतम अंतर ग्राह्य धरले जाईल. शारीरिक क्षमता चाचणी पात्र ठरल्यानंतरच तांत्रिक अर्हतांचे गुण विचारात घेतले जातील. 

कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरीता येताना सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेवून यावे. दोन छायाचित्रे व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरीता बंधनकारक राहील. उमेदवारांना नोंदणीकरीता स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.

नोंदणी दरम्यान किंवा प्रवासादरम्यान कोणतीही दुखापत झाल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील. पात्र उमेदवारांची अंतिम निवड होमगार्ड पथकनिहाय रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांस प्राधान्य दिले जाईल. तसेच वय समान असेल तर शैक्षणिक अर्हता व तांत्रिक प्रमाणपत्रांच्या आधारावर निवड निश्चित करण्यात येईल.

यापुर्वी होमगार्ड संघटनेतून अकार्यक्षम बेशिस्त ठरल्याने न्यायालयीन प्रकरणी दोषी असल्याने सेवा समाप्त केलेले होमगार्ड नोंदणीसाठी अर्ज करण्यास अपात्र ठरतील. मात्र स्वेच्छेने राजीनामा दिलेले होमगार्ड विहीत अटी पूर्ण करीत असतील तर अर्ज करण्यास पात्र राहीतील

अंतिम गुणवत्ता यादी  संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. पथक पोलीस ठाणेनिहाय रिक्त जागा निश्चित करण्याचे सर्व अधिकार जिल्हा समादेशक यांनी राखून ठेवले आहे. अर्ज भरण्यासंदर्भात काही अडचण असल्यास जिल्हा होमगार्ड कार्यालय, पुणे येथील भ्रमणध्वनी क्रमांक ९०७५७४७४७१ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण तथा जिल्हा समदेशक होमगार्ड रमेश चोपडे यांनी केले आहे.

अंधेरी पुर्वे विभागातील शिवसेना शाखा ८६ (उबाठा ) व भैरवनाथ जनसेवा संस्थेतर्फे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा जन्मदिवसनिमित्त भव्य आरोग्य शिबीर संपन्न !!

अंधेरी पुर्वे विभागातील शिवसेना शाखा ८६ (उबाठा ) व भैरवनाथ जनसेवा संस्थेतर्फे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा जन्मदिवसनिमित्त भव्य आरोग्य शिबीर संपन्न !!

मुंबई, (शांताराम गुडेकर /संतोष गावडे ) :

          अंधेरी पुर्वे विभागातील मरोळ विभागात रविवारी (दि. २८ जुलै) शिवसेना शाखा ८६ (उबाठा ) व भैरवनाथ जनसेवा संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते श्री. राजुदादा सुर्यवंशी यांच्यावतीने  शिवसेना कार्याध्यक्ष श्री.उद्धवजी बाळासाहेब  ठाकरे यांचा जन्मदिवसनिमित्त भव्य आरोग्य शिबीर पार पडले. या शिबिरात मधुमेह,रक्तदाब तपासणी, ईसीजी तपासणी, नेत्र तपासणी, सर्दी, ताप,आदी बहुतेक सर्वच आजारांच्या अनुषंगाने तज्ञ डॉक्टरांकरवी नागरिकांची तपासणी करून आवश्यक औषधे पूर्णतः मोफत देण्यात आली. तसेच काही गंभीर आजार लक्षात घेऊन त्या  नागरिकांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही करण्यात आले. यावेळी वयोवृद्ध व आजारी नागरिक, ज्यांना सहज चालणे शक्य होत नाही, अशा नागरिकांना आधार काठीचे व वॉकरचेही वाटप करण्यात आले.

             स्थानिक आमदार ऋतुजा लटके वहिनी यांच्या शुभ हस्ते शुभ आरंभ करण्यात आलेल्या या शिबिरात अंधेरी पूर्व विधानसभा संघटक श्री.प्रमोद सावंत, उपविभाग प्रमुख अरविंद शिंदे, शाखाप्रमुख बिपिन शिंदे, महिला शाखा संघटक सरिता रेवाळे, महिला शाखा संघटक पार्वती निकम, सारिका जाधव, युवा सेनेचे किरण पुजारी, देवेंद्र भोसले, लक्ष्मण घाग, यशवंत कुंभार, निरपा तिरुवा, आदी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. साधारण २०० नागरिकांची यावेळी संपूर्णतः मोफत तपासणी करण्यात आली.

          उपशाखाप्रमुखपदी विराजमान असलेले भैरवनाथ जनसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, शिबिराचे आयोजक, सर्वेसर्वा श्री.राजुदादा सुर्यवंशी व श्री.शुभम सुर्यवंशी या पितापुत्रांनी शिबिराच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे व शिबिरात सहभागी नागरिकांचे आभार मानले.

Sunday, 28 July 2024

ठाणे महानगरपालिकेला सफाई कर्मचारी महेन्द्र शिंदे यांनी BSL L.L.B परीक्षेत यश संपादन केले !!

ठाणे महानगरपालिकेला सफाई कर्मचारी महेन्द्र शिंदे यांनी BSL L.L.B परीक्षेत यश संपादन केले !!

ठाणे, दि. २८ जुलै :

ठाणे महानगरपालिकेचा सफाई कामगार महेंद्र पिठुराम शिंदे यांनी BSL L.L.B परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल व्यसनमुक्ती जनजागृती सेवा समितीचे वतीने रविवारी २८ जुलै २०२४ रोजी “सफाई कामगारांचा जीवन संघर्ष” पुस्तक आणि पुष्पगुच्छ देवून समता कट्टा येथे महेन्द्र शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक जगदीश खैरालिया, अध्यक्ष अजय राठोड, उपाध्यक्ष नरसी भाई झाला, सचिव संजय धिंगान, माजी अध्यक्ष ललित मारोठिया, दिलीप चौहान आणि समता विचार प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष सुनील दिवेकर उपस्थित होते.

महेंद शिंदे यांचे वडील पिठूराम शिंदे यांच्या निधनामुळे ९वी नंतर अर्धवट शिक्षण सोडून त्यांना वडिलांच्या जागी वारसाहक्काने ठाणे महापालिकेत २००७ साली सफाई कर्मचारी म्हणून नोकरी करावी लागली. परंतु शिक्षणाचा ध्यास असल्याने त्यांनी २०१२ साली दहावी आणि २०२०१८साली बारावी परीक्षा उत्तीर्ण करून पुढे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीकॉम परीक्षा देत यंदा BSL L.L.B परीक्षा केली असल्याने सफाई कामगारांना प्रेरणा दिली असल्याचे या वेळी कामगार नेते जगदीश खैरालिया महेन्द्र शिंदे यांचे कौतुक केले आहे. महेंद्र शिंदे यांनी यावेळी बोलताना पुढे L.L.M करण्याचे मनोदय व्यक्त केला आहे.

जगदीश खैरालिया,
महासचिव, श्रमिक जनता संघ.
संस्थापक, व्यसनमुक्ती जनजागृती सेवा संस्था,
संस्थापक – समता विचार प्रसारक संस्था.
9769287233.

नीरजा वर्तक लिखित आणि आयुष आशिष भिडे दिग्दर्शित दीर्घांक - "घोर" : *एक अप्रतिम नाट्यानुभव*

नीरजा वर्तक लिखित आणि आयुष आशिष भिडे दिग्दर्शित दीर्घांक - "घोर" : *एक अप्रतिम नाट्यानुभव*

** त्याच बरोबर नवीन कलाकृती एकांकिका 'काठ'

विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

मन सुन्न करणारा आणि जीवनाचं अंतिम सत्य सांगणारा एक नवीन दीर्घांक "घोर" आपल्यासमोर येत आहे. दिग्दर्शक आयुष आशिष भिडे आणि लेखिका नीरजा अविनाश वर्तक यांनी एकत्र येऊन प्रेक्षकांसमोर ही कलाकृती सादर करण्याचे ठरवले आणि आता हे नाटक रंगमंचावर दोन प्रयोग हाऊसफुल्ल करून तिसऱ्या प्रयोगासाठी सज्ज झाले आहे. लिखाण, दिग्दर्शन, अभिनय अशा सर्वच पातळ्यांवर सक्षम ठरणारा हा दीर्घांक आहे. दीर्घांकातील गूढता प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.

तसेच काठ ही नवीन एकांकिका सुद्धा आयुष आशिष भिडे ह्याने दिग्दर्शन करून व नीरजा अविनाश वर्तक हिने लिहलेली आहे. नदी किनारी म्हणजेच नदीचं काठ त्यावर गावातल्या बायका आपल्या दिनचर्येतील काम करत एकमेकींशी आपल्या मनातील गोष्टी आणि इच्छा सांगून मन मोकळ करतात आणि त्यातून घडणारी एक घटना ह्या सादरीकरणातून प्रेक्षकांसमोर येते.

दीर्घांकाचा व एकांकिकेचा दिग्दर्शक आयुष भिडे याने यापूर्वी अनेक मालिका तसेच नाटकांमधे काम करत पारितोषिके पटकावली आहेत. सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवरील *'प्रेमाची गोष्ट'* या मालिकेत लकी ची भूमिका साकारणारा आयुष भिडे 'घोर' यात अघोरी या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे. त्याच बरोबर नीरजा वर्तक ही लेखिका म्हणून उत्तम कामगिरी करत आली असून तिची लेखनाची आवड ह्या दोन्ही कलाकृतीतून आपल्या भेटीस आल्या आहेत. नीरजा वर्तक आणि सायली गावंड यांच्याही भूमिका महत्त्वाच्या आहेत. आणि त्यांचं सादरीकरण सुद्धा कौतुकास्पद आहे. कलाकारांचा अभिनय तसेच दीर्घांकाची व  एकांकिकेची तांत्रिक बाजूही तितकीच भक्कम असल्याने दोन्ही कलाकृती अधिकाधिक दर्जेदार ठरत. कैलास ठाकूर हा अनुभवी कलाकार असून त्यांची प्रकाशयोजना लोकांना थक्क करून ठेवते, मिहीर जोग यांचे पार्श्वसंगीत दोन्ही कालाकृतींना वेगळा माहोल तयार करण्यात साजेस ठरते. शुभम जाधव,यश जाधव यांचे नेपथ्य,ज्येष्ठ आणि श्रेष्ठ रंगभूषा करणारे शरद विचारे दादा यांची उत्तम साथ दीर्घांकाला आणि एकांकिकेला मिळते. तसेच कैलास मेस्त्री, पूर्वा फडके, कुणाल काटकर, शार्वी वर्तक, साहिल कदम हे रंगमंचावर कलाकृती सादर करून इतर कामं सुद्धा चोख बजावतात आणि समूहातील इतर सहकार्यांची साथ असल्याने एकुणच दीर्घांकाची आणि एकांकिकेची पडद्यामागची बाजूही व्यवस्थित सांभाळली जाते. चिता, पेट घेणाऱ्या चितेचा आवाज, आसमंतात भरून राहिलेला धूर सगळंच चांगल्या अर्थाने अस्वस्थ करणारं ठरू शकेल. 

मालिकांमधून अभिनय करून प्रेक्षकांची मनं जिंकत असताना दिग्दर्शक म्हणून नाटकाच्या अनुभवा विषयी विचारले असता दिग्दर्शक आयुष भिडेने सांगितले की, "घोर" हे नाटक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मी या पूर्वीही दिग्दर्शन केले आहे पण यावेळी नाटकाचा विषय आणि त्याच्या छटा या अधिक रोचक आहेत. मी सध्या स्टार प्रवाह वरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत लकी हे खेळकर पात्र साकारत आहे. अशातच घोर सारखं एक वेगळं नाटक करायला मिळणं ही माझ्यातील कलाकारासाठी पर्वणीच आहे. हा मुळात दीर्घांक असल्याने प्रेक्षकांसमोर ते सादर करणं त्या विषयी अधिक उत्सुकता आहे. नाटकाच्या कथेबाबत आणि मांडणी बद्दल सांगायच झालंच तर मी नीरजा आणि समूहातील कलाकार जसजसं काम करत गेलो तशा एक एक गोष्टी सुचत गेल्या. 

नीरजाने सुद्धा सांगितलं की हा विषय जितका आपल्याला विचार करायला लावतो तितका लिखाणासाठी सुद्धा विचार करायला लावतो. नवीन विषय आणि नवीन गोष्टी ह्या आम्ही बोलत असतो पण अशी कलाकृती माझ्या लिखाणातून बाहेर येणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. प्रेक्षकांनी नेहमीच आतापर्यंत सगळ्याच कामांवर भरभरून प्रेम केले आहे, मला खात्री आहे की यावेळी या दोन्ही कलाकृतीलाही ते चांगला प्रतिसाद देतील."

घोर या दीर्घांकाचा शुभारंभाचा प्रयोग ७ एप्रिलला बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथे झाला होता. मुख्य म्हणजे हा प्रयोग हाऊसफुल्ल झाला आणि प्रयोग क्र.२ सुद्धा हाऊसफुल्ल होऊन लोकांची व मान्यवरांची खूप छान प्रतिक्रिया आली.  यापुढेही "घोर" चे  बरेच प्रयोग होतील अशी आशा आहे. 

आम्ही रंगकर्मी वेगवेगळ्या कलाकृती घेउन आपल्या भेटीला येत राहणार असल्याचे ह्यावेळी सांगत वसई पश्चिमेला अनंतराव ठाकूर नाट्यगृह (भंडारी हॉल ) येथे शनिवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजल्यापासून  घोर आणि काठ दोन्ही कलाकृती पाहण्यासाठी रसिकांनी आवर्जून यावे असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

तिकीट दर ₹३००/-
संपर्क : ९०२९१५२२१५ , ८८०६२२९६५४

जिल्हा केंद्र चव्हाण सेंटर, परिवर्तन संस्था व रोटरी क्लब ऑफ चोपडा आयोजित नाट्यवाडा निर्मित 'पाझर' चा दर्जेदार नाट्य प्रयोग संपन्न !

जिल्हा केंद्र चव्हाण सेंटर, परिवर्तन संस्था व रोटरी क्लब ऑफ चोपडा आयोजित नाट्यवाडा निर्मित 'पाझर' चा दर्जेदार नाट्य प्रयोग संपन्न !

प्रतिनिधी । चोपडा
महाराष्ट्राच्या शहरी, ग्रामीण भागातून उदयास येणाऱ्या नाटय कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने गेल्या ९ वर्षांपासून कार्यरत नाट्यवाडा या संस्थेचे संस्थापक, अभिनेते, नाट्यलेखक, दिग्दर्शक प्रवीण पाटेकर लिखित, दिग्दर्शीत पाझर या नाटकाचा अत्यंत दर्जेदार असा नाट्य प्रयोग नुकताच यशवंतराव चव्हाण सेंटर, परिवर्तन जळगांव व रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. शरश्चंद्रिकाआक्का पाटील न.प. नाटयगृहात संपन्न झाला.

ग्रामीण भागात दुष्काळी स्थितीत पाण्याचा स्त्रोत शोधतांना शेतकऱ्यांना करावा लागणारा संघर्ष, जातीभेद, स्त्री - पुरुष विषमता, अंधश्रद्धा अश्या विषयांना लोक गीतांच्या माध्यमातून विनोदी शैलीने मांडतांना निसर्ग वाढविण्यासाठी जुन्या गोष्टींना उजाळा देत येणाऱ्या काळाला नवी उमेद देणारं अन् पुरस्कारांची शंभरी पार केलेल्या पाझर च्या ह्या नाटयप्रयोगाने आजच्या सिनेमा, मल्टिप्लेक्स, ओटीटी प्लॅटफॉर्मच्या भाऊगर्दीतही अस्सल नाटयकृतींना, कलावंतांच्या दमदार अभिनयाला रसिक प्रेक्षकांची भरभरून दाद मिळते हे सिद्ध करणाऱ्या नाटय प्रयोगाचा शुभारंभ जिल्हा केंद्र चव्हाण सेंटरचे अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, चव्हाण सेंटरचे सचिव डॉ .राहूल मयूर, परिवर्तनचे रंगकर्मी हर्षल पाटील, रोटरी चोपडाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर, रोटरी डिस्ट्रिकचे सहसचिव रोटेरियन नितीन अहिरराव, भगिनी मंडळ चोपडा अध्यक्षा पूनम गुजराथी, चोपडे शिक्षण मंडळ सचिव माधुरी मयूर यां मान्यवरांनी श्रीफळ वाढवून नाट्य प्रयोगाचा शुभारंभ केला.

सुंदर व  हलक्याफुलक्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची दाद मिळविणाऱ्या कलाकारांच्या ह्या संचाने उपस्थितांना एका चांगल्या नाटकाची अनुभूती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन प्रकल्प प्रमुख रोटेरियन मुख्याध्यापक विलास पी पाटील यांनी केले तर या नाटय प्रयोगाचे आयोजन यशस्वी करणे कामी सचिव बी. एस. पवार, सहप्रकल्प प्रमुख नितीन अहिरराव, व्ही .एस्. पाटील, विलास कोष्टी, चंदू साखरे, लीना पाटील, अरूनभाऊ सपकाळे, M.W.पाटील सर व इतर सर्व रोटरियान बंधू यांनी परिश्रम घेतले.

माजी आमदार प्रकाश मेहता घाटकोपर मधून विधानसभा निवडणूक लढणार !!

माजी आमदार प्रकाश मेहता घाटकोपर मधून विधानसभा निवडणूक लढणार !!

** घाटकोपर मध्ये भाजपात बंडखोरीची ठिणगी

** कार्यकर्ता मेळाव्यात मेहतांनी केले स्पष्ट वक्तव्य

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

             भाजपचे माजी आमदार प्रकाश मेहता हे 2024 ची विधानसभा निवडणूक घाटकोपर मधून लढणार असल्याचे आज आयोजित प्रकाश मेहता मित्र मंडळाच्या कार्यकर्ता मेळाव्यात स्पष्ट केले. मेहतांच्या या वक्तव्याने घाटकोपर मध्ये भाजपात अंतर्गत बंडखोरी निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. घाटकोपर पूर्वेतील विद्यमान आमदार पराग शहा असून गेल्या निवडणुकीत भाजपने सहा वेळा निवडणूक लढलेले प्रकाश मेहता यांचे तिकीट कापून पराग शहाना दिले होते. त्यावेळेस भाजपाच्या दोन्ही गटात राडा झाला होता. कार्यालय , गाड्यांची तोडफोड करण्यात आली होता. मात्र लोकसभा निवडणुकी नंतर घाटकोपर मध्ये प्रकाश मेहता राजकरणात पुन्हा सक्रिय होत असल्याचे संकेत दिसत असताना आज प्रकाश मेहता मित्र मंडळाचा जाहीर कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांना मी घाटकोपर मधून विधानसभा निवडणूक लढवत असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले. या मेळाव्याला सर्व पक्षातील कार्यकर्ते, नेते उपस्थित होते.
             प्रकाश मेहता मित्र मंडळाच्या वतीने आज दिनांक 28 जुलै रोजी घाटकोपर पूर्व येथील झवेरबेन सभागृह येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना प्रकाश मेहता यांनी सर्व पक्षातील कार्यकर्त्यांचे आजही माझ्यावर प्रेम आहे. मी ७ वेळा विधानसभा लढलो मात्र मी एकदाही पक्षाकडे तिकिटासाठी मागणी केली नव्हती मात्र आता कार्यकर्ते आणि समाज यांची खदखद वाढताना दिसत होती. त्यामुळे मी आगामी विधानसभा निवडणूक लढणार अशी घोषणा केली. तर यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीतील भाजप उमेदवार मिहिर कोटेचां हरले त्याबाबतची मीमांसा केली. आमच्या नियोजनात त्रुटी होत्या अशी कबुली देत त्यांनी या पराभवाची दखल आता दिल्लीत घेण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी माझाही विषय तिथे निघाला ही अभिमानाची बाब आहे असेही ते म्हणाले. आज घाटकोपर मधील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे प्रेम मला मिळत असून त्याच जोरावर मी लढणार आहे असे रणशिंग त्यांनी यावेळी फुंकले.

शिवसेना (उबाठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वसई येथे साहित्य वाटप !!

शिवसेना (उबाठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वसई येथे साहित्य वाटप !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
          शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेच्या माध्यमातून २७ जुलै उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वसई येथील लोकनायक जयप्रकाश  जयप्रकाश नारायण कृष्ठरोग निर्मूलन हॉस्पिटल येथे आरोग्यदायी वस्तू वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे विनायक निकम विधानसभा संघटक, किरण चेदंणकर माजी नगरसेविका गटनेत्या, भगवान वजे वसई तालुका प्रमुख, विजय शर्मा, सुरेश मिश्रा वाहतूक सेना यांच्या उपस्थितीत पाण्याची फिल्टर मशीन, कपडे धुण्याची वॉशिंग मशीन, सिलिंग फॅन तीन, डायनिंग टेबल, रबर मॅट ५० नग, कपडे धुण्याचे साबण, अंघोळीचे डेटॉल साबण, तेलाची बाटली, फिनेल, बिस्किट इत्यादी वस्तू आरोग्यदायी वस्तू वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत विठ्ठल खोपकर, संदीप चादीवडे (सचिव), दौलत बेल्हेकर ( संचालक), दिपक चौधरी (कार्यकारणी सदस्य), वसंत घडशी (कार्यालप्रमुख), बढु चौधरी, संजय चव्हाण, विनय चौधरी, मेघा सावंत, वनिता वायकर, निर्मला आवटे, स्वरा पवार, इत्यादी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Saturday, 27 July 2024

ठाण्यात गायमुख चौपाटी नंतर आता पारसिक - मुंब्रा चौपाटी लोकार्पणाच्या प्रतिक्षेत !!

ठाण्यात गायमुख चौपाटी नंतर आता पारसिक - मुंब्रा चौपाटी लोकार्पणाच्या प्रतिक्षेत !!

ठाणेकरांना मिळणार पारसिक -- मुंब्रा येथे दुसरी हक्काची चौपाटी.

भिवंडी, अरुण पाटील (कोपर) :
       मुंबईतील गिरगाव व दादरची चौपाटींवर  मोठी गर्दी होत असल्या करणे व ठाणेकरांना तेथे जाणे देखील कर्चिक असल्या कारणाने ठाणेकरांना वेगळी वाट म्हणुन  ठाण्यातील गायमुख चौपाटी नंतर आता पारसिक - मुंब्रा चौपाटीचा पर्याय असून तो जवळपास पूर्ण होऊन तो आता लोकार्पणाच्य प्रतिक्षेत असून पावसाळ्या नंतर चौपाटीचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे.
       पारसिक-मुंब्रा येथील बहुप्रतिक्षित रेतीबंदर चौपाटी प्रकल्प २००९ पासून प्रस्तावित आहे. रेतीबंदर खाडीच्या ४ किमी लांबीच्या बाजूने ४२ एकरांवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सिंगापूर आणि साबरमतीच्या धर्तीवर ही चौपाटी उभारण्यात येत आहे. थीम पार्क, बोटिंग, ‌‌ॲम्फक थिएटर, बोटींग, क्रीडा व मनोरंजनाची अद्ययावत साधने त्याचबरोबर  १८ अत्याधुनिक सुविधा या रेतीबंदर चौपाटीवर उभारण्यात येणार आहेत. त्यामुळं ठाणेकरांसाठी विरंगुळ्याचे आणखी एक ठिकाण निर्माण झाले आहे.
         मुंब्रा येथे रेतीबंदर चौपाटीचे काम अंतिम टप्प्यात असून  पुढील तीन महिन्यात म्हणजेच पावसाळ्यानंतर या चौपाटीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या चौपाटीचे लोकार्पण होणार आहे. पावसाळ्यानंतर ठाणेकर आता या नवीन चौपाटीवर थोडे निवांतक्षण अनुभवता येणार आहे.
          ठाण्यात याआधीही गायमुख चौपाटी उभारण्यात आली होती. ठाण्यातील खाडी किनारे निसर्गसंपन्न आहेत. त्यामुळं या किनाऱ्यांवर वॉटरफ्रंड डेव्हलपमेंट प्रकल्पाच्या माध्यमातून ठाणेकरांसाठी खाडी किनाऱ्यावर पर्यटन केंद्र उभारण्याचा प्रय़त्न सुरू आहे. त्याच प्रकल्पाचा एक भाग म्हणजे गायमुख चौपाटी २०१९ मध्ये गायमुख चौपाटीचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्याहस्ते झाले होते. या चौपाटीवरही ठाणेकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. त्याचबरोबर ठाणेकरांना आता आणखी एका चौपाटीचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

निती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या पायाभूत प्रकल्पांवर चर्चा !!

निती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या पायाभूत प्रकल्पांवर चर्चा !!

नाशिक पुणे रेल्वेमार्ग, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन संदर्भात केंद्राने सहकार्य करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली, प्रतिनिधी : दिनांक २७ जुलै रोजी झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातील नाशिक पुणे रेल्वेमार्ग, चिपळुण कराड, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन, समुह विकास यासारख्या महत्वाच्या पायाभूत आणि विकास कामांच्या प्रकल्पांबाबत मुद्दे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले. हे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारने सहकार्य करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
 
राष्ट्रपती भवनात झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्य शासनातर्फे सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून घेतलेल्या योजनांविषयी माहिती दिली. हे सांगताना राज्यातील महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांवरही प्रभावीपणे मुद्दे मांडले. 

मुख्यमंत्री म्हणाले, क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मुंबई महानगर परिसर क्षेत्रातील तसेच राज्यातील इतर भागांमध्ये जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास योजना सुरू केल्या आहेत. हा आशियातील सर्वात मोठा ब्राउनफील्ड प्रकल्प आहे. ही योजना आपल्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील झोपडपट्ट्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास राज्य सरकारच्या संस्थांमार्फत करण्यात येणार असून या संस्थांमार्फत दोन लाखांहून अधिक घरे बांधण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यात मोठ्या रस्ते प्रकल्पांमध्ये झपाट्याने सुधारणा होत असून कोकण कोस्टल रोड आणि कोकण ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वे कोकणासाठी गेम चेंजर्स ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अखंड कनेक्टिव्हिटीसाठी पाच हजार किलोमीटरचे अॅक्सेस कंट्रोल ग्रिड तयार करण्याची योजना असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबई महानगर परिसरात सुमारे सव्वा लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या सुमारे ३९० किमी मेट्रो मार्गांचे बांधकाम सुरू असून पुणे आणि नागपूर येथे मेट्रो मार्गाचे कामही वेगाने सुरू आहे. नाशिक- पुणे रेल्वेमार्गाच्या कामाला तातडीने सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

बैठकीत मुंबईतील फनेल झोन संदर्भात तसेच उंचीची मर्यादा, रडार स्थलांतर करणे याबाबत चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बीपीटीच्या सहा एकर जागेचा चांगला वापर करून तेथे मरीन ड्राईव्ह सारखी चौपाटी विकसित करण्याबाबतही चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अर्थसंकल्पातच 35 हजार कोटींची तरतूद असल्याने निधीची जराही कमी नाही -- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेला उदंड प्रतिसाद !!

**** महिन्याभरात 1 कोटी महिलांकडून ऑनलाईन अर्ज दाखल

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अर्थसंकल्पातच 35 हजार कोटींची तरतूद असल्याने निधीची जराही कमी नाही -- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण                       
       
         मुंबई, प्रतिनिधी :- “महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून यंदाच्या 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मी जाहीर केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेला राज्यातल्या माता-भगिनी-कन्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असून महिना पूर्ण होण्याच्या आतच 1 कोटींहून अधिक भगिनींनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत.

            प्रसारमाध्यमांमध्ये तद्दन खोट्या, निराधार बातम्या पसरवून ‘फेक नॅरेटीव्ह’ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. ‘फेक नॅरेटीव्ह’ निर्माण करण्याच्या प्रयत्नांनाला राज्यातील जनता, माता-भगिनी बळी पडणार नाहीत. त्या आमच्यासोबतंच आहेत आणि राहतील,” असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला.

            राज्यातील काही वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वित्त विभागाचा विरोध’ आणि ‘योजनेसाठी निधी कुठून आणणार?’ अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या बातम्या तद्दन खोट्या, कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी विसंगत, ‘फेक नॅरेटीव्ह’ निर्माण करण्यासाठी राजकीय हेतूने पसरवण्यात आल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण देताना ते पुढे म्हणाले की, “महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून यंदाच्या 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मी स्वतःच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली आहे. वित्त व नियोजन, संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर या योजनेची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात केली. चालू आर्थिक वर्षातील उर्वरीत नऊ महिन्यांसाठी आवश्यक एकूण 35 हजार कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद यावर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे योजनेसाठी पैसा कुठून आणणार ?, हा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे. राज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी, मान, सन्मान, स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

            उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर झाल्यानंतर तिला राज्यभर उदंड प्रतिसाद मिळत आहे. शासकीय यंत्रणा, राजकीय-सामाजिक-स्वयंसेवी संघटनांकडून शहरात आणि गावोगावी शिबिरं आयोजित करुन अर्ज भरुन घेतले जात आहेत. योजना जाहीर झाल्यानंतर गेल्या महिनाभरात राज्यात फिरताना गावागावातल्या लाभार्थी माता-भगिनींकडून मिळणारा प्रतिसाद, प्रेम आश्चर्यचकित करणारं आहे. या योजनेचं हे यश बघून विविध माध्यमातून खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला. 

            ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’योजनेसारखी कुठलीही नवीन योजना जाहीर करत असताना त्या योजनेची अंमलबजावणी, कार्यान्वयन चांगल्या पद्धतीने व्हावं. प्रशासकीय खर्च कमी होऊन अधिकाधिक निधी लाभार्थी घटकांसाठी उपयोगात यावा, असा वित्त विभागाचा प्रयत्न असतो. त्यासाठी काही उपाययोजना सूचवल्या जातात. त्या सूचनांचा संदर्भ बदलून, चुकीचा अर्थ काढून माध्यमांमध्ये वित्त विभाग आणि राज्य शासनाबद्दल गैरसमज पसरवण्याचा, ‘फेक नॅरेटीव्ह’ निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु आहे. त्यांच्या प्रयत्नांना राज्यातील सुज्ञ जनता आणि पहिल्यांदाच अशा महत्वकांक्षी योजनेचा लाभ होणार आहे त्या माझ्या माता-भगिनी बळी पडणार नाहीत, याची खात्री आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

            'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ला वित्त विभागासह राज्यातील कुणाचाही विरोध असण्याचे कारण असूच शकत नाही. उलट या योजनेसाठी लागेल तो निधी देण्यास वित्त विभाग कटीबद्ध आहे. प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. प्रसार माध्यमांनी अशा नकारात्मक बातम्या देणे कृपया थांबवावे. राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही, याची मला खात्री आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक भगिनींना यात सहभागी करून घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Friday, 26 July 2024

रोटरी क्लब ऑफ चोपडा यांनी केला दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !!

रोटरी क्लब ऑफ चोपडा यांनी केला दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !!

चोपडा, प्रतिनिधी - येथील रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे शहरातील दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. गुणवंतांच्या पाठीवरील ही शाबासकीची थाप त्यांचा भविष्यकालीन प्रवास आणखी उत्साहाने पूर्ण करण्यास नक्कीच प्रेरक ठरेल, असा विश्वास यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. 

शहरातील भगिनी मंडळाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे डॉ. प्रा. ईश्वर सौंदाणकर हे होते. तर विशेष अतिथी म्हणून जळगाव येथील सुप्रसिद्ध वक्ते रामचंद्र पाटील, प्रमुख अतिथी म्हणून महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील, रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे सहसचिव नितीन अहिरराव यांच्यासह क्लबचे सचिव भालचंद्र पवार, सहसचिव संजय बारी, कोषाध्यक्ष प्रदीप पाटील, प्रकल्प प्रमुख अरिफ शेख, सहप्रकल्प प्रमुख पृथ्वीसिंह राजपूत, सदस्य विलास पाटील, विलास पी. पाटील, जगदीश महाजन, चंद्रशेखर साखरे, लीना पाटील हे मंचावर उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी 'चला उंच भरारी घेऊया या' विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन करताना रामचंद्र पाटील यांनी सांगितले की, आयुष्यात नेहमीच व्यक्तीचा नव्हे तर व्यक्तिमत्वाचा, त्याच्या चांगुलपणाचा सत्कार होत असतो. आपण चांगली कृती केल्यास आपला अवश्य सत्कार होतो. चांगले काम म्हणजे जे काम करताना आपल्या मनाला लाज वाटत नाही असे काम होय. जो कुठले तरी सोंग घेऊन समाजात वावरत असतो त्याचा कधीही विकास होत नाही. यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो आणि जगात कुठलाही जादूचा दिवा किंवा सोनपरी अस्तित्वात नाही. आपली मेहनतच आपल्याला यशाकडे नेत असते, म्हणून भान ठेवून नियोजन करावे आणि बेभान होऊन काम करावे यातच यश दडलेले आहे.

या सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक रोटे. ईश्वर सौंदाणकर यांनी तर सूत्रसंचालन वनराज महाले यांनी व आभार प्रदर्शन पृथ्वीसिंह राजपूत यांनी केले. कार्यक्रमास शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी परेश चित्ते, अजय भाट, देवेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.

देशाच्या संरक्षण विभागात सहभागी होणे हीच खऱ्या अर्थाने वीरांना सलामी- डॉ. नंदकुमार झांबरे

देशाच्या संरक्षण विभागात सहभागी होणे हीच खऱ्या अर्थाने वीरांना सलामी- डॉ. नंदकुमार झांबरे 

विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

विरार येथील विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात २६ जुलैच्या कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून कारगिल युद्धात वीरमरण आलेल्या शूर जवानांच्या शौर्य, पराक्रम आणि यशाची गाथा सांगणारा 'वीरांना सलामी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नंदकुमार झांबरे, विभागप्रमुख, राष्ट्रीय छात्र सेना व सहाय्यक प्राध्यापक, संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय वसई हे उपस्थित होते. या कार्यक्रमात शहीद जवान आणि वीरांसाठी कला विभागातील विद्यार्थ्यांनी व शिक्षक प्रा. योगेश राजपूत यांनी देशभक्तीपर गीताचे गायन केले. मुलांना आणि मुलींना सुरक्षा व्यवस्थेत असणाऱ्या विविध संधीबद्दल प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. आपल्या देशाच्या सार्वभौमत्वासाठी आणि राष्ट्रीय एकात्मता टिकून ठेवण्यासाठी प्रत्येक तरुणांनी संरक्षण दलामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करावा आणि खऱ्या अर्थाने देशाची सेवा करावी असा मोलाचा संदेश डॉ. नंदकुमार झांबरे यांनी दिला. 

विद्यार्थ्यांनी लष्करासारखी शिस्त आणि वर्तणूक ठेवली तर आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते असे प्राचार्या श्रीमती. मुग्धा लेले यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य सुभाष शिंदे, कला विभाग प्रमुख प्रा. विनोद जंगले, कनिष्ठ महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि अशा विविध कार्यक्रमांचे आयोजनासाठी संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी नेहमीच पाठीशी उभे राहून सहकार्य करतात त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी असे कार्यक्रम आम्ही आयोजित करू शकतो असे मत प्राचार्या आणि उपप्राचार्यानी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कुसुम नाईक यांनी तर सूत्रसंचालन डॉ. महादेव इरकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. पूनम चौधरी यांनी केले. कला विभागातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

आमदार दौलत दरोडा यांना उद्देशून आक्षेपार्ह बॅनर प्रसिद्ध करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची वाडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !!

आमदार दौलत दरोडा यांना उद्देशून आक्षेपार्ह बॅनर प्रसिद्ध करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची वाडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !!

🔸 वाडा तालुका राष्ट्रवादी (अजितदादा)  यांच्यावतीने पोलिस निरीक्षक दत्तात्रेय कींद्रे यांना दिले निवेदन

वाडा, प्रतिनिधी : शहापूर विधानसभेचे आमदार दौलतजी दरोडा साहेब यांना उद्देशून आक्षेपार्ह मजकूर असणारा बॅनर शहापुर लावण्यात आला आहे. सदरचा बॅनर शहापुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याकडून लावण्यात आला असल्याचे निदर्शनास आले आहे. 

यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. याबाबत वाडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा) यांच्याकडून संबंधित बॅनर लावणाऱ्या विरोधात कारवाई व्हावी, यासाठी वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांना शुक्रवारी (26 जुलै) निवेदन देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषद पालघर महिला व  बालकल्याण सभापती रोहिणी शेलार, वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार, पंचायत समिती सदस्य जगदीश पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र पटारे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊ साबळे, नंदकुमार वेखंडे, संगीत मेने, पंढरीनाथ मराडे, पंडित पटारे, युवक तालुका अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष सदानंद थोरात, युवक कार्याध्यक्ष नितीन देसले, उपाध्यक्ष वैभव पटारे यांसह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहापूर येथे लावण्यात आलेल्या आक्षेपार्ह बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) असा स्पष्ट उल्लेख असून या प्रकाराची सर्वसी जबाबदारी राष्ट्रवादी (शरद पवार गट) शहापूर तालुका  व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तर सदरचा आक्षेपार्ह बॅनर राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावरवरही प्रसारित करण्यात आला आहे. या  प्रकाराबाबत राष्ट्रवादी (अजितदादा) पक्षाच्या  कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून यामुळे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

प्रतिक्रिया :

आमदार दौलत दरोडा यांना उद्देशून शहापूरमध्ये बदनामीकारक मजकूर असणारा आक्षेपार्ह बॅनर लावण्यात आला असून त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. हा बॅनर लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी,  यासाठी वाडा तालुका राष्ट्रवादी (अजितदादा) यांच्यावतीने वाडा पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.
जयेश शेलार
वाडा तालुका अध्यक्ष
राष्ट्रवादी (अजितदादा)

'विरंगुळा' काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न |

'विरंगुळा' काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न | ठाणे, पंढरीनाथ पाटील : ज्येष्ठ कवि रामचंद्र परब यांच्या ‘विरंगुळा' या दुस...