योग्य उपाय आणि सावधगिरी बाळगल्यास सर्पदंश व
त्यामुळे होणारे मृत्यू रोखता येऊ शकतात
---जिल्हाधिकारी किशन जावळे
रायगड, प्रतिनिधी : -पावसाळा सुरू झाल्यामुळे तसेच शेतात काम करताना अनेकदा सर्पदंश होण्याच्या घटना आपल्या जिल्ह्यात आढळून येतात. योग्य उपाय आणि सावधगिरी बाळगल्यास सर्पदंश व त्यामुळे होणारे मृत्यू रोखता येऊ शकतात. याबाबत समाजात जनजागृती करण्याचे काम आरोग्य विभागाने करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.
यंदाच्या पावसाळ्यात आरोग्य विभागामार्फत जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर सर्पदंश प्रतिबंधक लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्यात आली आहे. सरासरी 15 ते 25 लसीचा प्रत्येक आरोग्य केंद्रात साठा करण्यात आला आहे. 15 तालुक्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील लस उपलब्ध असून जिल्हास्तरावर अतिरिक्त लस सज्ज ठेवण्यात आली आहे.
सर्पदंश झालेल्या रुग्णांसाठी एएमबीएचयु बॅग, लॅरिग्नोस्कोप ही साधने, एड्रेनालाईन, हाइड्रोकोर्ट, एट्रोपिन, नियोस्टिग्माइन ही इंजेक्शन जिल्हा रुग्णालयात उपलब्ध ठेवली आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन सिलिंडर भरून ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. नागरिकांनी
सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर देऊन सर्वात अगोदर जवळच्या कोणत्याही सरकारी रुग्णालयापर्यंत आणावे. सर्पदंशाच्या बहुतांश घटना ग्रामीण भागात शेतामध्ये काम करत असताना घडतात.
शेतकऱ्यांनी सर्वतोपरी काळजी घेऊनच शेतात जावे. पायात गम बूट असावेत, तसेच अंगावर पूर्ण कपडे असल्यास दंशाची तीव्रता कमी असते. सर्पदंश हा अपघात असून घाबरून जाऊ नका.सावध रहा काळजी घ्या असे आवाहन जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी केले आहे.
सर्पदंश झाल्यास काय करू नये :-
विष तोंडाने ओढून काढू नका. सर्पदंशाच्या जागी चिरा घेऊ नका. सर्पदंशाची वरील/खालील बाजू कशानेही बांधू नका. वैदू, बुवा, बाबा यांच्याकडे जाऊ नका. साप शोधण्यात, मारण्यात वेळ वाया घालवू नका. सर्पमित्राची मदत घ्या.
सर्पदंश झाल्यास काय करावे :-
शांत रहा आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवा. रुग्णाला मानसिक आधार द्या. कोणत्या प्रकारचा साप चावला या कडे लक्ष द्या. हाताला किंवा पायाला सूज आली तर अडचण येऊ नये म्हणून बांगड्या, अंगठी, घड्याळ रुग्णाला हालचाल करू देऊ नका. गरज असेल तरच त्याला चालू द्या. न्युरॉटोक्सिक विष असणारा साप (नाग) चावला असेल तर चावलेला भाग स्प्लिंट बांधून स्थिर करावा. विनाविलंब रुग्णालय गाठा. सर्पदंशाची नेमकी वेळ लक्षात ठेवा आणि रुग्णाच्या लक्षणांकडे लक्ष ठेवा. डॉक्टरांना नेमकी माहिती द्या.
सर्पदंश टाळण्यासाठी पुढील काळजी घ्यावी :-
रात्री फिरताना बॅटरी घेऊन फिरावे. अंधारात चालण्याचा प्रसंग आल्यास पाय किंवा काठी आपटत चालावे त्यामुळे जमिनीत कंप निर्माण होऊन साप दूर निघून जाईल. साप दिसताच त्याला निष्कारण मारण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी साप स्वतःचा बचाव करण्यासाठी चावण्याची शक्यता अधिक असते.
घराच्या जवळपास केरकचरा, विटा किंवा कौले रचून ठेवू नयेत. अशा ठिकाणी साप आसरा घेतात. घराजवळ झाडे असतील व त्यांच्या फांद्या घरावर आलेल्या असतील तर झाडावरून साप घरात येण्याची शक्यता असते. घराशेजारी लाकूड किंवा गवत अशा वस्तूंचा साठा करू नये. केल्यास या वस्तू काढताना काळजीपूर्वक काढाव्यात.
झोपताना कॉट किंवा पलंग यांवर झोपावे, भिंतीच्या कडेला झोपू नये. मांजर व कुत्री हे घराभोवतालच्या सापाच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. मांजर अंधारातदेखील सापाला ओळखू शकते. कुत्री वासावरून सापाचे अस्तित्व ओळखतात. जंगलात फिरताना डोक्यावर टोपी घालावी व पायात बूट घालावेत. सर्पमित्रांचे मोबाईल नंबर उपलब्ध करून ठेवावेत.
No comments:
Post a Comment