Saturday 17 August 2024

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन !!

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन !!

मुंबई, प्रतिनिधी : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता अनुदान योजना, बीज भांडवल योजना व थेट कर्ज योजनेकरीता उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. थेट कर्ज योजनेअंतर्गत उद्दिष्टापेक्षा जास्त प्रस्ताव प्राप्त झाल्यास लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. 

अनुदान योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंतची आहे. प्रकल्प मर्यादेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १० हजार रूपयांच्या मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येते व उर्वरित रक्क्म बँकेमार्फत देण्यात येते. बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे 3 वर्षात करावयाची आहे. 

बीज भांडवल योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा ५० हजार १ ते ५ लाख रूपयांपर्यंतची आहे. प्रकल्प मर्यादेच्या २० टक्के बीज भांडवल कर्ज महामंडळाकडून ४ टक्के व्याजदराने देण्यात येते. या रकमेत महामंडळाच्या १० हजार रूपये अनुदानाचा समावेश आहे. बँकेचे कर्ज ७५ टक्के देण्यात येते. महामंडळाच्या व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार ३ ते ५ वर्षाच्या आत करावी लागते. अर्जदारास ५ टक्के स्वत:चा सहभाग हिस्सा भरावयाचा असतो. 
 
थेट कर्ज या योजनेमध्ये प्रकल्प मर्यादा १ लाख रूपयांपर्यंतची आहे. महामंडळाचा सहभाग ८५ हजार रुपये इतका असून अनुदान १० हजार रूपये आहे. अर्जदाराचा सहभाग 5 हजार रूपये आहे. कर्जाची परतफेड समान मासिक हप्त्यानुसार ३ वर्षात करावयाची आहे. कर्जावर ४ टक्के व्याजदर असेल. 

राज्यातील इच्छुक नागरिकांनी लाभ घेण्याकरीता www.nbrmahapreit.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. भरलेल्या अर्जाची प्रत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या.), आपल्या जिल्ह्यातील जिल्हा कार्यालय येथे सादर करावी, असे महामंडळातर्फे कळविले आहे.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...