त्रिमितीय भौमितिक मॉडेल्स स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!
विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण
विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात गणित विभागाच्या वतीने इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी भौमितिक आकारांचा वापर करून त्रिमितीय मॉडेल्स तयार करण्याची स्पर्धा नुकताच मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी घेण्यात आली. गणित विषयाबद्दलची आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांची सर्जनशीलता विकसित व्हावी, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.
या स्पर्धेत वाणिज्य व विज्ञान विभागातील जवळपास ५० प्रोजेक्ट्स मध्ये १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सोबत शिक्षकांनी सुदधा सदर स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी टाकाऊ व पुनर्वापरयोग्य साहित्यांचा वापर करून विविध प्रकारची आकर्षक मॉडेल्स तयार केली. यामध्ये प्रसिद्ध स्मारके, मंदिरे, चर्च तसेच विविध देशांमधील वैशिष्ट्यपूर्ण वास्तुकलेची झलक दिसून आली. “टाकाऊ साहित्य वापरून इतके सुंदर मॉडेल्स तयार करता येऊ शकतात, हे आम्हालाही या स्पर्धेमुळे कळाले,” अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थिनीने दिली.
कार्यक्रमास उपप्राचार्या प्रा. हेमा पाटील, उपप्राचार्य प्रा. रमेश पाटील, मार्गदर्शिका कल्पना राऊत व वरिष्ठ शिक्षक प्रा. मनोज वाणी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आणि त्यांनी बनवलेल्या मॉडेल्सना प्रत्यक्ष भेट देऊन प्रोत्साहन दिले.
वाणिज्य आणि विज्ञान शाखेतून प्रत्येकी प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यामध्ये वाणिज्य शाखेतून मनिष रच्चा, आदर्श झा, समीर अन्सारी ह्यांना प्रथम क्रमांक मिळाला. इको सिटी अशा मॉडेल द्वारे प्रदूषणमुक्त शहर कसे असावे हे दाखवण्याचा यशस्वीपणे प्रयत्न प्रथम पारितोषिक विजेते ह्यांनी केला. विज्ञान शाखेतून मिनी केदारनाथ मंदिर या मॉडेल साकारणारे फातिम शेख, खुशी पोतदार, खुशी पाटील, निधी अरेरकर ह्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
शिक्षकांमध्ये प्रथम हितीक्षा राऊत, मनिता यादव, द्वितीय प्रज्ञा भोवड तर तृतीय लीना मुकणे ह्यांनी पारितोषिक प्राप्त केले.
“विद्यार्थ्यांचा उत्साह आणि कल्पकता पाहून खूप समाधान वाटले. गणित विषय फक्त आकडे व सूत्रांपुरता मर्यादित नसून तो सर्जनशीलतेलाही चालना देतो,” अशी प्राचार्या मुग्धा लेले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी गणित विषय विभागप्रमुख प्रा. महावीर गायकवाड व गणित विभागातील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
अशा स्पर्धा घेण्यासाठी कायम प्रोत्साहन देणारे ट्रस्टचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, सचिव अपर्णा ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन पाध्ये, समन्वयक नारायण कुट्टी, समन्वयक कल्पना राऊत, उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मुग्धा लेले, उपप्राचार्य रमेश पाटील, हेमा पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment