विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; “घातपाताचा संशय” कुटुंबीयांचा आरोप !!
पालघर | 18 नोव्हेंबर -
वाडा तालुक्यातील कोणसई येथील मूळ रहिवासी असलेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत महिला काजल अभिषेक मोकाशी (27) हिच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय असल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
काजलचा विवाह तीन वर्षांपूर्वी अभिषेक महेश मोकाशी (28) याच्यासोबत झाला होता. पती-पत्नी मागील एक वर्षापासून जाभूळविहीर, जव्हार येथे कामानिमित्त राहत होते. या काळात दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
कुटुंबीयांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. त्यांनी सांगितले की, “लग्नाला तीन वर्षे झाली असूनही मूल होत नसल्याचे कारण काढून काजलवर मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. तिला सतत टोमणे मारले जात, भांडणे केली जात आणि नवऱ्याकडून रूमच्या भाड्यासाठी पैशांची मागणी केली जात होती. यावरून मारहाण होत असे.” कुटुंबीयांनी असा आरोपही केला आहे की, “आम्ही आमचा संशय पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला, पण पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही किंवा तक्रार नोंदवून घेतली नाही.”
या प्रकरणामुळे कुटुंबियांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून मृत्यू घातपाताचा की इतर कोणत्या कारणामुळे झाला याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जव्हार पोलीस प्राथमिक तपास सुरू असल्याचे सांगत असले, तरी तपासातील ढिलाईवरून कुटुंबीय नाराज आहेत. कुटुंबीयांनी सांगितले की, “या प्रकरणाची सखोल चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार यांनी करावी अशी आम्ही लवकरच औपचारिक मागणी करणार आहोत.”
शवविच्छेदन अहवाल आणि पुढील तपासानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.
No comments:
Post a Comment