Thursday, 26 February 2026

उरण नगरपालिकेत तक्रार व अभिप्राय पेटी बसविण्याची मागणी !!

उरण नगरपालिकेत तक्रार व अभिप्राय पेटी बसविण्याची मागणी !!

** उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे नगराध्यक्षा भावना घाणेकर यांना निवेदन

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) :
उरण नगरपालिका हद्दीतील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांचे वेळेत व पारदर्शक निवारण व्हावे यासाठी नगरपालिका कार्यालयात तक्रार पेटी व अभिप्राय पेटी बसविण्यात यावी, अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने नगराध्यक्षा भावना घाणेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागरिक अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी सादर करतात; मात्र त्या तक्रारींचे वेळेत निवारण होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. परिणामी प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये नाराजीची भावना निर्माण होत आहे.
नागरिकांच्या अडचणी थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात तसेच समस्यांचे पारदर्शक व वेळेत निवारण व्हावे यासाठी नगरपालिका कार्यालयात “तक्रार पेटी” व “अभिप्राय पेटी” बसविणे आवश्यक असल्याचे संघाने नमूद केले आहे. सदर पेट्यांमध्ये नागरिकांना त्यांच्या तक्रारी, सूचना व अडचणी लेखी स्वरूपात नोंदविता येतील. आठवड्यातून किमान एकदा या पेट्या उघडून प्राप्त निवेदनांवर संबंधित विभागाने कार्यवाही करावी आणि त्याबाबत अर्जदारास लेखी कळवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच समस्या निकाली निघाल्यानंतर नागरिकांना अभिप्राय देण्याची संधी उपलब्ध करून दिल्यास प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नगराध्यक्ष भावना घाणेकर यांनी ‘जनता दरबार’ आयोजित करण्याचे आश्वासन दिले असल्याने त्याच धर्तीवर हा उपक्रम राबविल्यास नागरिक-प्रशासन संवाद अधिक प्रभावी होईल, असा विश्वास उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू, उपाध्यक्ष विरेश मोडखरकर यांनी व्यक्त केला आहे

No comments:

Post a Comment

जळगावच्या संगीता पाटील यांची कॅट वुमन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड !!

जळगावच्या संगीता पाटील यांची कॅट वुमन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड !! मुख्य राष्ट्रीय कार्यकारिणीच्या राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी नि...