कल्याण पंचायत समितीत बायोमेट्रिक हजेरी सक्तीची – गैरहजेरी व गैरवापरावर कडक कारवाईचे आदेश !!
कल्याण, प्रतिनिधी : सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विशाल कुरकुटे यांनी शासकीय कार्यालयांमधील कर्मचारी गैरहजेरी व बायोमेट्रिक प्रणालीच्या गैरवापराबाबत तक्रार केल्यानंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेतली आहे.
पंचायत समिती कल्याण कार्यालयाकडून यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. परिपत्रकानुसार, पंचायत समिती अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दररोज कार्यालयात हजर राहून बायोमेट्रिक प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. कार्यालयीन वेळेत गैरहजर राहणे, उशिरा हजेरी लावणे किंवा इतर कर्मचाऱ्यांच्या वतीने बायोमेट्रिक हजेरी लावणे अशा प्रकारांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
कार्यालयीन वेळेबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, वर्ग–४ कर्मचाऱ्यांसाठी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० आणि वर्ग–३ कर्मचाऱ्यांसाठी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ असा वेळ निश्चित करण्यात आला आहे. निर्धारित वेळेत उपस्थिती नोंदवली नाही किंवा कर्तव्यात कसूर आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे.
तसेच कार्यालयात लवकर येऊन केवळ बायोमेट्रिक हजेरी लावून बाहेर जाणे, कामकाजाच्या वेळेत गैरवापर करणे अथवा वरिष्ठांच्या परवानगीशिवाय अनुपस्थित राहणे अशा बाबींवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वाहनचालक व शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांनी दिलेली कामे वेळेत व योग्यरीत्या पार पाडणे बंधनकारक असून, आदेशांचे पालन न केल्यास वेतनातून कपात व प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे पंचायत समितीतील शिस्त व कामकाजात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन प्रशासन जागे झाल्याची चर्चा परिसरात होत आहे.
No comments:
Post a Comment