सिडकोकडून मिळणारा भूखंड हडप करण्यासाठी मृत महिलेला केले जिवंत !!
** विनामोबदला हक्कसोडपत्र तयार करून वारसदाराची केली फसवणूक
उरण दि ४, (विठ्ठल ममताबादे) : उरण पनवेल तालुक्यात जमिनींना करोडो रुपयाचे भाव आले असून उरण पनवेल मधील जमिनीना सोन्याचे भाव आले आहेत. मात्र पैशाच्या हव्यास्या पोटी, स्वार्थासाठी जमीन बेकायदेशीर पणे विकण्याचे धंदे उरण पनवेल मध्ये जोरात सुरु आहेत. उरण मध्येही असाच प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.सिडकोच्या संपादित जमिनीच्या मोबदल्यात मिळणारा कोट्यवधीचा भूखंड हडपण्यासाठी नातेवाईकांनीच मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा धक्कादायक प्रकार उरणमध्ये समोर आला आहे. १२ वर्षांपूर्वी मयत झालेल्या आपल्या आत्तेला जिवंत भासवून, तिच्या नावाशी साधर्म्य असलेल्या एका बनावट महिलेला निबंधक कार्यालयात उभे करुन तिच्या नावाने हक्कसोडपत्र तयार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. उरण पोलिसांनी या प्रकरणात चौघांविरुद्ध फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.
चिलें येथील तक्रारदार सुभाष नामदेव घरत (५६) यांची आई लहानुबाई उर्फ बानुबाई यांचे १ मार्च २०१३ रोजी निधन झाले होते.सर्व नातेवाईक त्यांच्या अंत्यविधीला हजर होते. मात्र, आजोबा रामा गमा मढवी यांच्या नावे चिर्ले येथे असलेल्या जमिनीवर डोळा ठेवून नातेवाईकांनीच कट रचला. ऑक्टोबर २०२४ मध्ये आरोपी कृष्णा गजानन मढवी, मयूर तुकाराम मढवी आणि बाबू उर्फ बाबुराव रामा मढवी यांनी तक्रारदार सुभाष घरत यांची आई मयत झाली आहे हे माहिती असतानाही, केवळ नावातील साम्याचा फायदा घेत पनवेल तालुक्यातील डेरवली येथील एका अनोळखी महिलेला रजिस्टर ऑफिसमध्ये लहानुबाई म्हणून उभे केले.तसेच या डमी महिलेचे फोटो, सही आणि अंगठा वापरुन विनामोबदला हक्कसोडपत्र पदरात पाडून घेतले. विशेष म्हणजे या बनावट हक्कसोडपत्राच्या आधारे आरोपींनी १८ मार्च २०२५ रोजी बांधकाम व्यवसायीक पार्थ गजोरा याच्या नावे जमिनीचे खरेदीखतही करुन घेतले. मूळ वारसदार सुभाष घरत यांना व इतर वारसदारांना कोणतीही कल्पना न देता हा सर्व व्यवहार पूर्ण करण्यात आला. दरम्यानच्या काळात सुभाष घरत यांनी तलाठी कार्यालयात वारसदार असलेल्या आपल्या आईची माहिती घेतल्यानंतर तिच्या नावाने हक्कसोडपत्र घेण्यात आल्याचे आढळुन आले.त्यानंतर त्यांनी अधिक माहिती घेतली असता बनावट महिलेच्या माध्यमातून हा सर्व प्रकार केल्याचे उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कृष्णा मढवी, मयूर मढवी,बाबुराव मढवी आणि सदर भुखंड खरेदी करणरा पार्थ गजोरा या चार जणांविरोधात फसवणूकीसह बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेलो नाही.
सिडकोच्या संपादित जमिनीच्या मोबदल्यात मिळणारा कोट्यवधीचा भूखंड हडपण्यासाठी नातेवाईकांनीच मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा धक्कादायक प्रकार उरणमध्ये घडला आहे. १२ वर्षांपूर्वी मयत झालेल्या आपल्या आत्तेला जिवंत भासवून, तिच्या नावाशी साधर्म्य असलेल्या एका बनावट महिलेला निबंधक कार्यालयात उभे करुन तिच्या नावाने हक्कसोडपत्र तयार करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने उरण मध्ये एकच खळबळ उडाली आहे
No comments:
Post a Comment