Friday, 24 April 2026

'सुखी माणसाचा सदरा' म्हणजेच चंद्रकांत मढवी ; माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे गौरवोद्गार !!

'सुखी माणसाचा सदरा' म्हणजेच चंद्रकांत मढवी ; माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे गौरवोद्गार !!

चंद्रकांत मढवी हे अजातशत्रू : महेंद्रशेठ घरत

उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) :
 "काही कर्मचारी सेवेत असताना कामापेक्षा उचापती जास्त करतात; परंतु चंद्रकांत मढवी यांनी कामावर निरपेक्ष भावनेने प्रेम केले. त्यांनी आपली जीवनशैली आणि कामाप्रती असलेले उत्तरदायीत्व यांची उत्तम सांगड घातली आहे. समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहे की, 'जगी सर्व सुखी असा कोण आहे'. त्यामुळे आपणही सुखी माणसाचा सदरा शोधायला जातो; परंतु ३० वर्षांच्या सेवापूर्तीनंतरही चंद्रकांत मढवी यांच्याकडे बघून वाटते ते सुखी माणसाचा सदरा लेवून आले आहेत," असे गौरोदगार माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि ज. आ. भगत ज्युनियर महाविद्यालय गव्हाण-कोपर येथे काढले. श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे वरिष्ठ कर्मचारी चंद्रकांत मढवी यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार रामशेठ ठाकूर होते. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत म्हणाले, "भगत साहेबांनी चांगली माणसे पेरली. त्यांचा वसा रामशेठ ठाकूर चालवतात. रयत शिक्षण संस्थेसाठी तर ते सर्वाधिक मोठे देणगीदार आहेत. साहजिकच 'रयत'मध्ये त्यांच्या शब्दाला कमालीचा मान आहे. त्यांच्यामुळेच आज 'रयत'मध्ये अनेकांचे भले झाले आहे. 'रयत'च्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यांमध्येही अनेकांना मानाचे स्थान मिळाले आहे. आपल्याला आयुष्य जगता आले पाहिजे. सतत समाजासाठी काम केले पाहिजे. आपल्यावर असणारी जबाबदारी प्रामाणिकपणे पेलली पाहिजे. चंद्रकांत मढवी हे अजातशत्रू आहेत. त्यांनी आपल्या कामाने सर्वांवर छाप पाडली आहे." 

चंद्रकांत गजानन मढवी हे सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती समारंभ शुक्रवारी (ता.२४) विद्यालयात झोकात झाला. यावेळी त्यांचा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी मढवी यांच्यावर प्रेम करणारे, तसेच कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी प्रामाणिकपणा, साधा व सरळ माणूस अशा भावनाही अनेकांनी व्यक्त केल्या. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य महेंद्रशेठ घरत, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे,  चेअरमन अरुणशेठ भगत, जिल्हा परिषद सदस्या निकिता खारकर, पंचायत समिती सदस्य जिज्ञासा कोळी, मो. का. मढवी गुरुजी, अनंता ठाकूर, विजय घरत, माईताई भोईर, प्राचार्य ज्योत्स्ना ठाकूर, व्ही. वाय. लेंभे, महेश म्हात्रे आणि विद्यालयाचा कर्मचारी वृंद उपस्थित होता. सागर रंधवे यांनी सूत्रसंचालन केले

No comments:

Post a Comment

समाधान म्हात्रे यांच्या वाढदिवसा निमित्त गोर गरिबांना शैक्षणिक व आर्थिक मदत !!

समाधान म्हात्रे यांच्या वाढदिवसा निमित्त गोर गरिबांना शैक्षणिक व आर्थिक मदत !! उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) : राष्ट्रवादी काँग्र...